
गिरगाव (ता. जत) येथे वडिलांनी नवीन मोबाईल व मोटारसायकल घेऊन देण्यास नकार दिल्याने नैराश्यातून युवकाने घरातच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
उमदी (जि. सांगली) ः गिरगाव (ता. जत) येथे वडिलांनी नवीन मोबाईल व मोटारसायकल घेऊन देण्यास नकार दिल्याने नैराश्यातून युवकाने घरातच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
शंकर निंगप्पा मांग (वय 24, रा. गिरगाव) असे त्याचे नाव आहे. आज सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली. उमदी पोलिस ठाण्यात वडील निंगप्पा मलाप्पा मांग यांनी फिर्याद दिली. उमदी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. मोबाईल न दिल्याच्या कारणावरून आत्महत्या करण्याची मल्लाळनंतर तालुक्यात ही दुसरी घटना घडली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की निंगप्पा मांग आठ- नऊ वर्षांपासून गिरगावात कोतवाल म्हणून काम पाहतात. शेती करीत कुटुंब सांभाळतात. मोठ्या मुलीचे दोन-तीन वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. सध्या मुलगा शंकर, निंगप्पा व पत्नी असे तिघे घरी राहत आहेत. शंकर एकुलता होता. गेल्याच वर्षी तो बारावीचे शिक्षण पूर्ण करून वडिलांबरोबर शेतीत मदत करीत होता. मात्र, काही दिवसांपासून मोबाईल किंवा गाडी घेऊन द्या, असा लकडा त्याने वडिलांकडे लावला होता. वडिलांनी पगार झाल्यावर मोबाईल घेऊन देऊ, असे सांगितले होते.
दरम्यान, काल (ता. 2) शंकरने वडिलांकडे हट्ट धरला. वडिलांनी पुन्हा पगार झाल्यावर मोबाईल देऊ, असे सांगितले. मात्र, मोबाईल तत्काळ मिळत नसल्याच्या नैराश्येतून शंकरने आज सकाळी आठच्या सुमारास घरातच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
शंकरच्या आईने प्रथम ही घटना पाहून आरडाओरडा केला. शेजारचे नागरिक जमण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सरपंचांनी उमदी पोलिस ठाण्यात घटनेची माहिती दिली. सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. उमदी पोलिस तपास करीत आहेत.
संपादन : युवराज यादव