नगर जिल्हा परिषदेच्या फायली सह्यांसाठी हिमाचल प्रदेशात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

नगर जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचा दिवाळी ऍडव्हान्ससह अन्य विषयांच्या फायली सह्यांसाठी चक्क हिमाचल प्रदेशात पाठविण्यात आल्या. त्याला कारणही तसेच आहे.

नगर : जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचा दिवाळी ऍडव्हान्ससह अन्य विषयांच्या फायली सह्यांसाठी चक्क हिमाचल प्रदेशात पाठविण्यात आल्या. त्याला कारणही तसेच आहे. या फायलींवर सह्यांचे अधिकार असलेले मुख्य कार्यकारी अधिकारीच हिमाचल प्रदेशात आहेत. त्यामुळे फायली त्यांच्याकडे पाठविण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एस. पाटील यांची हिमाचल प्रदेशामध्ये निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेमधील ज्या महत्त्वाच्या फायलींवर त्यांची स्वाक्षरी आवश्‍यक आहे, त्या फायलींची वारी सह्यांसाठी हिमाचल प्रदेशात झाली. हिमाचलमधील विधानसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे.

या पोटनिवडणुकीमध्ये एस. एस. पाटील यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यासाठी ते तेथे गेले आहेत. त्याबाबतच्या आदेशात मात्र, या काळात त्यांचा पदभार कोणाकडे द्यावा, याचा उल्लेख नव्हता. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांचा पदभार कोणाकडेच दिलेला नाही. त्यामुळे या कार्यकाळामध्ये दैनंदिन कामे पाहण्याचा आदेश त्यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिला होता. मात्र, महत्त्वाच्या फायलींवर सह्या करण्याचे अधिकार कोणालाच नव्हते. त्यामुळे जिल्हा परिषदेमधील अनेक फायली आजही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीच्या प्रतीक्षेत आहेत.

फेस्टिव्हल ऍडव्हान्ससह अत्यंत महत्त्वाच्या फायलींवर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सह्या महत्त्वाच्या असतात. अशा फायली त्यांच्याकडे स्वाक्षरीसाठी पाठविण्यात आल्या. या फायली पाटील यांच्या सह्या झाल्यानंतर नुकत्याच नगरला आल्या आहेत.

जिल्हा परिषदेमधील महत्त्वाच्या फायली गोपनीयतेमुळे कार्यालयाबाहेर एरवी कधीच जात नाहीत. मात्र मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना हिमाचलमधून नगरला येणे अशक्‍य असल्यामुळे नगर जिल्हा परिषदेमधील फायलींचाच सह्यांच्या निमित्ताने का होईना, हिमाचल प्रदेशापर्यंतचा प्रवास झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Zilla Parishad files travels to Himachal Pradesh for signature