esakal | 14 ऑक्सिजन प्लॅंटच्या खरेदीसाठी 48 तासांत जमा झाला 13 कोटींचा निधी

बोलून बातमी शोधा

 ऑक्सिजन

14 ऑक्सिजन प्लॅंटच्या खरेदीसाठी 48 तासांत जमा झाला 13 कोटींचा निधी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनाच्या आपत्तीच्या काळात ऑक्सिजन नाही, म्हणून पेशंट हवालदिल झाले आहेत.... प्रशासन त्यासाठी झगडत आहे....अशा परिस्थितीत शहरातील काही उद्योग आणि रुग्णालये एकत्र आली. अवघ्या 48 तासांत सुमारे 13 कोटी रुपयांच्या निधीची तजवीज करून ऑक्सिजनचे 14 प्लॅंट साकारण्याचा त्यांनी मोकळा केला आहे.

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अॅंड अॅग्रीकल्चरचे (एमसीसीआयए) अध्यक्ष आणि पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड रिस्पॉन्सचे सुधीर मेहता यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. ऑक्सिजनचे हे प्लॅंट पुढील सहा दिवसांत शहरात 8-10 ठिकाणी उभारण्यात येतील अन तातडीने रुग्णांना ऑक्सिजन मिळणार आहे. महापालिकेच्या नायडू हॉस्पिटलमध्येही तो उभारण्यात येणार आहे. या सर्व प्लॅंटमधून 14 टन ऑक्सिजन रोज निर्माण होणार आहे. कायमस्वरूपी त्याचा वापर करता येईल. शहर व परिसरातील सहा शासकीय रुग्णालये आणि काही खासगी रुग्णालयांत ते उभारण्यात येतील. त्यासाठी अनेक कंपन्यांनीही पाठबळ दिले आहे.

हेही वाचा: वेल्हे तालुक्यातील रानवडी येथील ४६ वृध्दांची कोरोनावर मात

या बाबत मेहता म्हणाले, शहरात ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असताना, औरंगाबादमध्ये एका कंपनीत 12 प्लॅंट तयार आहेत, असे समजले. एका ग्राहकाने त्याचे पैसे न दिल्यामुळे कंपनीने ते तसेच ठेवले असल्याचे समजेत. तातडीने त्या कंपनीशी संपर्क साधला. सर्व प्लॅंट घेण्याची आम्ही तयारी दाखविली. सुरवातीला त्यांना ते खरे वाटेना. रात्री 10-12 वेळा त्या कंपनीशी बोलणे झाले. सकाळी 10 वाजता आमचा माणूस तेथे पोचला. त्यानंतर कंपनीला खात्री पटली आणि प्लॅंटची खरेदी झाली. दरम्यान विभागीय आयुक्त सौरभ राव, महापौर मुरलीधर मोहोळ, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल आणि काही उद्योग, रुग्णालयांशी संपर्क साधला. सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिला अन निधीही उभा राहिला.

एकूण मागणीच्या तुलनेत आम्हाला उपलब्ध होणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी असले तर, खासगी उद्योग, कंपन्या आणि रुग्णालये एकत्र आली तर काय होऊ शकते, हे यातून दिसून आले आहे. अशाच प्रकारे आम्ही एकत्र येऊन शहरासाठी आणखी काही करणार आहोत, असेही मेहता यांनी सांगितले.

हेही वाचा: कोथरुडच्या कोविड सेंटरमध्ये रुग्णांना मिळतोय मानसिक ओलावा

''कोरोनाच्या काळात बजाज ऑटो आणि फायनान्सकडून आम्ही अनेक उपक्रम राबवित आहोत. औरंबागबादमधील चार प्लॅंटची खरेदी आम्ही केली आहे. नारायणगाव, मंचर, खेड आणि मावळमध्ये ग्रामीण रुग्णालयांसाठी आम्ही प्लॅंट उभारून देत आहोत. ग्रामीण भागातील रुग्णांना तेथेच उपचार मिळावेत, ही त्या मागे भूमिका आहे.''

- पंकज वल्लभ (उपाध्यक्ष - बजाज, सीएसआर)

''पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड रिस्पॉन्स समाजासाठी खूप चांगल्या प्रकारे काम करीत आहे. त्यात आमचाही खारीचा वाटा असावा आणि समाजाला मदत व्हावी, या भूमिकेतून आम्ही तीन ऑक्सिजन प्लॅंट स्पॉन्सर केले आहेत. ''

- सुजीत जैन (संचालक - मायलॅब, नेट सर्फ)