
पिंपरी : स्वच्छता प्राधान्यतेसाठी क्षेत्रिय स्तरांवर ८ पथके
पिंपरी ः शहर स्वच्छतेला प्राधान्य देऊन, क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी रस्त्यांची दररोज प्रत्यक्ष पाहणी करावी. स्वच्छता व स्थापत्य विषयक कामांना प्राधान्य द्यावे. आठ क्षेत्रिय कार्यालयस्तरावर आठ तपासणी पथक तयार करून साफसफाई कामांबाबत तपासणी केली जाणार आहे. या कामांच्या परीक्षणासाठी नियोजन आराखडा तयार करण्याच्या सूचना आरोग्य विभागास केली आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.
महापालिकेच्या आरोग्य व स्थापत्य विषयक विकास कामांबाबत आयुक्त कक्षात आढावा बैठक झाली. त्यास महापौर उषा ढोरे, उपमहापौर हिराबाई घुले, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, पक्षनेते नामदेव ढाके, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, शहर अभियंता राजन पाटील, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय, सहायक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते. त्यावेळी आयुक्त पाटील यांनी क्षेत्रीय कार्यालयनिहाय माहिती मांडली. स्थापत्य व आरोग्य विभागाशी संबंधित कामे दिवाळीपूर्वी प्राधान्याने पूर्ण करावीत, अशी सूचना महापौरांनी केली.
पदाधिकाऱ्यानी मांडल्या व्यथा
अनेक रस्त्यांवर सांडपाणी वाहिन्यांचे चेंबर समतल नाहीत
रस्ता दुरुस्तीत पॅच वर्क व्यवस्थित होत नाही
पावसाचे पाणी जाण्यासाठी चेंबरची कामे लवकर करावीत
मोकळ्या जागांवर कचरा टाकला जातो
पदपथ व दुभाजकांवरील गवत, कचरा लवकर काढला जात नाही
पदाधिकाऱ्यांच्या सूचना
अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून दिवाळीपूर्वी कामे करावीत
अस्वच्छता आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी
महावितरणच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून कामे करून घ्यावीत
रस्त्यांची कामे करताना चेंबरची पातळी समान करून घ्यावी
अनधिकृत फ्लेक्स, जाहिराती लावणाऱ्यांवर कारवाई करावी