‘प्राथमिक’मध्ये रिक्‍त पदांचा डोंगर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

सातारा - प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या कार्यक्रमांतर्गत गुणवत्ता वाढीसाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे. मात्र, दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात रिक्‍त पदांचा डोंगर उभा होत आहे. विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक यांची तब्बल २१६ पदे रिक्‍त असून, त्यामध्ये मेअखेर आणखी भर पडणार आहे. त्याचा परिणाम प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमावर होत आहे.  

शालेय शिक्षण विभागामार्फत नवनवीन उपक्रम राबविले जातात. मुलांच्या प्रगतीसाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम राबविला जात आहे. त्यात प्रधान सचिव नंदकुमार यांनी सहावी ते आठवीपर्यंतची १०० टक्‍के मुले ७५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त प्रगत झाली पाहिजे, असे उद्दिष्ट दिले आहे. शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनाही त्यांनी कानपिचक्‍या दिल्या आहेत. मात्र, सध्या विस्तार अधिकाऱ्यांवर अनेक कामांचा बोजा आहे. जिल्ह्यात श्रेणी वर्ग दोनची ४१ पदे मंजूर असून त्यातील ११ पदे रिक्‍त आहेत. श्रेणी तीनची ३७ पदे मंजूर असून, तब्बल ३२ पदे रिक्‍त आहेत. केंद्र प्रमुखांची २२३ पैकी ७८, मुख्याध्यापकांची २५४ पैकी ९५ पदे रिक्‍त आहेत. हाच मोठा अडथळा प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमामध्ये उभा आहे. एकाच कर्मचाऱ्याकडून दोन-तीन विषयांचे व व्यक्तींची कामे करावी लागत आहेत. मे महिन्यात अनेक केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक सेवानिवृत्त होणार असल्याने या रिक्‍त पदांमध्ये अजून भर पडेल. शालेय शिक्षण विभागाने ही पदे भरण्याची आवश्‍यकता आहे.

रिक्त पदांची आकडेवारी
 श्रेणी वर्ग दोन    ११
 श्रेणी वर्ग तीन    ३२
  केंद्रप्रमुख    ७८
 मुख्याध्यापक    ९५

Web Title: zp primary education department empty post