नांदेडवरून ८ ते १० तासाचा उपाशीपोटी प्रवास; भरतीच्या निवड यादीच्या प्रतीक्षेत...

नियोजनशुन्य कारभाराचा फटका हजारो उमेदवारांना बसला
8 to 10 hour journey from Nanded empty stomach Awaiting Health Nurse Recruitment Selection pimpri
8 to 10 hour journey from Nanded empty stomach Awaiting Health Nurse Recruitment Selection pimprisakal

पिंपरी : नांदेडवरून ८ ते १० तासाचा प्रवास, भर उन्‍हात उपाशीपोटी फाटकाबाहेर ताटकळत थांबलोय, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, सकाळपासून भरतीच्या निवड यादीची प्रतीक्षेत आहोत...रात्री मुक्कामाची सोय नाही.. मात्र महापालिका प्रशासनाने उमेदवारासाठी काही सोय केली नाही. या नियोजनशुन्य कारभाराचा फटका हजारो उमेदवारांनी बसला आहे, असे सांगत होते नांदेडवरून आलेले उमेदवार अजय सर्जे. त्यांच्याप्रमाणेच आरोग्य सेविका भरतीसाठी राज्‍यभरातून आलेल्या सुमारे अकराशे उमेदवारांना आज (ता.१९) मनस्ताप सहन करावा लागला.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात १७ तारखेपासून विविध प्रवर्गातील उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत. गुरूवारी (ता.१९) मागासवर्गीय उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले होते. पण ६७ जागांसाठी ११५० उमेदवार आले होते. प्रशासनाच्या नियंत्रणेबाहेर गर्दी गेली होती. सकाळपासूनच प्रेक्षागृहाच्या आतील बाजूस सगळ्या महिला उमेदवार लहान मुलाबाळांसोबत बसल्या होत्या. काही जण ज्येष्ठ आपल्या मुलीला तर काही पती आपल्या पत्नीला थेट मुलाखतीसाठी घेऊन आले होते. प्रत्येकजण दुपारच्या प्रहरी आडोश्‍याला बसलेली दिसून आली.

सकाळी सात वाजल्यापासून प्रेक्षागृहाच्या फाटका बाहेर गर्दी जमली होती. तासनतास उन्हात थांबल्यामुळे अनेकांना त्रास झाला. पिण्याच्या पाण्याची सोय न केल्यामुळे गैरसोय झाली. मी ‘आशा सेविका’ आहे, माझ्याकडे शासकिय नोकरीचा अनुभव आहे, तरीही मला नाकारल्याचे अकलुजच्या गंगा नारायण दणाणे सागंत होत्या. मुलाखतीसाठी सकाळी अकराची वेळ दिली होती, पण दुपारी दोन वाजेपर्यत अर्जच जमा करून घेत होते. त्यानंतर मुलाखतीसाठी आत सोडण्यात आल्याचे बीडच्या शितल पोळ सांगत होत्या. निवड यादीत कशामुळे डावलेले , याचा खुलासा प्रशासनाने केला पाहीजे, अस संगमनेरच्या वैशाली जगन्नाथ साळवे म्हणत होत्या. वनिता उपदेशे म्हणाल्या, ‘‘मुलाखतीला एवढा उशीर झाल्यांमुळे बीड ला जाण्यासाठी ट्रेन मिळणार नाही, या शहरात नातेवाईक नाहीत, मुक्कामी थांबण्याची सोय नाही. अनेकांना शासकिय अनुभव नसल्यामुळे नाकारल्याचे अनुभव काहींनी सांगितला. तर नवीन उमेदवाराचे अर्जच फेकण्यात आल्याचे परभणीच्या जया पवार सांगत होत्या.

ही होती भरती

पिपंरी चिंचवड पालिकेच्या कॉर्पोरेशन हेल्थ अॅण्ड फॅमिली वेल्फेअर सोसायटी अंतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) सुरु आहे. यासाठी आरोग्य सेविका (एएनएम) पदाच्या ८८ जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी थेट मुलाखतीतून महिला उमेदवारांची निवड केली जाणार आहे. ही भरती कंत्राटी स्वरुपाची असणार आहे.

उमेदवाराच्या गाड्यांवर कारवाई

प्रेक्षागृहाचे फाटक बंद केल्यामुळे अनेकांनी बाहेर वाहने पार्क केली होती. नो पार्किंगमधील वाहनांवर ट्रॅफिक पोलिसांनी कारवाई केली. गाड्या डोळ्यासमोर उचलून नेल्यामुळे अनेक परीक्षार्थी हवालदिल झाले होते. भरतीच्या परीक्षेतून पास होत नाही, तोच दुसऱ्या ‘परीक्षे’त उमेदवार सापडल्याचे चित्र पहायला मिळाले.

‘‘अपेक्षेपेक्षा उमेदवार आले होते. त्यांची सगळी सोय केली होती. शेवटपर्यत येणाऱ्या उमेदवारांची मुलाखत आम्ही घेतली आहे. अनुभव आणि गुणांच्या आधारे उमेदवाराची निवड केली जाणार आहे. शासकिय आणि महापालिका प्रतिनिधीं उमेदवारांची अंतिम निवड करतील.’’

-पवन साळवे, अतिरिक्त वैद्यकिय अधिकारी, महापालिका

‘‘महिला उमेदवारांची कदापि गैरसाय केलेली नाही. त्यांच्यासाठी दोन्ही स्वच्छतागृह आणि पाण्याची सोय केली होती. पिण्यासाठी बिसलरी बाटल्यांचेदेखील वाटप आम्ही केले होते.’’

-कांतीलाल वाघेरे, व्यवस्‍थापक, प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com