सकाळच्या शुकशुकाटानंतर शांततेत मतदान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

कऱ्हाड तालुक्‍यात १६५ उमेदवारांसाठी ४३४ केंद्रांवर मतदान; किरकोळ वादावादी 

कऱ्हाड - जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आज सकाळी साडेसात वाजता उत्साहपूर्ण वातावरणात मतदानाला सुरवात झाली. पहिल्या टप्प्यात बहुतांश मतदान केंद्रांवर शुकशुकाटच होता.

त्यानंतर सकाळी १० पासून केंद्रांवरील गर्दी वाढू लागली. किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता दुपारपर्यंत शांततेत मतदान झाले. मोठ्या आणि संवेदनशील गावांत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने कोणताही अनुचित प्रकार दुपारपर्यंत घडला नाही. 

कऱ्हाड तालुक्‍यात १६५ उमेदवारांसाठी ४३४ केंद्रांवर मतदान; किरकोळ वादावादी 

कऱ्हाड - जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आज सकाळी साडेसात वाजता उत्साहपूर्ण वातावरणात मतदानाला सुरवात झाली. पहिल्या टप्प्यात बहुतांश मतदान केंद्रांवर शुकशुकाटच होता.

त्यानंतर सकाळी १० पासून केंद्रांवरील गर्दी वाढू लागली. किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता दुपारपर्यंत शांततेत मतदान झाले. मोठ्या आणि संवेदनशील गावांत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने कोणताही अनुचित प्रकार दुपारपर्यंत घडला नाही. 

कऱ्हाड तालुक्‍यात जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी १६५ उमेदवार मतदारांचा कौल आजमावण्यासाठी निवडणूक रिंगणात आहेत.

तालुक्‍यातील ४३४ मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. आज सकाळी साडेसात वाजता मतदानास प्रारंभ झाला. त्यापूर्वी काही ठिकाणी उमेदवार तर बहुतांश ठिकाणी उमेदवार प्रतिनिधींच्या उपस्थितीत मतदान केंद्रांवर मॉकपोल घेण्यात आला. सकाळी मतदान केंद्रावर बहुतांश ठिकाणी शुकशुकाटच जाणवला. त्यानंतर मात्र मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा वाढू लागल्या. सकाळी दहापासून मतदानाला गती आली. उमेदवारांचे समर्थक मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते.

मतदारांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी वाहनांचीही व्यवस्था केली होती. दुपारनंतर महिलांची मोठी गर्दी झाली. गट व गणांसाठी दोन वेळा मतदान करायचे असल्याने मतदानासाठी थोडा वेळ लागत होता. त्यामुळे रांगा कमी होत नव्हत्या.

रेठऱ्यात ‘टाइट फिल्डिंग’
रेठरे बुद्रुक - रेठरे खुर्दसह बुद्रुकमध्ये मतदानासाठी गर्दी दिसत होती. सकाळच्या टप्प्यात स्थानिक नेत्यांनी व दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी मतदारांना बाहेर काढून केंद्रावर आणण्यासाठी घाई लावली होती. त्यासाठी मोठी वाहने वापरली जात होती. परगावातील मतदार आणण्यासाठीही विशेष सोय करण्यात आली होती. भारतीय जनता पक्षाचे अतुल भोसले, कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, माजी अध्यक्ष मदनराव मोहिते, डॉ. इंद्रजित मोहिते, राष्ट्रवादीचे नेते व अविनाश मोहिते यांचे वेगवेगळे गट गावात आहेत. त्यामुळे चौकात त्यांच्या समर्थकांची गर्दी होती. प्रत्येकाच्या हालचाली तो तो गट टिपत होता. कोण कधी, कुठं गेलाय, तो कोणाला सोबत घेवून आलाय, याची माहिती ते घेत होते. स्थानिक नेते चौकातील सावलीलाच खुर्च्या टाकून स्थिती नियंत्रणात आणण्याचे काम करत होते. मतदान केंद्रावर बोगस मतदान करणाऱ्यावर जोरदार आक्षेप घेतला जात होता. त्यामुळे तेथेही कार्यकर्त्यांची फिल्डिंग टाइट होती. पोलिस बंदोबस्तही चोख होता. एकही वाहन केंद्राजवळ येवू दिले जात नव्हते. थोडा जरी वाद झाला तरी पोलिस त्यात हस्तक्षेप करून त्यांना हुसकावून लावत होते. वडगाव हवेली, कार्वेत नेहमीच मतदानाची घाई दिसते. यंदा मात्र कार्वेत उत्साह कमी दिसत होता. वडगाव हवेलीत नेहमीचीच रस्सीखेच दिसत होती. दोन्ही गटांचे कार्यकर्ते एकमेकांसमोर ठाण मांडून होते. दोन्ही बाजूंनी मतदारांना आणण्याची सोय केली होती. त्यामुळे मतदार आणण्याची घाई दिसत होती. प्रत्येकाला निरोप पोचवण्यासाठी स्वतंत्र सोय करण्यात आली होती. स्थानिक नेते त्यावर नियंत्रण ठेवून होते. तेथे पोलिस बंदोबस्तही चोख होता. 

काल्यात गर्दीचा माहोल  
काले - सकाळपासून भागात मतदानासाठी गर्दी होती. येथील महात्मा गांधी विद्यालयात सगळीच केंद्र असल्याने तेथे गर्दीचा माहोल होता. स्थानिक नेते दयानंद पाटील व नानासाहेब पाटील केंद्राच्या तोंडावरच स्वागतासाठी थांबले होते. येणाऱ्यांना नमस्कार करून ते स्वागत करत होते. त्यातूनही काहींना खुणावून सांगण्याच्या त्यांच्या हालचाली होत्या. मतदारांना केंद्रापर्यंत आणण्यासाठी तीन व सहा आसनी रिक्षा, स्कार्पिओ, टाटा सुमो, व्हॅनसारखी वाहने होती. सुमारे दहा हजारांच्या आसपास मतदान येथे आहे. त्यातील एक हजार पाचशे मतदान सकाळी साडेअकरापर्यंत झाले होते. त्यामुळे मतदारांत उत्साह होता. पोलिसांनी चांगलाच बंदोबस्त ठेवला होता. कर्मवीर पुतळा चौकात कोणालाही थांबून देत नव्हते. पोलिस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर परिसरात पॅट्रोलिंग करत होत्या. त्यामुळे येथे शांततेत मतदान सुरू होते. वाठारसह काले भागात राष्ट्रवादीचे नेते राजेश पाटील-वाठारकर वाठारला फिरून मतदानाची आकडेवारी घेवून कार्यकर्त्यांना चार्ज करत होते. तेथील स्थानिक नेते आम्हीच लिड घेवू असे ठासून सांगत होते. 

तांबवे, मुंढे, सुपनेत तणावच 
निवडणुकीच्या कारणावरून काल दिवसभरात तांबवे, मुंढे, सुपने, बेलदरे फाटा येथे काही घटना घडल्या. त्यामुळे आज तेथील वातावरण दिवसभर तणावाचेच होते. त्या परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांमध्ये मतदानासाठी फारसा उत्साह जाणवत नव्हता.  

येळगाव गटात मोठा फौजफाटा
कऱ्हाड - येळगाव जिल्हा परिषद गटातील चुरशीच्या लढतीमुळे मतदानासाठी सकाळपासूनच मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांचे पुत्र व कऱ्हाड तालुका विकास आघाडीचे उमेदवार ॲड. उदयसिंह पाटील व राष्ट्रवादीचे उमेदवार ॲड. आनंदराव ऊर्फ राजाभाऊ पाटील मतदान केंद्राबाहेर थांबून होते. सकाळपासूनच लोक उत्साहाने मतदानासाठी येत होते. त्यामुळे केंद्रावर रांग दिसून येत होती. सैदापूर गटात सैदापूर, गोवारे आदी भागातील केंद्रावर सकाळी तुरळक गर्दी होती. हजारमाची, पार्ले आदी ठिकाणी मतदानाचा वेग अधिक होता.   

मसूर - उत्साही वातावरणात येथील मतदान केंद्रात शांततेत मतदानास सुरवात झाली. सकाळपासून दुपारपर्यंत मतदानाच्या रांगा पाहायला मिळाल्या. दरम्यान, मतदान यंत्रातील बिघाडामुळे एका केंद्रातील मतदान प्रक्रिया सकाळी पाऊण तास उशिरा सुरू झाली. तसेच यावेळच्या निवडणुकीत दोन ठिकाणचे मतदान केंद्रे अन्यत्र हलवल्याने मतदारांची फसगत होत होती. 

कोपर्डे हवेली - येथे चुरशीची लढत असल्याने मतदानासाठीही सकाळपासूनच मतदारांना बाहेर काढून चुरशीने मतदान होत असल्याचे दिसून आले. दुपारी एकपर्यंत काही केंद्रावर ५० टक्‍क्‍यांहून अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतदान केंद्रावरच्या रांगा सकाळपासून दिसून येत होत्या. सर्वच उमेदवार मतदान केंद्रावर थांबून होते. 

शिरवडे - परिसरात शांततेत मतदान झाले. यशवंतनगर, शिरवडे येथील केंद्रात किरकोळ वादावादीचे प्रसंग झाले. मतदान प्रक्रिया उत्साहात सुरू झाली. 

व्होटर स्लीपच नाहीत 
कऱ्हाड तालुक्‍यातील सर्व गावांत मतदानाच्या आदल्या दिवशी निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे मतदारांना व्होटर स्लीप वाटण्यात येतात. यावेळी मात्र वारुंजीतील काही ठिकाणांसह अन्य काही गावांतही मतदारांना व्होटर स्लीप देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे उमेदवारांच्या बूथवर स्लीप घेण्यासाठी मोठी गर्दी होत होती. त्यातून तटस्थपणे मतदार करणाऱ्यांची मोठी अडचण झाल्याचेही दिसून आले.  

नेत्यांच्या भेटी 
मतदानादरम्यान आज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार बाळासाहेब पाटील, माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर, भाजपचे चिटणीस अतुल भोसले यांच्यासह काही नेत्यांबरोबरच उमेदवारांनीही विविध ठिकाणच्या केंद्रांना, कार्यकर्त्यांना भेटी देऊन माहिती घेतली.  

पोलिसांनी बूथ हलवले 
मतदान केंद्राच्या १०० मीटर बाहेर उमेदवारांच्या समर्थकांनी बूथ लावायचे असते. मात्र, त्या रेषेच्या आत काही ठिकाणी उमेदवारांच्या समर्थकांनी बूथ लावले होते. पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने ते बूथ हलवण्यास संबंधितांना भाग पाडले. त्यादरम्यान किरकोळ वादावादीही झाली.

Web Title: zp & panchyat committee election in karad