esakal | Corona : मावळातील कळकराई निम्मी पॉझिटिव्ह

बोलून बातमी शोधा

कोरोना पॉझिटिव्ह.

गावातील ७२ जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

Corona : मावळातील कळकराई निम्मी पॉझिटिव्ह!
sakal_logo
By
रामदास वाडेकर

कामशेत : कळकराईतील ग्रामस्थ एकमेकाच्या संपर्कात आल्याने थंडी तापाने फणफणले आहेत. थंडी, ताप, डोकेदु:खी, घशात खवखव आणि अंगदु:खीने गावकरी त्रस्त आहेत. या गावातील ७२ जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. मावळातील आरोग्य यंत्रणा या दुर्गम गावात जाऊन येथील ग्रामस्थांची तपासणी करून औषधोपचार करीत आहे.

औषधोपचाराने बरे न वाटणाऱ्या रुग्णांनी सरकारी किंवा खासगी रुग्णालयात उपचार करून घ्यावे, असा सल्ला देत आहेत. या दुर्गम गावात आरोग्य विभागाचे कर्मचारी तीनवेळा आले आहेत. येथील रुग्णांची तपासणी करीत आहेत. मागील आठवड्यात येथील ग्रामस्थांनी दूषित पाण्यामुळे गावकरी आजारी पडत असल्याचे आरोग्य यंत्रणेला संपर्क साधून कळविले होते. ग्रामस्थांची ही व्यथा ‘सकाळ’ने छायाचित्रांसह प्रसिद्ध केली होती. त्याची दखल घेत आरोग्य विभागाने शुक्रवारी कळकराईत गोळ्या औषधे पोच केली. शनिवारी एक पथक तपासणीसाठी दाखल झाले.

हेही वाचा: पुणे-मुंबई महामार्गावरील ढाबा पोलिसांकडून सील

हेही वाचा: लग्न समारंभात नियमांचे उल्लंघन; लोणावळा पोलिसांकडून कारवाई

येथील नागरिक कोरोना पॉझिटिव्ह येत असल्याचे तपासणीत निष्पन्न झाल्यावर त्यातील एका महिलेला तातडीचे उपचारासाठी कर्जत येथील शासकीय रुग्णालयात दाखल केली. पण तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची आरोग्य विभागाने दखल घेत डॉ. राजू तडवी, डॉ. उमेश काळे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ शीतल रढे, वैशाली ढोरे, आरोग्यसेवक बी. एम. मकांदार, आशावर्कस सविता ढोंगे यांच्या पथकाने पुन्हा दोन वेळेस गावात येऊन रुग्णांची तपासणी केली. डॉ. राजू तडवी म्हणाले, ‘‘आमचे पथक तीन वेळेस येथे आले. आतापर्यंत आम्हाला ७२ रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आम्ही त्याना योग्य गोळ्या औषधांचे नियोजन करून दिले आहे. आवश्यकतेनुसार त्यांना दवाखान्यात अ‍ॅडमिट होण्याचा सल्ला दिला आहे.’’