सांगली : वाळव्यातील ‘त्या’ तरुणासह दहा जण एटीएसच्या ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

या प्रकरणात वाळव्यातील तरुण गुंतल्याचे समोर येताच खळबळ उडाली आहे. संशयितांपैकी सहा जण उत्तर प्रदेशातील आहेत. दोघे नायजेरियन तर एक दिल्लीचा आहे. या सर्वांची उत्तरप्रदेश एटीएस लखनौ येथे चौकशी करीत आहे.

वाळवा - दहशतवादी कारवायांसाठी आर्थिक हेराफेरी करणाऱ्या वाळवा (जि. सांगली) येथील २५ वर्षीय तरुणासह एकूण दहा जण उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथका (एटीएस)च्या ताब्यात आहेत. त्यात दोन नायजेरियन तरुणांचा समावेश आहे. या दहा जणांची एटीएस कसून चौकशी करीत आहे. वेगवेगळ्या बॅंकांच्या सिस्टीममध्ये घोटाळे करून या संशयितांनी कोट्यवधी रकमेचा अपहार केला आणि हा पैसा त्यांनी दहशतवादी यंत्रणांना पुरवल्याचा एटीएसचा संशय आहे. 

या प्रकरणात वाळव्यातील तरुण गुंतल्याचे समोर येताच खळबळ उडाली आहे. संशयितांपैकी सहा जण उत्तर प्रदेशातील आहेत. दोघे नायजेरियन तर एक दिल्लीचा आहे. या सर्वांची उत्तरप्रदेश एटीएस लखनौ येथे चौकशी करीत आहे. वेगवेगळ्या बॅंकांची यंत्रणा हॅक करून या संशयितांनी अगदी दहा कोटींपासून अडीच लाख अमेरिकन डॉलरपर्यंत अपहार केला आहे.

एटीएसच्या तपासात नेपाळ येथील राष्ट्रीय बॅंकेच्या यंत्रणेत हेराफेरी करून या टोळीने ४९ लाख रुपये अन्य ठिकाणी वळवल्याचे समोर आले आहे. नंतर ही रक्कम भारतीय चलनात हस्तांतरीत करुन उत्तर प्रदेशातील बरेली येथील एकाकडे सोपवल्याचे समोर आले आहे. एटीएसने तीन लॅपटॉप, चार मोबाईल फोन, १३ भारतीय आणि एक विदेशी सीमकार्ड, १३ डोंगल, दोन पेनड्राईव्ह, तीन राऊटर, एक नायजेरियन पासपोर्ट, दोन नायजेरियन ओळखपत्रे व काही संशयास्पद कागदपत्रे या प्रकरणी संशयितांकडून जप्त केली आहेत.

सांगली : वाळव्याच्या तरूणाचा दहशतवाद्यांशी संबंध ? 

एटीएसच्या माहितीनुसार या प्रकरणातील दोन संशयित नायजेरियन तरुण एकावेळी दहा-दहा कोटी रुपये दुसऱ्या बॅंक खात्यात ट्रान्सफर करीत होते. अशा प्रकारे ज्या ज्या खात्यांवर या संशयितांनी पैसे ट्रान्सफर केले आहेत, ती खाती एटीएसच्या रडारवर आहेत. त्याशिवाय उत्तरप्रदेश एटीएस या संशयितांचे पाकिस्तानाशी काही कनेक्‍शन आहेत का, याचाही तपास करीत आहे. 

गावागावांतील रूबाबदार फेटेवाले बाबा गेले कुठे ? 

एटीएसच्या एका बड्या अधिकाऱ्याच्या माहितीनुसार या प्रकरणातील संशयित दहशतवाद्यांना पैसा पुरवत असावेत, असा दाट संशय आहे. मुंबई, बरेली, दिल्ली असे या संशयितांचे नेटवर्क होते. त्या माध्यमातून आर्थिक अपहाराचे प्रकार या टोळीकडून घडले, असा संशय एटीएसला आहे.

कातळशिल्पावर होतोय संदर्भ ग्रंथ; माहिती पाठवण्याचे आवाहन 

दरम्यान, सांगली जिल्ह्यातील वाळव्याचा तरुण या प्रकरणी गुंतल्याचे समोर येताच चर्चेला उधाण आले आहे. मुंबई येथे उत्तरप्रदेश एटीएसने वाळव्यातील तरुणांसह दोन नायजेरियन संशयितांना ताब्यात घेतले. त्यानंतर स्थानिक न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले. न्यायालयाने या संशयितांना उत्तरप्रदेश एटीएसची कोठडी सुनावली. त्यानुसार त्यांना लखनौ येथील कोठडीत ठेवण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth From Walwa Arrested BY ATS