राष्ट्रवादीविरोधात जंग जंग!

विशाल पाटील - @vishalrajsakal 
गुरुवार, 12 जानेवारी 2017

‘राजधानी’ एक्‍स्प्रेसला काँग्रेसचे इंजिन?; भाजप- शिवसेनेपुढे युतीचा पर्याय

‘राजधानी’ एक्‍स्प्रेसला काँग्रेसचे इंजिन?; भाजप- शिवसेनेपुढे युतीचा पर्याय

सातारा - जिल्हा परिषद निवडणुकीचा बिगुल वाजल्याने पक्षीय पातळीवर हालचाली गतिमान झाल्या आहेत. राष्ट्रवादीने पुन्हा एकदा सत्तेचा गुलाल घेण्यासाठी जोरदार कंबर कसली आहे, तर जिल्हा परिषदेत ठसा उमटविण्यासाठी काँग्रेससह, भाजप, शिवसेनेने जंग सुरू केली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी ‘राजधानी सातारा जिल्हा विकास आघाडी’ एक्‍स्प्रेसची ‘शिट्टी’ वाजविली असून, त्याला काँग्रेसचे इंजिन लागण्याची शक्‍यता बळावली आहे. इतरही पक्ष, संघटनांना ‘आवतंन’ असले, तरी उद्याच्या शरद पवार यांच्या दौऱ्यानंतरच हे चित्र स्पष्ट होईल.

राष्ट्रवादीचे एकला चलो रे...
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा आज कार्यक्रम जाहीर झाल्याने खऱ्या अर्थाने रणधुमाळीचा शंख फुकला गेला आहे. सध्या तरी सर्वच राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप, शिवसेना पक्षाने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेऊन तशी तयारीही केली आहे. राष्ट्रवादीकडून इच्छुकांच्या मुलाखती घेण्याचा कार्यक्रमही लवकरच उरकला जाणार आहे. अजिंक्‍यतारा कारखान्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना साताऱ्यात आणण्याचे नियोजन करून राष्ट्रवादीने दमदार एन्ट्री ठोकली आहे. त्यामुळे खासदार उदयनराजेंची ‘तिरपी चाल’ शरद पवार यांच्या कानावर घालूनच पुढील तयारी केली जाणार आहे. २०१६ वर्ष राष्ट्रवादीसाठी घात ठरले असले, तरी त्यातून सावरत राष्ट्रवादीने ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली आहे. 

उदयनराजेंचे ‘ट्‌विस्ट’
जिल्ह्यात राष्ट्रवादीचा प्रभाव असला, तरी उदयनराजेंनीच ‘राजधानी आघाडी’ची चाल खेळल्याने राष्ट्रवादीपुढे ‘ट्विस्ट’ उभे राहिले आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना शह देत ही आघाडी उभारली जात असल्याने राष्ट्रवादीतील नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. कृषी सभापती शिवाजी शिंदे यांच्यावर राष्ट्रवादीने ठेवलेला अविश्‍वास ठराव उधळताना काँग्रेससह विरोधकांची बांधली गेलेली मोट पुढील निवडणुकीत घट होण्याची चिन्हे आहेत. मात्र, काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे हे विनयभंग प्रकरणामुळे अटकेत असल्याने या आघाडीपुढे अडचणी उभ्या आहेत, तरीही काँग्रेससह इतरांना बरोबर घेऊन ‘राजधानी’ एक्‍स्प्रेस धावण्यासाठी उदयनराजे गटातून प्रयत्न सुरू आहेत. ‘मी गल्लीत नाही, दिल्लीत बोलतो,’ या वाक्‍यातून शरद पवार यांच्याशी थेट चर्चा करत असतो, असे सांगणारे उदयनराजे शरद पवार यांना उद्या भेटणार का? किंवा त्यांच्याशी चर्चा करून कोणता निर्णय घेणार, यावर जिल्हा परिषदेचे राजकारण अवलंबून राहणार आहे. 

काँग्रेस देणार टक्‍कर
विधान परिषद निवडणुकीत मोहनराव कदम यांना उदयनराजेंनी साथ दिली, तर सातारा पालिका राजकारणात उदयनराजेंबरोबर चालत काँग्रेसने जमेची बाजू केली आहे. त्यामुळे काँग्रेससोबत आघाडी होण्याची शक्‍यता उदयनराजे गटातून वर्तविली जात आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार आनंदराव पाटील यांच्या जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी राष्ट्रवादीला टक्‍कर देण्यासाठी कंबर कसली आहे, तरीही माण, खटाव, कोरेगावमध्ये प्रभावी ठरणारे जयकुमार गोरे यांच्याबाबत काय होणार, यावर बरेच ‘घडणार- बिघडणार’ आहे. 

भाजप-शिवसेना युती?
भाजपने पालिका निवडणुकीत यश मिळविल्याने जिल्हा परिषदेत ताकदीने उतरण्याची तयारी केली आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप मंत्र्यांची साथ मिळणार असल्याने जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, अतुल भोसले, पुरुषोत्तम जाधव, डॉ. दिलीप येळगावकर, दीपक पवार यांनी ताकद पणाला लावली आहे. शिवसेनेनेही कमाल ५० जागा लढविण्याच्या तयारी ठेवली आहे. त्यातही भाजप, शिवसेनेने प्रत्येकी १५ जागांवर लक्ष केंद्रित केली आहे. भाजपच्या सोयीच्या युतीला शिवसेनाचा ‘ना ना’ असला, तरी भाजपने ‘मैत्री’चा हात पुढे केला आहे.

उंडाळकर, शंभूराजेंचे काय?
माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर हे कोणती भूमिका घेणार, यावर कऱ्हाड दक्षिणमधील राजकारण अवलंबून असणार आहे. शंभूराज देसाई हे शिवसेनेत असले, तरी शिवसेनेला बरोबर घेऊन ‘धनुष्य बाण’ हाती घेणार का, यावर शिवसेनेचे भवितव्य अवलंबून आहे. उदयनराजेंचे कार्यकर्ते दोघांनाही आघाडीसाठी संपर्कात आहेत. मात्र, उंडाळकरांचे राजकीय भवितव्य पणाला लागले असल्याने त्यांनीही अस्तित्व दाखवून देण्यासाठी हालचाली गतिमान केल्या आहेत. 

२०१२ मधील संख्याबळ
अध्यक्ष - सुभाष नरळे (राष्ट्रवादी)
उपाध्यक्ष - रवी साळुंखे (उदयनराजे गट)
राष्ट्रवादी- ३९
काँग्रेस- २१ 
पाटण विकास आघाडी- तीन
चार अपक्ष (उंडाळकर गटाचे दोन व दीपक पवार, मंगल घोरपडे)
 

बलाबलाची अशी उलथापालथ
पाच वर्षांत राजकीय उलथापालथ होऊन सुरेंद्र गुदगे, अविनाश मोहिते यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने काँग्रेसच्या चिन्हावर विजयी झालेल्या शोभना गुदगे, अनुराधा लोकरे यांची बेरीज राष्ट्रवादीच्या पारड्यात पडली. अतुल भोसले भाजपमध्ये गेल्याने त्यांचे समर्थक राजकुमार पवार यांची गणना भाजपमध्ये होत आहे. उंडाळकर गटाचे दोन अपक्ष निपक्ष राहिले. राष्ट्रवादीतील शिवाजी शिंदे हे भाजपमध्ये, तर राहुल कदम राष्ट्रवादीपासून चार हात लांब गेले.

Web Title: zp election movement