मोशीतील आरटीओ कार्यालयात एजंटची कर्मचाऱ्याला धक्काबुक्की!

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 14 February 2021

कार्यालयातील दरवाजे जोरजोरात वाजवून, आरडाओरडा करीत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. 

पिंपरी : शिकाऊ परवान्यासाठी आलेल्या उमेदवारांना रांगेत न घेता थेट प्रवेश न दिल्याने मोशीतील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला एका एजंटने धक्काबुक्की केली. कार्यालयातील दरवाजे जोरजोरात वाजवून, आरडाओरडा करीत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. 

विवाहेच्छू तरुणांनो सावधान! फसवणूक करणाऱ्या टोळ्या सक्रिय

बबन दत्तात्रेय मिसाळ (रा. मोरेवस्ती, चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत प्रसाद प्रभाकर पवार (वय 34, रा. चिखली प्राधिकरण) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे मोशी येथील आरटीओ कार्यालयात शिकाऊ परवाना विभागात काम करतात. शनिवारी (ता. 14) त्यांचे काम सुरू असताना शिकाऊ परवाना घेण्यासाठी आलेल्या उमेदवारांना नियम लावू नये, कागदपत्र छाननीच्या वेळी रांगेमधून न घेता थेट प्रवेश द्यावा, यासाठी आरोपीने फिर्यादी पवार यांना मोबाईलवरून धमकी दिली. 

हेल्मेट नाही, तर मग होणार कडक कारवाई

त्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास आरटीओ कार्यालयात येऊन पवार यांच्याशी हुज्जत घातली. त्यांच्या हातातील पेन हिसकावून घेत खुर्चीवरून ओढून धक्काबुक्की केली. शिकाऊ परवान्याची संगणकीय चाचणी सुरू असताना हॉलचा दरवाजा जोरजोरात वाजवून तसेच, आरडाओरडा करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agent bewhiskered the employee to rto office in moshi