अजित पवार यांच्याच हस्ते सोडत काढा अन्यथा...: मिसाळ

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 10 January 2021

चऱ्होली, बोऱ्हाडेवाडी व रावेत येथील प्रकल्पांचे काम सरासरी वीस टक्‍क्‍यांपर्यंतच झालेले आहे, असे नमूद करून पत्रकात म्हटले आहे की, सर्व प्रकल्प पूर्ण होण्यास किमान दीड ते दोन वर्षांचा कालावधी लागेल. त्यातच रावेत प्रकल्पाचा विषय न्यायप्रविष्ट आहे.

पिंपरी : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या नियोजित प्रकल्पांतील सदनिकांची सोडत सोमवारी (ता. 11) आहे. राजशिष्टाचाराप्रमाणे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सोडत निघाली पाहिजे, अन्यथा हा कार्यक्रम राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष होवू देणार नाही, असा इशारा महापालिका विरोधी पक्षनेता राजू मिसाळ यांनी दिला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चऱ्होली, बोऱ्हाडेवाडी व रावेत येथील प्रकल्पांचे काम सरासरी वीस टक्‍क्‍यांपर्यंतच झालेले आहे, असे नमूद करून पत्रकात म्हटले आहे की, सर्व प्रकल्प पूर्ण होण्यास किमान दीड ते दोन वर्षांचा कालावधी लागेल. त्यातच रावेत प्रकल्पाचा विषय न्यायप्रविष्ट आहे. असे असताना सदनिकांची संगणकीय सोडतीची घाई सत्ताधारी भाजप पदाधिकारी का करत आहेत? शहरातील गोर गरीब जनतेला आशेला लावून ठेवण्याचा हा प्रकार आहे. महापालिकेची सार्वत्रिक निवडणुक वर्षभरावर आली असताना आम्हीच कसे जनतेच्या हिताची कामे करीत आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न सत्ताधारी भाजप पक्ष करीत आहे.

दरम्यानच्या काळात पालिकेत सत्तांतर झाल्यानंतर मागील चार वर्षाच्या काळात शहरातील विकास कामे लांबच परंतु कचरा, आरोग्य, पाणीपुरवठा या पायाभूत सुविधांचाही बोजवारा उडाला आहे. मागील काळात राष्ट्रवादीने जी कामे मार्गी लावली होती, ती आता पूर्ण होत आहेत. त्याची उद्‌घाटने सत्ताधारी भाजप करीत सुटला आहे. ही उद्‌घाटने करत असताना स्वतः सुसंस्कृत म्हणविणारे भाजपचे पदाधिकारी मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कार्यक्रमास निमंत्रीत करण्याचेही औचित्य दाखवित नाहीत.

'क्षमता नसेल, तर ऑफलाइन परीक्षा घ्या'; अधिसभा सदस्यांनी विद्यापीठ प्रशासनाला घेतले फैलावर

शहरासाठी पाटील यांचे योगदान नाही
शहरासाठी ज्यांचे काडीचेही योगदान नाही. पुण्याचे पालकमंत्री असताना पिंपरी-चिंचवड शहराकडे ढुंकूनही पाहिले नाही, अशा चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सोडत काढण्यात येणार आहे. हे केवळ द्वेषाचेच राजकारण आहे. आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष ही दादागिरी खपवून घेणार नाही. महापालिकेच्या प्रत्येक विकासकामाचे भूमिपूजन अथवा उद्‌घाटन राजशिष्टाचाराप्रमाणे अजित पवार यांच्या हस्ते घेण्याबाबत आम्ही आग्रही राहू. अन्यथा सदर कार्यक्रम आम्ही होऊ देणार नाही हे भाजपने लक्षात ठेवावे, असे राजू मिसाळ यांनी पत्रकात म्हटले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar should inauguration of draw of Flats under PM Aavas yojana otherwise, warn Misal