पाटण, कऱ्हाड, माण, खंडाळ्याला संधी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 एप्रिल 2017

सभापती निवडी आज; राष्ट्रवादीचे नेते बैठकीत ठरविणार नावे

सभापती निवडी आज; राष्ट्रवादीचे नेते बैठकीत ठरविणार नावे
सातारा - जिल्हा परिषदेच्या चार विषय समित्यांच्या सभापती निवडीसाठी उद्या (ता. एक) सभा होत असून, त्यासाठी राष्ट्रवादीअंतर्गत मोर्चेबांधणी शिगेला पोचली आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत डावलले गेल्याने सभापतीची दारे सर्वाधिक पाटण, कऱ्हाड तालुक्‍यांसाठी खुली राहणार आहेत, तर माण, खंडाळाही बाजी मारण्याची शक्‍यता राष्ट्रवादीच्या गोटात वर्तविली जात आहे.

शिक्षण व अर्थ, कृषी, समाजकल्याण, महिला व बालकल्याण विषय समित्यांच्या सभापतिपदासाठी शनिवारी निवड कार्यक्रम होत आहे. सकाळी दहा ते दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करणे, दुपारी दोन वाजता सभा, दोन ते अडीचपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत व त्यानंतर आवश्‍यकता असल्यास मतदान अथवा निवडी जाहीर केल्या जातील.
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद 15 वर्षांने खुले झाल्याने अध्यक्षपदासाठी रस्सीखेच वाढली होती. मात्र, संजीवराजे नाईक-निंबाळकर यांचे नाव निश्‍चित झाल्याने इच्छुकांनी उपाध्यक्षपदाकडे मोर्चा वळविला. मात्र, त्यातही वसंतराव मानकुमरे यांनी बाजी मारल्याने म्हावशी गटातील (ता. पाटण) राजेश पवार, मसूर गटातील (ता. कऱ्हाड) मानसिंगराव जगदाळे यांचा पत्ता कट झाला. त्या वेळी माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर, आमदार बाळासाहेब पाटील नाराज झाले होते.

पाटण, कऱ्हाड तालुक्‍यांना अध्यक्ष निवडीत डावलेले गेल्याने या तालुक्‍यांना प्राधान्याने संधी देण्याची चर्चा राष्ट्रवादीत आहे. श्री. पाटणकर यांनी मुंबईत थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, नेते अजित पवार यांच्याशी संपर्क ठेवला आहे. शिक्षण सभापतिपद पदरात घेण्यासाठी पाटणकरांनी हालचाली वाढविल्याने राजेश पवारांना शिक्षण सभापतिपदाची संधी मिळण्याची दाट शक्‍यता आहे. आमदार मकरंद पाटील हे खेड बुद्रुक गटातील (ता. खंडाळा) मनोज पवार यांच्यासाठी आग्रही आहेत, तर मानसिंगराव जगदाळे यांनीही मजबूत मोर्चेबांधणी केली आहे. अजित पवार यांचे विश्‍वासू कार्यकर्ते खटाव गटातील प्रदीप विधाते हेही दावेदार ठरू शकतात. मात्र, जगदाळे आता पद घेणार की थांबणार, यावर कृषी सभापतिपदाचे भवितव्य ठरणार आहे.

समाजकल्याण सभापतिपदासाठी औंध गटातील (ता. खटाव) शिवाजी सर्वगोड यांचे नाव सर्वाधिक चर्चेत असले, तरी शिक्षण सभापतिपद पाटणला न मिळाल्यास गोकूळ तर्फ हेळवाक गटातील (ता. पाटण) बापू जाधव हेही दावेदार ठरतील. महिला बालकल्याण सभापतिपदासाठी गोंदवले गटातील (ता. माण) डॉ. भारती पोळ प्रबळ दावेदार असून, त्यांच्या शर्यतीतही जयश्री फाळके, संगीता मस्कर यांची नावे पुढे येत आहेत.

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यासह राष्ट्रवादीच्या आमदारांची शनिवारी सकाळी नऊ वाजता अध्यक्षांच्या निवासस्थानी बैठक होणार आहे. या बैठकीत नावे अंतिम करून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे.

अडीच वर्षांनंतरचा भरवसा काय?
राष्ट्रवादीत राजकीय चक्रे सातत्याने फिरत असतात. त्यामुळे अडीच वर्षांनंतर पद मिळेल, याचा भरवसा नसल्याने मिळेल ते पद घेऊ, ही भूमिका इच्छुकांनी घेतली आहे. शिक्षण, कृषी सभापतिपदासाठी कमालीची रस्सीखेच सुरू आहे. यात मात्र, पुढील पदाधिकारी बदलात तरी नाव चर्चेत येण्यासाठी अनेकांनी आतापासूनच नेत्यांपुढे झोळी पसरली आहे.

Web Title: zp chairman selection election