रुग्णांकडून अधिक दराने बिले आकारणाऱ्या 21 खासगी रुग्णालयांवर पिंपरीत कारवाई 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 30 September 2020

-रुग्णांकडून अधिक दराने बिले आकारणाऱ्या 21 खासगी रुग्णालयांवर महापालिकेची कारवाई 
-नागरिकांची एकूण एक कोटी 40 लाख रुपयांची बिले केली कमी 

पिंपरी ः कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांकडून उपचारापोटी प्रमाणापेक्षा अधिक दराने बिले आकारण्याचा प्रकार शहरातील खासगी रुग्णालयांकडून सुरू आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील अशा 21 खासगी रुग्णालयांना महापालिका प्रशासनाने नोटीस बजावून कारवाई केली आहे. तसेच, प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड आकारला आहे. उपचाराच्या बिलांपोटी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून वसूल केलेले एकूण एक कोटी 40 लाख रुपयांची बिले कमी केली आहेत. शिवाय, संबंधित रुग्ण व नातेवाईकांना ती रक्कम परत केली आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. 

राजसाहेबांच्या भेटीने मनसैनिकांना दहा हत्तींचे बळ

कोरोना संसर्ग झाल्यानंतर बहुतांश नागरिक खासगी रुग्णालयांत उपचार घेत आहेत. मात्र, त्यांच्याकडून बिलापोटी भरमसाठ रक्कम वसूल केली जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयातील उपचाराच्या दराबाबत राज्य सरकारने खासगी रुग्णालयांसाठी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार बिल आकारणे रुग्णालयांना बंधनकारक केले आहे. तरीही काही रुग्णालये वेगवेगळ्या कारणांसाठी पैशांची वसुली करीत आहेत. 

खासगी रुग्णालयांत घेतलेल्या उपचारांच्या बिलांबाबतच्या तक्रारी निवारणासाठी विभागीय आयुक्तांच्या आदेशावरून एका आयएएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र लेखापरीक्षण पथक नियुक्त केले आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी तीन सदस्यीय लेखा परीक्षण समिती नियुक्त केली आहे. तसेच, महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश असलेले भरारी पथके नियुक्त केली आहेत. यामध्ये तपासणीसाठी व वैद्यकीय माहिती देण्यासाठी डॉक्‍टरांचीही नियुक्ती केली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खासगी रुग्णालयांच्या बिलांची तपासणी करणाऱ्या पथकांनी गेल्या महिन्याभरात प्राप्त तक्रारींनुसार कारवाई केली आहे. संबंधित रुग्णालयांत जाऊन पाहणी केली आहे. बिलांची तपासणी केली. अधिक बिले आकारलेल्या रुग्णालयांवर कारवाई केली. याबाबत महापालिका आयुक्त हर्डीकर म्हणाले, सरकारने निश्‍चित केलेल्या दरानुसार दर आकारणी करणे अपेक्षित आहे. मात्र, काही रुग्णालय अवाजवी पद्धतीने बिलाची वसुली करीत आहेत. तक्रारी तपासून कारवाई केली जात आहे. ज्यांना अधिक रकमेची बिले आकारली आहेत. त्यांनी पालिकेकडे आवश्‍यक कागदपत्रांसह तक्रार करावी. 

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: action against 21 private hospitals for charging higher rates from patients