esakal | 'अनुकंपा' उमेदवारांचं 6 दिवसांचे प्रशिक्षण आयुक्तांच्या परवानगीअभावी रखडले
sakal

बोलून बातमी शोधा

st

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 37 उमेदवारांचे अनुकंपातत्वावर निवड होऊनही प्रशिक्षण गेल्या दीड वर्षांपासून रखडले आहे.

'अनुकंपा' उमेदवारांचं प्रशिक्षण आयुक्तांच्या परवानगीअभावी रखडले

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

पिंपरी चिंचवड- घरातील कर्त्या पुरुषाचा सेवा बजावताना मृत्यू झाल्यास त्याच्या घरातील एकाला अनुकंपातत्वावर नोकरी दिली जाते. कुटुंबाची होरपळ होऊ नये म्हणून शासन अनुकंपातत्वावर एकाला नोकरी देऊन उदरनिर्वाहाचे साधन पुरवते. पण, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात अनुकंपातत्वावर निवड होऊनही 37 उमेदवारांचे प्रशिक्षण गेल्या दीड वर्षांपासून रखडले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून अशाप्रकारचे प्रशिक्षण घेण्यास मज्जाव करण्यात आलाय. त्याचा फटका उमेदवारांना बसत असून त्यांच्यावर अक्षरश: उपासमारीची वेळ आली आहे.

अनुकंपातत्वानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एस टी) मध्ये वाहतूक निरीक्षक, भांडारपाल, लेखाकार आणि प्रभारक या वेगवेगळ्या पदांसाठी निवड करण्यात येत. घरातील कर्ती व्यक्ती गमावल्या नंतर ही नोकरीची संधी देण्यात येते. याअंतर्गत 37 उमेदवारांची निवड प्रक्रिया ही नोव्हेंबर 2019 पासून सुरु झाली. 16 मार्च 2020 रोजी निवडपूर्व 6 महिन्यांच्या प्रशिक्षणाला सुरुवात झाली. पण, कोविड-19 रोगाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन लावण्यात आल्याने उमेदवारांचे प्रशिक्षण पुढे ढकलण्यात आले. त्यानंतर हे प्रशिक्षण 26 ऑक्टोबर 2020 रोजी सुरु झाले आणि 17 एप्रिल 2021 ला ते पूर्ण झाले. पण, शेवटच्या 6 दिवसांच्या अंतिमवर्ग गुण मुल्यांकन प्रशिक्षण राहिले होते. त्यासाठी 16 एप्रिल 2021 रोजी रा प मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था भोसरी येथे उमेदवारांना बोलावण्यात येणार होते. पण, पुन्हा कोविड-19 विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अंतिम टप्प्यातील प्रशिक्षण पुढे ढकलण्यात आले जे आजतागायत सुरु झाले नाही.

हेही वाचा: "PM मोदींच्या हट्टामुळे शेतकऱ्याला रस्त्यावर बसावं लागलं"

6 दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण होताच उमेदवारांना तत्काळ नियुक्ती देण्यात येणार होती, पण ती मिळत नसल्याने उमेदवारांवर उपासमारीची वेळ आली आहे. घरातील कर्ती व्यक्ती गमावल्यानंतर कुटुंबाची जवाबदारी उमेदवारांच्या खांद्यावर आली आहे. पण, उमेदवारी अद्याप रखडली आहे. प्रशिक्षणा दरम्यान उमेदवारांना विद्यावेतन मिळत होते ते ही बंद झाले आहे. निवड झाल्याने सर्व उमेदरावांनी आपली नोकरी सोडली होती. अशा परिस्थितीत उमेदवारांना दुसरीकडे कुठे काम ही करता येत नाहीये. उमेदवारांकडे उत्पन्नाचे काही दुसरे साधन नसल्याने बिकट परिस्थिती झाली आहे.

हेही वाचा: 'LNG भविष्यातील इंधन, दरवर्षी एका वाहनामागे ११ लाखांची बचत'

6 महिन्यांचे प्रशिक्षण आणि नियुक्ती यासाठी उमेदवार 18 महिन्यांपेक्षा जास्त काळ वाट पाहत आहोत. अजून किती दिवस उमेदवारांना असच घरी बसून राहावं लागेल याची कल्पना नाही. 37 उमेदवारांपैकी 5 महिला उमेदवार आहेत, ज्यांची परिस्थिती सुद्धा वेगळी नाहीये. उमेदवारांनी एसटी महामंडळाकडे पाठपुरावा केला. तसेच त्यांनी पिंपरी-चिंचवड आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे निवेदन सादर केले. त्यांना प्रशिक्षण सुरु करु देण्याची विनंती केली. पण, आणखी त्यांच्या विनंतीला प्रतिसाद मिळालेला नाही. अशा परिस्थितीमुळे उमेदवार निराश झाले आहेत. मनात आत्महत्येचा विचार येत असल्याचं काही उमेदवारांनी बोलून दाखवलंय. त्यामुळे सरकारने यात लक्ष घालून 'अनुकंपा' दाखवावी अशी मागणी उमेदवारांनी केली आहे. दरम्यान, एसटी महामंडळाकडून उमेदवारांचे प्रशिक्षण घेण्याची तयारी दाखवण्यात आली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 15 जुलैपर्यंत प्रशिक्षण संस्था बंद ठेवण्याचा निर्णय आयुक्तांकडून घेण्यात आलाय. त्यामुळे आयुक्तांनी परवानगी दिल्यास उमेदवारांचे प्रशिक्षण सुरु करण्यात येईल, असं एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितलं.

loading image