पिंपरी-चिंचवड : यंदा गणेशोत्सवात हे महत्त्वाचे 'संस्कार' नागरिकांमध्ये रूजवले जातायेत

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 27 August 2020

  • कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात 17 हजार 546 मूर्तीदान 

पिंपरी : नदी प्रदूषण रोखण्यासाठी मागील 27 वर्षांपासून शहरात संस्कार प्रतिष्ठान हे मूर्तीदान आणि निर्माल्य जमा करण्याचे काम करीत आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यावर्षी देखील त्यांनी हा उपक्रम राबवला असून, दीड दिवस आणि पाचव्या दिवसापर्यंत तब्बल 17 हजार 546 हजार मूर्तीदान झालेल्या आहेत. मूर्तींचे आकडेवारी पाहता एकूणच मूर्तीदानाचे 'संस्कार' भाविकांच्या मनावर रुजल्याचे दिसून येत आहे. 

'डोळे शिणले, तरी न्याय मिळेना'; गरवारे नायलॉन कंपनीच्या कामगारांची व्यथा

गणरायाच्या मूर्ती पर्यावरण पूरक नसल्याने त्यांच्या विसर्जनामुळे नदी प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होते. हे पाणी मानवी शरीरात गेल्यास अनेक प्रकारचे रोगही होऊ शकतात. हे रोखण्यासाठी संस्कार प्रतिष्ठान मूर्तीदानाचा उपक्रम अभिनव ठरत आहे. गणेशोत्सव काळात दीड दिवसांचे, पाच, सात, नऊ आणि अखेर अनंत चतुर्थीला असे टप्प्याटप्याने विसर्जन सुरू असते. त्याकाळात नदी घाटावर मोठी गर्दी असते. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गर्दी टाळणे महत्त्वाचे आहे. त्यासाठीच महापालिकेने मूर्तीदान करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत थेरगाव येथील घाटावर बिजलीनगर, रस्टन कॉलनी, काकडे पार्क, श्रीधरनगर, मोरया गोसावी परिसर, वाकड, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, प्राधिकरण, मोशी, चिखली-जाधववाडी, निगडी, वैभवनगर घाट या परिसरातील गणेश भक्तांचा मूर्तीदान करण्याकडे कल दिसून आला. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मागील वर्षी एक हजार 766 मूर्तीदान झाल्या होत्या. या वर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संस्कार प्रतिष्ठानकडे 17 हजार 546 भाविकांनी 17 हजार 546 गणपती मूर्तींचे दान केले. साडेतीन टन निर्माल्य जमा झाले. विनोदेवस्ती-वाकडमधील एका तळ्यात विधिवत पूजा करून या मूर्तींचे विसर्जन केले आहे. यामुळे नदी प्रदूषण रोखण्यात काही प्रमाणात यश मिळत आहे. प्रतिष्ठानच्या सहा वाहनांपैकी चार वाहनांची थेरगाव घाटावर व्यवस्था केली आहे. दोन फिरती वाहने ठेवली आहेत. संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मोहन गायकवाड म्हणाले, ""डॉ. डी. वाय. पाटील. फार्मसी महाविद्यालयाचे विद्यार्थी मिळून मूर्तीदानाचा आणि निर्माल्य जमा करण्यात मदत करतात.'' 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 17 thousand 546 ganesh idol donation due to corona in pimpri chinchwad