पुण्यातील युवकाने मित्रांना 20 लाखांना फसविले

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 19 December 2019

एका मित्रास 13 लाख पाच हजार, तर अन्य एकास सहा लाख 82 हजाराला गंडा घातला गेला आहे. हे दाेन्ही मित्र कराड येथील असून याबाबत त्यांनी पाेलिसांत तक्रार दाखल केली आहे.
 

कऱ्हाड ः जादा टक्केवारीने पैसे देण्याचे आमिष दाखवून एकाने दोन मित्रांना ऑनलाइन बॅंकिंगसह रोख रकमेद्वारे 20 लाखांचा गंडा घातला. अमित आंबेकर (रा. त्रिमूर्ती कॉलनी, कऱ्हाड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हरिदयाल रंजनदास गुप्ता (वय 39, रा. पुणे) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा - लव्ह मॅरेज ते सायबर क्राईम 

पोलिसांच्या माहितीनुसार आंबेकर हे श्रीराम फायनान्स कंपनीत सिनियर अकाउंट ऑफिसर आहेत. त्यांचे मित्र अमोल यांनी हरिदयाल गुप्ताची आंबेकरसोबत ओळख करून दिली. त्या वेळी आंबेकर व गुप्ता यांच्यात शेअर मार्केट, बॅंकिंग व गुंतवणुकीवर चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी आंबेकरांशी संपर्क ठेवला. आंबेकर यांच्या नावाने शेअर डी मॅट अकाउंट होते. ते कल्याणीनगर पुण्याच्या प्रपीट मार्ट सिक्‍युरिटीज कंपनीचे आहे. त्याची शाखा आंबेकर यांनी अमोल यांना दिली होती. त्या कंपनीचा आर्थिक व्यवहार बघून हरिदयालने आंबेकरांशी संपर्क साधत "माझी फायनान्स कंपनी आहे. त्याचे नाव निवेश इन्वेस्टर आहे,' असे सांगितले.

त्या वेळी त्यांनी आंबेकरांशी आर्थिक व्यवहार, व्यवसायाविषयी बोलणी केली. त्यांचा विश्‍वास संपादन केला. "कंपनीत तुम्ही गुंतवणूक करा, तुम्हाला जादा टक्केवारीने रक्कम परत करतो, असे आमिषही त्याने दाखवले. त्यानंतर आंबेकर यांनी त्यांच्या वेगवेगळ्या अकाउंटमधून सप्टेंबर 2018 ते फेब्रुवारी 2019 कालवाधीत हरिदयाल गुप्ताच्या अकाउंटवर ऑनलाइन, नेट बॅंकिंगद्वारे, तर कधी रोख स्वरूपात 13 लाख 5 हजार रुपये जमा केले.

अवश्य वाचा - एन्काउंटरप्रकरणातील पोलिसांना ब्रेव मेन पुरस्कार देणार

त्यानंतर आंबेकर यांनी त्यांच्याशी वारंवार संपर्क साधला. मात्र, त्याने टाळाटाळ केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर आंबेकर यांनी गुप्ताचा पत्ता शोधून काढला. कंपनीतून त्याला काढून टाकण्यात आल्याचे आंबेकर यांना कंपनीने सांगतिले. आंबेकर यांनी फुरसुंगी येथील त्याच्या राहत्या घरीही शोध घेतला. तेथेही तो नव्हता. आंबेकराप्रमाणेच सचिन यांनीही गुप्ताकडे सहा लाख 82 हजार रुपयांची गुंतवणूक केली होती. हरिदयाल गुप्ताने दोघांचाही फसवणूक केल्याचे आज उघड झाले. त्यानुसार आंबेकर यांनी पोलिसांत तक्रार दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth From Pune Cheated Friends From Karad For Twenty Lakhs