गॅंगची दहशत निर्माण करण्यासाठी सांगलीत युवकाचा खून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

सांगली - शहरातील मध्यवस्तीतील महावीर कॉलनीत महेश शिवाजी नाईक (वय २५, गुलाब कॉलनी) या युवकाचा खून गॅंगची दहशत निर्माण करण्यासाठी करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले. चौघांना अटक करण्यात आली आहे. दोघा अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. 

सांगली - शहरातील मध्यवस्तीतील महावीर कॉलनीत महेश शिवाजी नाईक (वय २५, गुलाब कॉलनी) या युवकाचा खून गॅंगची दहशत निर्माण करण्यासाठी करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले. चौघांना अटक करण्यात आली आहे. दोघा अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. 

सचिन विजय डोंगरे (वय २७), सुरेश श्रीकांत शिंदे (वय २३), प्रवीण अशोक बाबर (वय २५, तिघे गुलाब कॉलनी), प्रशांत दुंडाप्पा सुरगाडे (वय २९, भगतसिंग शाळेजवळ, हनुमाननगर) अशी त्यांची नावे आहेत. सूरज जगन  सहानी (वय २१, स्फूर्ती चौक) याने फिर्याद दिली. दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अजून चौघे पसार आहेत. 

पोलिसांनी माहिती दिली, की महेश नाईक आणि  हल्लेखोर प्रवीण बाबर मित्र होते. बाबरचा जॉय ग्रुप  आहे. त्यातून एकमेकांची ओळख वाढली. महावीर कॉलनीत ग्रुपमधील सदस्यांचा ठिय्या असे. वर्षापूर्वी मुन्नाच्या मुलाच्या बारशात महेशने प्रवीणला किरकोळ कारणातून शिवीगाळ केली होती. वाद वाढल्यानंतर महेशने प्रवीणला मारहाणही केली होती. तो राग प्रवीणच्या मनात कायम होता. तेव्हापासून त्याचा काटा काढायचा बेत त्याने आखला. 

त्या दोघांचा मित्र गुराप्पा मेस्त्री याचा काल वाढदिवस होता. महावीर कॉलनीत पार्टीसाठी सारेच जमले होते. पार्टीत रात्री साडेनऊच्या सुमारास महेश व प्रवीण यांच्यात पुन्हा वाद झाला. राग उफाळून आला. प्रवीण बाबरसह साथीदारांनी मिळून महेशला मारहाण करण्यास सुरवात केली. अखेर चाकूसारख्या धारधार शस्त्राने पोटात  खोलवर वार केले. रक्ताच्या थारोळ्यात तो तेथेच कोसळला. महेशला मारहाण झाल्याचे समजल्यानंतर गणेश चन्नाप्पा बबलादी (वय २१, प्रगती कॉलनी) हा धावून आला. त्याच्यावरही हल्ला करण्यात आला. त्यानंतर बाबरसह हल्लेखोर पसार झाले.

दरम्यान, महेश आणि गणेश गंभीर जखमी झाल्याने  त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अतिरक्तस्राव झाल्याने महेशचा मृत्यू झाला. डॉक्‍टरांनी रात्री उशिरा त्याला मृत घोषित केले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. गणेश बबलादी गंभीर जखमी आहे. त्याच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

बारा तासांत छडा
विश्रामबाग पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल तनपुरे यांनी तातडीने संशयित हल्लेखोरांचा शोधासाठी तपासपथके रवाना केली. बारा तासांत प्रशांत सुरगाडेला अटक केली. त्यानंतर उर्वरित तिघांना सकाळी अटक करण्यात आली. अन्य हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. चौघांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली. 

पोलिस अन्‌ लोकप्रतिनिधी पार्टीत 
महावीर कॉलनीत वाढदिवसाच्या पार्टीत दोन पोलिस, लोकप्रतिनिधीही हजर होते. जेवणावर ताव मारल्यानंतर त्यांच्यासमोरच हा सारा प्रकार घडला. पोलिस असतानाही घटना घडल्याची दिवसभर चर्चा होती.

Web Title: Youth murder in Sangli to create Gang terror