डॉ. चोथे यांच्यावर निलंबनाची कारवाई करा - देशमुख

डॉ. चोथे यांच्यावर निलंबनाची कारवाई करा - देशमुख

सांगली - डफळापूर येथे कल्पना लोखंडे या महिलेची प्रसूती करण्यास नकार देणारे डॉ. अभिजित चोथे यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करा. त्यानंतर पुढे आयुक्तांकडे कारवाईचा प्रस्ताव पाठवा. जिल्ह्यातील सर्वच आरोग्य केंद्रांची गटविकास अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करा, असे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी दिले.

जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत आरोग्याच्या प्रश्‍नावर सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेत समस्यांचा पाढा वाचला. त्यात ‘सकाळ’ने सुरू केलेल्या ‘आरोग्यावर सर्जिकल’ या लेखमालिकेतून समोर आलेल्या माहितीचा आधार घेत सदस्यांनी हल्ले चढवले.

डफळापूर येथील प्रकारात त्या महिलेची झालेली हेळसांड, डॉक्‍टरांची भूमिका याबाबत कडक शब्दांत सदस्यांनी हल्ला चढवला. त्यावर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी यांनी चौकशी पूर्ण झाली असून कारवाई प्रस्तावित केली असल्याचे सांगितले. श्री. देशमुख यांनी कारवाईचा प्रस्ताव नंतर द्या, आधी डॉक्‍टर निलंबित करा, असे आदेश दिले. 

मे महिन्यातील सर्वसाधारण सभा जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपाध्यक्ष सुहास बाबर, सभापती तम्मनगौडा रवी पाटील, प्रा. सुषमा नायकवडी, ब्रह्मानंद पडळकर, अरुण राजमाने, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, विक्रांत बगाडे, दीपाली पाटील व्यासपीठावर होते. साऱ्यांनी डफळापूर प्रकरण आणि एकूणच आरोग्य विभागाच्या कारभाराविषयी संतापाची भावना लक्षात घेत या विषयावर गांभीर्याने काम करण्याची गरज असल्याचे कबूल केले.

डफळापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात  बाळंतपणासाठी आलेल्या महिलेला रुग्णालयात दाखल करून न घेता तिला मिरजेला नेण्याचा सल्ला देण्याऱ्या  डॉ. अभिजित चोथे यांच्यावरून घमासान सुरू झाले. आशा झिमुर, शरद लाड, महादेव दुधाळ, सुरेंद्र वाळवेकर, सरदार पाटील, प्रमोद शेंडगे, जयश्री पाटील यांनी एका सुरात हल्ला चढवला. आरोग्य विभागाचे वाभाडे काढले.

जिल्ह्यातील आरोग्य केंद्र आणि उपकेंद्राच्या ठिकाणी डॉक्‍टरांनी निवासी रहात नाहीत, हा ‘सकाळ’ने मांडलेला मुद्दा चर्चेत आला. अशा डॉक्‍टरांवर तातडीने कारवाई करा, असे आदेश देण्यात आले. पदाधिकऱ्यांना रुग्णालयातील कर्मचारी उडवा-उडवीची उत्तर देतात, अनेक डॉक्‍टर बेकायदा खासगी प्रॅक्‍टिस करतात, अशाही तक्रारी करण्यात आल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी डफळापूर प्रकरण अत्यंत गंभीर असून त्याची दखल घेतली आहे. कडक कारवाई केली जाईल, अशी ग्वाही दिली. त्यावर श्री. देशमुख यांनी प्रस्तावित कारवाई पुढे होत राहील आधी निलंबित करा, असे आदेश दिले. 

वत्सला जाधव यांचे अभिनंदन
कल्पना लोखंडे या महिलेची एसटी स्थानकावर प्रसूती करून त्यांच्यासह दोन अर्भकांचा जीव वाचवणाऱ्या निवृत्त परिचारिका वत्सला जाधव यांच्या अभिनंदनाचा ठराव सदस्य प्रमोद शेंडगे यांनी मांडला. अध्यक्षांनी टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन केले. 

एमबीबीएस राहू देत, बीएएमएस लगेच भरा
आरोग्य सभापती तम्मनगौडा रवी पाटील यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्‍टरांच्या रिक्त पदाविषयी नाराजी व्यक्त करत तातडीने लोक भरावेत, अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे केली. एमबीबीएस डॉक्‍टर मिळत नाहीत, हे ठीक. मग बीएएमएस डॉक्‍टर भरा, त्यांना करारावर नेमा, लोक  तयार आहेत, अशी मागणी केली. श्री. राऊत यांनी ती मान्य करत लवकरच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून कार्यवाही केली जाईल, असे स्पष्ट केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com