'क्षमता नसेल, तर ऑफलाइन परीक्षा घ्या'; अधिसभा सदस्यांनी विद्यापीठ प्रशासनाला घेतले फैलावर

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 9 January 2021

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ऑक्‍टोबर महिन्यात अंतिम वर्षाची परीक्षा ऑनलाइन घेताना विद्यार्थ्यांना त्यांच्या सोईने मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटरवर परीक्षा देण्याची मुभा दिली, पण विद्यार्थ्यांवर कोणतेही नियंत्रण नसल्याने सामूहिक कॉपीचे प्रकार घडले.

पुणे : "अंतिम वर्षाची परीक्षा घेताना विद्यार्थ्यांनी एकत्र बसून पेपर सोडविले, ज्या विद्यार्थ्यांना अडचणी आल्या त्यांना व्यवस्थित उत्तरे मिळाली नाहीत. विद्यापीठाने ऑनलाइन परीक्षा घेताना संबंधित कंपनीला काम दिले, पण तिची क्षमता होती का? असे प्रश्‍न उपस्थित करत विद्यापीठ प्रशासनाला फैलावर घेतले. जर विद्यापीठाची क्षमता नसेल आणि गुणवत्ता राखली जाणार नसले, तर येणाऱ्या प्रथम वर्षाची परीक्षा ऑफलाइन घ्या, असा सल्ला अधिसभा सदस्यांनी विद्यापीठाला दिला.

दहावी पास विद्यार्थ्यांनो, ITI ऍडमिशनसाठी करा ऑनलाइन अर्ज; वाचा सविस्तर​

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ऑक्‍टोबर महिन्यात अंतिम वर्षाची परीक्षा ऑनलाइन घेताना विद्यार्थ्यांना त्यांच्या सोईने मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटरवर परीक्षा देण्याची मुभा दिली, पण विद्यार्थ्यांवर कोणतेही नियंत्रण नसल्याने सामूहिक कॉपीचे प्रकार घडले. त्यामुळे विद्यार्थ्यांचा निकाल ही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याचे पडसाद अधिसभेत उमटले. ऑनलाइन परीक्षेची यंत्रणेवर, गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केले. त्यावर खुलासा करताना प्रॉक्‍टर्ड मेथडने परीक्षा घेऊ नये यासाठी दबाव होता, असे कुलगुरूंनी सांगितले. त्यावर सदस्यांनी आक्षेप घेतला.

लडाखमध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भारतीय सैन्याने चीनी सैनिकाला पकडले!​

गिरीश भवाळकर म्हणाले, ''प्रॉक्‍टर्ड मेथड नसल्याने विद्यार्थ्यांना भरपूर गुण मिळाले, त्यांच्या पूर्वीच्या आणि आताच्या गुणांमध्ये तफावत आहे. हे एकप्रकारे विद्यापीठाच्या स्वाभिमानाला आव्हान देणारे असून, अंतिम वर्ष परीक्षेत प्रॉक्‍टर्ड मेथड कोणामुळे नव्हते याचा खुलासा केला पाहिजे.''

'प्रॉक्‍टर्ड मेथड'ने परीक्षा घेऊ नये असे आदेश कोणी दिले हे स्पष्ट झालेच पाहिजे. शिक्षणाचा दर्जा राखताना असे प्रकार गंभीर आहेत, अशी टीका बागेश्री मंठाळकर यांनी केली.

परीक्षेमध्ये काठिण्य पातळीचा विचार केला गेला पाहिजे. त्यासाठी ऑफलाइन परीक्षा घ्यावी हे सांगतानाच दादाभाऊ शिनलकर यांनी त्यांच्या परिसरातील विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने कॉपी केली याची उदाहरणे बैठकीत दिली. संतोष ढोरे यांनीही याचे दाखले बैठकीत दिले.

देशातील सर्वात महागड्या शाळा; ज्यांची फी आहे लाखोंच्या घरात!​

अभिषेक बोके म्हणाले, "आपली ऑनलाइन परीक्षा घेण्याची तयारी नसेल, तर ऑफलाइन परीक्षाच घ्यावी, ऑनलाइन परीक्षा घेणे व्यवहार्य नाही.''

दबाव कोणाचा याचे उत्तर नाही
प्रॉक्‍टर्ड पद्धतीने परीक्षा घेऊ नये असा विद्यापीठ प्रशासनावर 'वरून' दबाव होता, असे बैठकीत सांगितल्यानंतर सदस्यांनी याबाबत प्रश्‍न उपस्थित केले. पण याचे उत्तर अखेरपर्यंत मिळाले नाही.

- पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे - क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If quality not maintained then take exam offline Senate members advised Pune University