कोरोनामुळे नागपंचमी अन् श्रावण सोमवारही घरीच; महिलांचा हिरमोड

सुवर्णा नवले
Wednesday, 22 July 2020

  • मंगळागौर अन्‌ नागपंचमीही आता घरीच
  • पारंपरिक खेळांच्या आठवणीत रमल्या महिला

पिंपरी : मंगळागौर म्हणजे नवविवाहितांसह सर्व महिलांसाठी आनंदाची, उत्साहाची पर्वणी. श्रावण महिन्यातील पहिला मंगळवार म्हणजे विविध पारंपरिक खेळांची रेलचेल. सुंदर पारंपरिक वेशभूषा परिधान करून एकत्रितपणे मनसोक्त खेळण्याचा आनंदच निराळा आहे. झपाट्याने काळ बदलला, तरी कित्येक शतके सणांचा गोडवा आजतागायत आहे. मात्र, लॉकडाउनने मंगळागौर व नागपंचमीच्या आनंदावर विरजण घातलं. खऱ्या अर्थाने उत्स्फूर्तपणे सण साजरा करणाऱ्या महिलांच्या मनाला चांगलाच चटका लागला आहे.

लॉकडाउनचा सदुपयोग; 70 व्या वर्षी लिहिल्या त्यांनी 40 कविता

---------------------

कौतुकास्पद : कोरोनाशी लढण्यासाठी तरुण अभियंत्यानी बनवलं 'सॅनिशूटर', कसं काम करत वाचा

---------------------

नोकरदार महिलांना करावी लागतेय दुहेरी कसरत, लॉकडाउनमध्येही नव्हती उसंत

मंगळागौरमध्ये लाट्या बाई लाट्या सारंगी लाट्या, अठूडं केलं गठूडं केलं, वटवाघूळ फुगडी, तवा फुगडी, आगोटापागोटा, साळुंकी, घोडा हाट, झिम्मा, टिपऱ्या, फुलपाखरू, तांदूळ सडू बाई तांदूळ सडू, खडकावरचं पाणी, गाण्यांच्या भेंड्या, असा श्रावण मासामधील महिलांचा दिनक्रम सध्या हुकला आहे. सकाळीच भल्या सकाळी उठून गोड-धोड बनविणे. नंतर पूजेची तयारी. त्यानंतर ठरविलेल्या ठिकाणी सर्वांनी एकत्रित जमणे. दिवसभर खेळ खेळून मनसोक्त आनंद लुटणे. रात्रभर जागरण करणे. नागपंचमीला घरातून बाहेर पडून एकत्रित झोके खेळणे, गाणी म्हणणे या उत्साहाला महिला परक्‍या झाल्या आहेत. या खेळांमधून महिलांसाठी उत्साहाचं गाठोडं तयार होतं. एकप्रकारे शारीरिक व्यायामातून त्यांना स्फूर्ती मिळते. ती थांबली आहे.

हे सारं झालं मिस...

लॉकडाउनच्या काळात वटपौर्णिमा, गुढीपाडवा, नागपंचमी, चैत्रगौरीचं हळदी-कुंकू, मंगळागौर अन्‌ आता येणारी नागपंचमी, भावा-बहिणीचा आवडता राखीपौर्णिमेचा सण, भाद्रपदातील गौरी गणपती हे सर्वच आता महिला मिस करू लागल्या आहेत. खासकरून वर्षानुवर्षे शहरात विविध सण साजरे करणारे क्‍लब व ग्रुप या आठवणीत रमले आहेत. काहींनी व्हिडिओ कॉल व ऑडिओच्या माध्यमातून सण साजरे करण्याचे ठरविले आहे. काहींनी या विषयावर गप्पाटप्पा मारून त्या शेअर केल्या आहेत. काही जणींनी श्रावणमासातील व्रत वैकल्यांवर कविता रचल्या आहेत.

महिलांनी हिरमुसून न जाता घरच्या घरी सण उत्साहात साजरे करावेत. प्रत्येक सणाकडे सकारात्मक पाहिल्यास बळ मिळेल. या पुढील चारही मंगळवारी घरीच पूजन करावे लागणार आहे. उखाणे रेकॉर्ड करावेत. एकमेकींना कॉल करून आनंद द्विगुणित करावा. लॉकडाउनमध्ये खूप काही शिकण्यासारखे आहे. वेळ न दवडता विविध प्रयोग करावेत. धैर्य वाढवून मनोबल उंचावेल यासाठी प्रयत्न करावा.
- मधुरा शिवापूरकर, निवेदिका, कुंदननगर

Edited by : Shivnandan Baviskar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: all festivals have to celebrated at home due to corona