असं कसं चालेल : आंदोलनांची ’स्‍टंटबाजी' आता पुरे झाली..!

Agitation
Agitation

प्रसिद्धी पत्रकं काढणं आणि आंदोलनांचे स्टंट करणं म्हणजेच महापालिकेचा कारभार चालविणं किंवा शहराचा विकास असा भलताच समज अनेकांचा झालेला असावा. कारण असं नसतं तर सत्ताधाऱ्यांपासून विरोधकांपर्यंत आणि माजी पदाधिकाऱ्यांपासून कुठल्याशा कार्यकर्त्यांपर्यंत कोणीही पत्रकबाजी केली नसती. बरं यात आरोप-प्रत्यारोप, निषेध आणि आंदोलनाचे इशारे या पलीकडं काहीच नसतं.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘...अन्यथा आयुक्तांच्या केबिनमध्ये डुकरे सोडणार’, अशा इशाऱ्याचं एक पत्रक भाजपच्या पदाधिकाऱ्यानं या आठवड्यात काढलं आहे. वास्तविक एक पत्रक म्हणून दुर्लक्षित करण्यासारखाच हा विषय. मात्र, आपण निवडून दिलेल्या लोकांची वैचारिक झेप किती आहे? हे जनतेला समजायला हवं. म्हणूनच दखल. शहराला असे स्टंट नवे नाहीत. भटक्‍या कुत्र्यांचा प्रश्‍न मांडण्यासाठी राष्ट्रवादीच्या एका नेत्याकडून कुत्र्यांची पिल्लं पिशवीत भरून महापालिका सभागृहात आणणं, नगरसेवकांनी पाळीव कुत्र्यांसह मोर्चा काढणं, शिवसेनेच्या एका नगरसेवकानं वैद्यकीय अधिकाऱ्याच्या टेबलवर डुक्कर ठेवणं, भर चौकात महागाईचं श्राद्ध घालणं असे प्रकार गेल्या पावणेचार वर्षांपासून सुरूच आहे. यात सत्ताधारीही मागे नाहीत. एका महापौरांना निवडीचा इतका अत्यानंद झाला होता की त्यांनी शेकडो पोती भंडारा महापालिकेत उधळला. महापालिका आवारात दोन नगरसेवकांनी कचऱ्याचे ट्रक आणून ओतले होते. 

जलपर्णी आणून फेकणे, अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासणे, पाणीपुरवठा प्रश्‍नांवरून अधिकाऱ्यांना डांबणे, शोले स्टाइल उपोषण, शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशासह शिक्षण विभागात शिरणे, महापालिकेच्या डॉक्‍टरांना मारहाण, अधिकाऱ्यांना शिवीगाळ अशीही स्टंटबाजी केली आहे.

पत्रकबाजीची बाधा 
याचाच पुढचा भाग म्हणजे प्रसिद्धी पत्रके. अनेक आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि पक्षांच्या नेत्यांना पत्रकबाजीची बाधा झालेली आहे. वृत्तपत्रात दररोज नाव नाही आलं, तर आपलं राजकीय भवितव्य संपुष्टात येईल की काय? असा भयगंड त्यांच्यात निर्माण झाला असावा. त्यामुळंच चावून चोथा झालेल्या विषयांवर आंदोलनाचा इशारा किंवा नाराजी किंवा प्रतिक्रिया देण्याची सवय झाली आहे. कोणाकडून तरी खरडून घेतलेली पत्रकं स्वतः:च्या नावावर ही मंडळी काढतात. राजकीय सद्दी झालेले एक नेते तर शहरातील प्रश्‍नांवर दररोज पंतप्रधानांना पत्र पाठवतात आणि पुन्हा प्रसिद्धी 
माध्यमांना देतात. 

वैचारिक अभ्यास आहे कुठे?
आंदोलने झाली पाहिजे, पत्रके निघाली पाहिजेत; पण असली वरवरची काय कामाची? यामुळे एकही प्रश्‍न सुटणार नाही. मार्ग निघणार नाही. प्रश्‍नाच्या समूळ जाऊन भिडण्याइतपत असलेला वैचारिक अभ्यास त्यात हवा. जेणेकरून एखाद्या विषयावर लोकचळवळ उभा रहायला हवी. पिंपरी-चिंचवड शहर आता पूर्वीचे केवळ पाच गावांचे राहिलेले नाही. ते अवाढव्य वाढले आहे. २५ लाख लोकसंख्या होईल. परजिल्हा, परराज्य आणि परदेशातील लोक येथे कायमस्वरूपी वास्तव्यास आहेत. ही संख्या एकूण लोकसंख्येच्या ६५ टक्के आहे. तसेच नवमतदारांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. या साऱ्यांना आणि नव्या पिढीला तुमच्या अशा प्रसिद्धीसाठीच्या स्टंटशी आणि आरोप-प्रत्यारोपांशी देणं-घेणं नाही. दररोज शुद्ध पाणीपुरवठा, चांगली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, चांगले रस्ते, अतिक्रमणमुक्त पदपथ, गुन्हेगारीमुक्त शहर, पर्यावरण वातावरण, लोकाभिमुख योजनांची अंमलबजावणी, आरोग्य सुविधा, साहित्य रसिकता कार्यक्रम हवे आहे. त्यांना तुमची राजकीय करमणूक नको आहे.

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com