सोलापूर - अनुकंपाखाली नोकरीसाठी संघर्ष करणाऱ्या दिनेशसिंग शीतल या तरुणाने आता पालकमंत्री तथा आरोग्य राज्यमंत्री विजयकुमार देशमुख व जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे इच्छामरणाची परवानगी मागितली आहे.
वडिलांच्या मृत्यूनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळावी, यासाठी दिनेशसिंग याने जिल्हाधिकारी, आरोग्य राज्यमंत्री, महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्याकडे वारंवार हेलपाटे मारले. मात्र, दोन-अडीच वर्षांनंतरही त्याला न्याय मिळाला नाही. शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवून नाराज झालेल्या दिनेशसिंगने आता स्वातंत्र्यदिनी (15 ऑगस्ट) आत्मदहनाचा इशारा दिला आहे. तत्पूर्वी, पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी मला इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशीही मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे जनमाहिती तथा प्रशासकीय अधिकारी एस. जामकर यांनी दिनेशसिंगला माहिती अधिकारात वेळेत माहिती दिली नसल्याने माहिती आयुक्तांनी 25 हजारांचा दंड ठोठावला. तर, तत्कालीन अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार, डॉ. सुनील घाटे यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईचेही आदेश दिले. मात्र, प्रत्यक्षात त्यानुसार काहीच कारवाई झाली नाही.
|