राष्ट्रवादीचाच गजर वाजणार?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

भाजप, कॉंग्रेसच्या जागांकडेही लक्ष, साडेअकराला पहिला निकाल

भाजप, कॉंग्रेसच्या जागांकडेही लक्ष, साडेअकराला पहिला निकाल
सातारा - जिल्हा परिषदेच्या 64 व पंचायत समित्यांच्या 128 जागांसाठी उद्या (गुरुवारी) मतमोजणी होत आहे. सकाळी साडेअकरापासून निकाल हाती येतील. मिनी विधानसभेच्या या आखाड्यात कोण बाजी मारणार याचीच जिल्ह्यात उत्सुकता आहे. सर्वच पक्षांचे नेते दिवसभर आकड्यांची जुळवाजुळव आणि सत्तेची गणिते कशी जुळतील याचे अंदाज बांधत होते. राजकीय अंदाजानुसार राष्ट्रवादी कॉंग्रेस हा सर्वाधिक जागा मिळविणारा पक्ष राहील. दुसऱ्या क्रमांकावर भाजप येणार, की कॉंग्रेस राहणार याविषयी उत्सुकता आहे.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात चुरशीने 68.90 टक्के मतदान झाले. गेल्या पंचवार्षिकच्या तुलनेत ही टक्केवारी 1.78 ने वाढली आहे. आता वाढलेला हा टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार याचीच उत्सुकता आहे. या वेळी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी विरोधात कॉंग्रेस, भाजप आणि शिवसेना अशा लढती झाल्या. पाटण व सातारा विकास आघाडीने पाटण व सातारा तालुक्‍यांत निवडणूक लढली. निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात कॉंग्रेसने कऱ्हाड दक्षिणमध्ये उघड, तर फलटणला छुपी युती केली. या सर्व घडामोडीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील मतदारांनी कोणाच्या पारड्यात आपले मत टाकले हे उद्याच्या निकालातून स्पष्ट होणार आहे. या मिनी मंत्रालयाच्या आखाड्यात कोणता पक्ष बाजी मारेल. याचीच गणिते जुळविण्यात नेते व त्यांचे कार्यकर्ते व्यस्त होते. पक्षांचे प्रमुख नेते व पदाधिकाऱ्यांनी तर गट व गणनिहाय आकड्यांची जुळवाजुळव करण्याबरोबरच सत्तेची गणिते कशी जुळतील याचे आडाखे बांधत बसले होते. राष्ट्रवादीकडून पुन्हा जिल्हा परिषदेवर आपलाच झेंडा फडकेल, अशी आशा आहे, तर कॉंग्रेसला गेल्यावेळच्या तुलनेत यावेळेस आपली सदस्य संख्या वाढण्याची अपेक्षा आहे. आजपर्यंत कधीही जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सत्तेत नसलेला भाजपला सत्ते स्थान मिळविण्याचे भाकित करत आहे.

शिवसेनेला आपला चंचूप्रवेशही मोठे यश देणारा ठरणार आहे. एकूणच जिल्हा परिषद व पंचायत समितीतील सत्ता स्थान कोणाकडे राहणार हे उद्याच्या मतमोजणीत स्पष्ट होणार आहे. यातूनच हुकमी एक्का कोण हे स्पष्ट होईल.

Web Title: zp election ncp satata