Asian Games : आयटी नगरी हिंजवडीच्या सुनबाईची गगनभरारी

चीन येथे झालेल्या आशियायी क्रिडा स्पर्धेत भारताच्या कबड्डी संघातील कबड्डीपटू व आयटी नगरी हिंजवडीच्या सुनबाईने नेत्रदीपक कामगिरीच्या जोरावर सुवर्णपदकाला घातली गवसणी.
snehal shinde sakhare
snehal shinde sakharesakal

- बेलाजी पात्रे

हिंजवडी - चीन येथे झालेल्या १९ व्या आशियायी क्रिडा स्पर्धेत भारताच्या कबड्डी संघातील कबड्डीपटू व आयटी नगरी हिंजवडीच्या सुनबाई स्नेहल शिंदे-साखरे यांनी नेत्रदीपक कामगिरीच्या जोरावर सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. या कामगिरीने स्नेहल यांनी आयटी नगरी हिंजवडीचे व पुण्याचे नाव जगभर उंचावले आहे.

या कामगिरीमुळे हिंजवडी पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण असून स्नेहल यांचे व साखरे कुटुंबियांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मंगळवारी (ता. १०) दिल्लीत स्नेहल व संपूर्ण कबड्डी संघांशी हितगुज साधत कौतुक केले आहे. स्नेहल यांचे बुधवारी (ता. ११) पुणे विमानतळावर आगमन होताच जंगी स्वागत केले जाणार आहे.

त्यानंतर १२ तारखेला त्यांची पुण्यात तर रविवारी (ता. १५) घटस्थापनेच्या दिवशी या नावदुर्गेचा समस्त हिंजवडी ग्रामस्थांच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात येणार असल्याची माहिती त्यांचे पती सागर साखरे यांनी सकाळशी बोलताना दिली.

भारतीय कबड्डी संघाचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी देशभरातून १२ महिला कबड्डीपटूंची अंतिम निवड झाली होती. या खेळाडूंमध्ये महाराष्ट्रातून एकमेव स्नेहल शिंदे-साखरे यांची निवड झाली होती. आजपर्यंत त्यांनी चार वेळा कबड्डी संघामध्ये देशाचे प्रतिनिधित्व करून चार वेळा सुवर्णपदकाची कमाई केलेली आहे.

२०१२-१३ साली महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कारही त्यांना प्राप्त झाला आहे. स्नेहल शिंदे-साखरे या वयाच्या अडीच वर्षापासून जिम्नॅस्टिकला जात. वयाच्या चौथ्या वर्षीच त्यांना कबड्डीची आवड निर्माण झाली. त्यांचे वडील प्रदीप शिंदे यांनी १९८४ साली जमशेदपूर येथे झालेल्या जुनियर बॉक्सिंग नॅशनल स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले आहे. ते पुणे पोलीस दलात अधिकारी आहेत. भाऊ निखिल शिंदे हा देखील फुटबॉल खेळाडू आहे.

सासरीही खेळाला प्रोत्साहन

ऑक्टोंबर २०२१ मध्ये आयटी नगरी हिंजवडीच्या साखरे कुटुंबातील उद्योजक सागर साखरे यांच्याशी स्नेहल यांचा विवाह झाला आणि त्या आयटी नगरीच्या सुनबाई झाल्या. सासरी सासू स्वाती साखरे व पती सागर यांनी लग्नानंतरही त्यांच्या खेळात खंड पडू दिला नाही. कुठलीही आडकाठी न करता त्यांनी वेळोवेळी स्नेहल यांच्या खेळाला प्रोत्साहन दिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com