आगामी काळात "राज' कोणाचे!

श्रीकांत कात्रे  - t@shrikantkatre
गुरुवार, 12 जानेवारी 2017

रामराजे, पृथ्वीराज की उदयनराजे? जिल्ह्याच्या नेतृत्वासाठी प्रमुख नेत्यांची लागणार कसोटी

रामराजे, पृथ्वीराज की उदयनराजे? जिल्ह्याच्या नेतृत्वासाठी प्रमुख नेत्यांची लागणार कसोटी
सातारा - जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजल्याने जिल्ह्याच्या राजकारणातील घडामोडी वेगवान होणार असून, जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले असल्याने प्रमुख नेत्यांच्या दृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची आहेच, त्याशिवाय भविष्यात जिल्ह्याच्या राजकारणाची सूत्रे कोणत्या नेत्याकडे जाणार, यासाठी ही निवडणूक कलाटणी देणारी ठरणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी कॉंग्रेससह भारतीय जनता पक्षाचा प्रयत्नही महत्त्वपूर्ण ठरणार असतानाच खासदार उदयनराजे भोसले यांची राजधानी जिल्हा विकास आघाडी काही तालुक्‍यांची समीकरणे बदलून टाकणार का, याकडेही सर्वांचे लक्ष आहे. विधान परिषदेचे अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाची कसोटी या निवडणुकीत पणाला लागणार आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली. आतापर्यंत सुप्त अवस्थेतील हालचाली उघडपणे सुरू होऊन राजकीय रंग अधिक ठळक होत जातील. जिल्हा परिषेदत सध्या सत्ता राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असली, तरी शेवटच्या सत्रात सत्ताधारी राष्ट्रवादीला दुफळीने ग्रासले. कॉंग्रेसची सदस्य संख्या लक्षणीय असली, तरीही जिल्हापातळीवर कॉंग्रेसकडे एकसंध चित्राचा अभाव आहे. भारतीय जनता पक्षाचे स्थान आतापर्यंत नगण्य वाटत असले, तरी नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीतून जिल्ह्याच्या राजकारणात केलेला शिरकाव इतरांनी दखल घ्यावा असाच ठरला आहे. शिवसेनेच्या गोटात तुलनेत विस्कळितपणाच अधिक आहे. त्याशिवाय इतर पक्ष सर्व जागा लढविण्याची सुतराम शक्‍यता नाही. खासदार उदयनराजे भोसले यांनी निवडणुकीपूर्वीच जिल्हा विकास आघाडीची घोषणा करून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षापुढे आणि पक्षाच्या स्थानिक नेत्यांपुढे प्रश्‍नचिन्ह उभे केले आहे.

ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण किंवा किसन वीर यांच्या काळात त्यांचा शब्द प्रमाण मानून जिल्हा हलत असे. त्यानंतरच्या काळातही प्रतापराव भोसले, विलासराव पाटील उंडाळकर, काही प्रमाणात अभयसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाचा जिल्ह्यात दबदबा राहिला. गेल्या काही वर्षांत मात्र जिल्ह्याचे नेतृत्व कोणत्या नेत्याकडे आहे, या प्रश्‍नाचे उत्तर शोधावे लागेल, अशी परिस्थिती आहे. जिल्ह्यावर सत्ता राष्ट्रवादी कॉंग्रेसची असल्याने पक्ष ठरवेल तो नेता. मंत्रिमंडळात समावेश झाल्यास तो नेता अशी वेळ आली. मातब्बर नेत्यांना आपल्या तालुक्‍यातच विरोधकांना थोपविण्यासाठी प्रयत्न करावे लागल्याने जिल्ह्याच्या राजकारणात रस असला, तरी कोणालाही ते शक्‍य होऊ शकले नाही. त्यामुळे नेते आपापल्या मतदारसंघापुरते सीमित झाले. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते रामराजे नाईक निंबाळकर, कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी आपापल्या परीने जिल्ह्यासाठी काही भूमिका घेतली आहे, तरीही जिल्ह्याचे एकमुखी नेतृत्व म्हणून अनेक कारणांनी मर्यादा आल्या आहेत. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमुळे पुन्हा असे नेतृत्व खंबीरपणे पुढे येणार का, याविषयी राजकीय गोटात उत्सुकता आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले झाल्याने आपल्याच कार्यकर्त्याला कशी संधी मिळेल, यासाठी प्रमुखांनी डावपेच लढविण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या खुल्या राहिलेल्या गटात आधीपासूनच मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. आता त्याला आणखी गती मिळणार आहे.

पक्षीयदृष्ट्या राष्ट्रवादी कॉंग्रेस वर्चस्व टिकविण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सर्व जागा लढविण्याची शक्‍यता आहे. कॉंग्रेसही तसाच प्रयत्न करून स्वबळ दाखविण्यासाठी लढत देईल. भाजप- शिवसेना युतीचा प्रश्‍न अनुत्तरित असला, तरी राज्यातील सत्तेचा फायदा मिळवत भाजप काही मतदारसंघात आपली ताकद लावून जिल्हा परिषदेच्या राजकारणात स्वतःचे स्थान निर्माण करेल. पालकमंत्रिपद असूनही विस्कळित असलेली शिवसेना काही जागांसाठी तरी अस्तित्वाचा लढा देईल. ही राजकीय परिस्थिती असली, तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांची आघाडी सर्वांपुढेच आव्हान उभे करणार आहे. विशेषतः राष्ट्रवादी कॉंग्रेसलाच मोठा संघर्ष करावा लागेल, असे आजचे चित्र आहे.

आज ठरणार का "राष्ट्रवादी'ची दिशा?
सत्तारूढ राष्ट्रवादी कॉंग्रेसपुढे दुफळी आणि बंडखोरी रोखण्याचे आव्हान मोठे असणार आहे. विशेषतः खासदारांची आघाडी स्वतंत्रपणे रिंगणात असेल, तर जिल्हाभर पक्षाची कोंडी होणार आहे. त्यातही पक्षाच्या आमदारांनाच आपला गट, पक्ष सांभाळण्याची कसरत करीत संघर्ष करावा लागणार आहे. पक्षाचे नेते शरद पवार यांच्याशी उदयनराजेंच्या डावपेचांबाबत चर्चा करण्याचे पक्षाकडून नेहमी सांगितले जाते. प्रत्यक्षात मात्र खासदारांविरोधात बोलणे आमदारांसह प्रमुखांना आतापर्यंत शक्‍य झालेले नाही. श्री. पवार उद्या सातारा जिल्ह्यात येत आहेत. या दौऱ्यात काही रणनीती ठरावी, असे नेत्यांना वाटत आहे. श्री. पवार यांच्यासमोर कैफियत कोण मांडणार असा प्रश्‍न आहे. मांडलीच तर श्री. पवार यांची भूमिकाच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या भवितव्याची दिशा ठरविणार आहे.

Web Title: zp & panchyat committee election in satara