इचलकरंजीत डोक्यात दगड घालून युवकाचा खून

Youth murder in Ichalkaranji
Youth murder in Ichalkaranji

इचलकंजी : शहरापासून जवळच असलेल्या पार्वती औद्योगिक वसाहतीमध्ये बंद पडलेल्या प्रोसेस कारखान्यात अनिल शिवाजी मासाळ (वय 22, रा. संगमनगर, खोतवाडी) या युवकाचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास निदर्शनास आली आहे.

घटनास्थळी उपविभागीय अधिकारी श्रीनिवास घाटगे, गणेश बिरादार, शहापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक के. एन. पाटील यांनी पाहणी केली. याबाबत फिर्याद मयत मासाळ याचा भाऊ सुनिल मासाळ याने शहापूर पोलिस ठाण्यात दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, खोतवाडी येथील संगमनगर येथे अनिल शिवाजी मासाळ हा यंत्रमाग कामगार राहत असून कोंडीग्रे येथील सुलतानपूरे यांच्या कारखान्यात तो काम करत होता. सोमवारी दुपारनंतर तो घरी आला नाही. याची शोधाशोध मासाळ याच्या घरातील नातेवाईकांनी केली. परंतु, तो आढळून न आल्याने मंगळवारी दुपारी सुनिल हा पार्वती वसाहतीमध्ये शोधाशोध करीत असताना शेर्लेकर यांच्या बंद पडलेल्या प्रोसेसच्या कारखान्याच्या वरच्या मजल्यावरील ओसाड जागेत अनिलचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचा दिसून आला.

डोक्यात दगड घातल्याने डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. शेजारी रक्ताने माखलेला दगड दिसला. याबाबतची माहिती सुनिल याने पोलिसांना त्वरीत दिली. त्यामुळे अगदी काही तासात घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करण्याचे काम सुरू होते. सदर मयत अनिल शिवाजी मासाळ हा 2016 मध्ये 302 गुन्ह्याखाली अटक होता. जामीनावर त्याची मुक्तता झाली होती.  खून हा पूर्ववैमनस्यातून झाला असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 2018 मध्येही मारामारीच्या गुन्ह्याखाली त्याच्यावर शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. सदर खून हा बदला घेण्याच्या उद्देशाने केला असल्याबाबतचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. जवळच्याच साथीदारांनीच खून केला असण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. सदर तपासासाठी पोलिसांची पथके रवाना झाली असून एका संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे. 

दरम्यान, पार्वती इंडस्ट्रिज परिसरात कारखाने, प्रोसेस तसेच अनेक मोठमोठी युनिट बंद अवस्थेत आहेत. या बंद पडलेल्या मोठमोठ्या शेडमध्ये रात्रीच्या वेळी जुगार अड्डे, व्यसन करण्याचा अड्डा होवून बसला आहे. तसेच याठिकाणी अश्लिल प्रकारही सर्रास होत असल्याची चर्चा आहे. तसेच रात्री कामगार वर्गाला या परिसरातून कामासाठी जाणे अथवा रहदारी करणे अत्यंत अवघड होऊन बसले आहे. पार्वती परिसरात रात्रीच्या वेळी पोलिसांनी पेट्रोलिंग करणे गरजेचे आहे. तसेच या परिसरात पोलिस ठाण्याची आवश्यकता असताना या परिसरातील पोलिस ठाणे बंद आहे. या गुन्हेगारी करणार्‍या गुंडांना हा परिसर मोकाट झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com