जिल्हा परिषदेचे नवीन सभागृह तरुण, सुशिक्षित

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - जिल्हा परिषदेच्या नवीन सभागृहात केवळ तीन सदस्य वगळता बाकी सर्व चेहरे नवीन असणार आहेत. यातील बहुतांश उमेदवार हे उच्चशिक्षित आणि तरुण आहेत. नवीन सभागृहातील २४ वर्षांचे विनय पाटील सर्वांत तरुण सदस्य असणार आहेत; तर माजी उपाध्यक्ष बंडा आप्पा माने यांनी ८१ व्या वर्षी पुन्हा सभागृहात पदार्पण करत ज्येष्ठ सदस्याचा मान मिळविला आहे. जिल्हा परिषदेसाठी निवडून आलेल्या सदस्यांपैकी बहुतांश सदस्य उच्चशिक्षित आहेत. ४० पेक्षा कमी वय असणाऱ्या उमेदवारांची संख्या अधिक आहे.

एकीकडे राजकारणात शिक्षित, चांगली तरुण पिढी पुढे येत नसल्याची सार्वत्रिक तक्रार केली जाते. मात्र जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीत ती फोल ठरली. या वेळी दोन मतदारसंघ कमी झाल्याने सदस्यांची संख्या ६७ इतकी आहे. यामध्ये बहुतांश सदस्य हे ४० वर्षाच्या आतील असून शिक्षित आहेत. यामध्ये इंजिनिअर, प्राध्यापक यांचाही समावेश आहे. 

यूपीएससीचा अभ्यास करणाऱ्या प्रियांका पाटीलसारख्या तरुणीने जिल्हा परिषदेच्या निवडणूक रिंगणात उतरून मिळविलेले यश जिल्हा परिषदेच्या राजकारणात चर्चेचा विषय आहे. राधानगरी तालुक्‍यातील राशिवडे बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आलेले विनय पाटील यांना सुरुवातीपासून सामाजिक कार्याची आवड आहे.

विद्यार्थिदशेपासून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. ते बी.ई. सिव्हिल असून प्राध्यापक आहेत. विद्यमान सभागृहात त्यांच्या मातोश्री दीपा पाटील सदस्या आहेत. हा मतदारसंघ आरक्षणातून सुटल्यानंतर या ठिकाणी इच्छुकांची संख्या प्रचंड होती. विनय पाटील यांनीही या मतदारसंघातून उमेदवारी मागणी केली होती. त्यामुळे या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी द्यायची, असा प्रश्‍न नेत्यांना पडला होता. परंतु विनयच्या मातोश्री दीपा पाटील या विद्यमान सदस्य असल्यामुळे त्यांच्या घरात उमेदवार देण्याचा निर्णय नेत्यांनी घेतला आणि नेत्यांचा हा निर्णय योग्य असल्याचे विनय पाटील यांनी निवडून येऊन दाखवून दिले. त्यांचे वय केवळ २४ वर्ष असल्यामुळे सभागृहातील ते सर्वांत तरुण सदस्य ठरणार आहेत.

दत्तवाड (ता. शिरोळ) जिल्हा परिषद मतदारसंघातून विजयी झालेले बंडा आप्पा माने सर्वांत ज्येष्ठ सदस्य ठरले आहेत. त्यांचे वय ८१ वर्षे असून, तरुणांना लाजवेल, अशी त्यांची काम करण्याची पद्धत आहे. श्री. माने यापूर्वी याच मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते. जिल्हा परिषदेचे १९९७ मध्ये उपाध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. त्याला दहा वर्षांचा कालावधी झाला. दहा वर्षांनंतरही त्यांनी त्यांच्या लोकप्रियतेमध्ये काही फरक पडू दिला नसल्याचे या वेळच्या निवडणूक निकालावरून दिसून येते.

Web Title: zp new member educatied