शिवेंद्रसिंहराजेंचा फोन ठरला निर्णायक

उमेश बांबरे
बुधवार, 22 मार्च 2017

उपाध्यक्षपद जावळीला; अध्यक्षपदी संजीवराजे सर्वमान्य, शिवेंद्रसिंहराजे-पाटणकरांत खडाजंगी

उपाध्यक्षपद जावळीला; अध्यक्षपदी संजीवराजे सर्वमान्य, शिवेंद्रसिंहराजे-पाटणकरांत खडाजंगी

सातारा - जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचे दावेदार ठरविण्यासाठी आज झालेल्या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत अध्यक्षपदासाठी संजीवराजे नाईक-निंबाळकर यांचे नाव सर्वमान्य ठरले. पण, उपाध्यक्षपदावरून माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात खडाजंगी झाली. शिवेंद्रसिंहराजेंनी थेट शरद पवार यांना फोन करत ‘बाजी’ मारली. अखेर शिक्षण सभापतिपदावर समाधान मानत पाटणकर यांनी नमते घेतले. मानसिंगराव जगदाळेंची समजूत काढताना ‘यापुढे आम्ही तुमच्या पाठीशी राहू’, असा शब्द शिवेंद्रसिंहराजेंनी दिल्याने वादावर पडदा पडला.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचे नाव निश्‍चित करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीची महत्त्वपूर्ण बैठक झाली. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर, ज्येष्ठ नेते विक्रमसिंह पाटणकर, आमदार शशिकांत शिंदे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, दीपक चव्हाण, नरेंद्र पाटील, पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, बाळासाहेब भिलारे तसेच अध्यक्षपदाचे दावेदार संजीवराजे, मानकुमरे, जगदाळे, सुरेंद्र गुदगे, राजेश पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. 

प्रारंभी अध्यक्षपदासाठी संजीवराजेंचे नाव निश्‍चित केल्याचे आमदारांनी सांगितले. या निर्णयाला कोणीही विरोध केला नाही. सर्वांनी मान्यता दिल्याने उपाध्यक्षपदासाठीची रस्सीखेच सुरू झाली. सुरवातीलाच विक्रमसिंह पाटणकर यांनी भूमिका मांडताना ‘आम्हाला पक्षश्रेष्ठी शरद पवार यांनी शब्द दिला आहे. त्यानुसार राजेश पवार यांचेच नाव निश्‍चित करावे,’ असा मुद्दा मांडला. त्यावरून शिवेंद्रसिंहराजे संतप्त झाले. ‘‘आम्ही खासदारांना अंगावर घ्यायचे, पक्षासाठी झटायचे आणि तुम्ही पाटणला पद द्यायचे योग्य नाही. वसंतराव मानकुमरेंनाच उपाध्यक्षपद मिळाले पाहिजे,’’ असा त्यांचा आग्रह होता. या वादात रामराजेंनी हस्तक्षेप केला. ‘शरद पवार यांनीच राजेश पवार यांचे नाव उपाध्यक्षपदासाठी घेण्यास सांगितले आहे,’ असे रामराजेंनी सांगताच शिवेंद्रसिंहराजे अधिकच आक्रमक झाले.

शिवेंद्रसिंहराजेंना आमदार नरेंद्र पाटील यांनी साथ देत ‘तुम्ही शरद पवारांशी का बोलत नाही, असे सांगत मोबाईलवरून पवार साहेबांशी बोला,’ असे सांगितले. त्यानंतर मानकुमरे बैठकीतून उठून बाहेर गेले. याचदरम्यान, शिवेंद्रसिंहराजेंनी शरद पवारांशी मोबाईलवरून संपर्क साधला. ‘आगामी लोकसभेची निवडणूक सोपी होण्यासाठी जावळीला पद दिले पाहिजे. आम्ही खासदारांविरोधात भूमिका घेतली आहे. पक्षासाठी मानकुमरे यांनी खासदारांविरोधात भूमिका घेत दगड झेलले आहेत. त्यामुळे पक्षाने याचा विचार करून मानकुमरेंना संधी द्यावी,’ अशी भूमिका त्यांनी पवार यांना सांगितली. त्यावर श्री. पवार यांनी ‘तसे असेल तर जावळीला उपाध्यक्षपद देण्याबाबत विचार व्हावा,’ अशी सूचना रामराजेंना केली. या नाट्यमय घडामोडींनंतर उपाध्यक्षपदावरून पाटणचे नाव खुडून मानकुमरे यांचे नाव अंतिम झाले. याचदरम्यान, जगदाळे यांना उपाध्यक्षपद द्यावे, म्हणून आमदार शिंदे व सुनील मानेंनी मागणी केली. पण, त्याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले. मात्र, शिंवेंद्रसिंहराजेंनी आमदार बाळासाहेब पाटील यांना समवेत घेऊन जगदाळे यांची समजूत काढली. पाटणचे आमदार असूनही विक्रमसिंह पाटणकरांच्या बाजूने भूमिका न मांडता नरेंद्र पाटील यांनी शिवेंद्रसिंहराजेंची पाठराखण केली. 

बैठकीच्या सुरवातीला माणला उपाध्यक्षपद देण्यासाठी शेखर गोरेंनीही आग्रह धरला होता. पण, (कै.) सदाशिवराव पोळ यांच्या सुनेला महिला व बालकल्याण सभापतिपद दिले जाणार असल्याने व माढा मतदारसंघात माण येत असल्याने एकाच मतदारसंघात दोन पदे देता येत नसल्याचे रामराजेंनी सांगितल्यानंतर गोरे शांत झाले. नंतर आमदार शिंदे व रामराजेंनी भूमिका मांडून दोघांनी नावे निश्‍चित झाल्याचे स्पष्ट केले. तेथूनच संजीवराजे व मानकुमरे हे सर्व सदस्यांसह सूचक व अनुमोदकांना घेऊन अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हा परिषदेत गेले.

अखेर निर्णयासाठी ‘बारामती’च!
उपाध्यक्षपदासाठी पाटणच्या राजेश पवार यांचे नाव निश्‍चित झाले होते. यासंदर्भात शरद पवार यांच्याशी मोबाईलवरून चर्चा करूनच विक्रमसिंह पाटणकर व रामराजेंनी त्यांचे नाव निश्‍चित केले. पण, ऐनवेळी शिवेंद्रसिंहराजेंनी मोबाईलवरून पवार यांच्याशी बोलून पवार यांचे नाव बाजूला करून मानकुमरेंचे नाव निश्‍चित केले. त्यामुळे बारामतीशी बोलल्याशिवाय कोणतेच पद निश्‍चित होत नाही, हे आजच्या निवड प्रक्रियेतून स्पष्ट झाले.

Web Title: zp chairman election