esakal | आता आंदोलनाचे नगारे आणि हाकारे हवेत कशासाठी ?
sakal

बोलून बातमी शोधा

pimpri

आता आंदोलनाचे नगारे आणि हाकारे हवेत कशासाठी ?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : सशाची शिकार करणं अवघड काम. प्रचंड दमणूक. खूप पळापळ. कायम ट्रिगरवर बोट. आणि सावज टप्प्यात आलेय म्हणून आता गोळी झाडणार इतक्यात तो गिरकी घेतो आणि निसटून जातो. म्हणून म्हटलं जातं सशाच्या शिकारीला जाताना वाघाची तयारी करावी लागते. अन्यथा पक्षीसुद्धा सापडत नाही. पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेसह इतर राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांना शिकार हा प्रकार माहीतच नाही. यामुळं झालं असं की, यांच्यासमोर एकेदिवशी अचानक भाजपसारखा ढाण्या वाघ स्वतःहून पिंजऱ्यात अडकला. तर, त्याला पकडण्याऐवजी सर्वजण पळून गेले. नंतर काही दिवसांनी बसलेत आंदोलनाचे नगारे पिटत आणि हाकारे घालत. दरम्यान, तिकडं वाघानं स्वतःहून सुटका करून घेत पुन्हा सोवळेपणाचा आव आणत सिंहासनावर बैठक मारली आहे.

- अविनाश म्हाकवेकर

महापालिका निवडणूक जिंकायचीच या इराद्यानं २०१७ मध्ये भाजपने भरती सुरू केली. ‘आला माणूस की, घ्या’ या पद्धतीमुळे हौसे, नवसे, गवसे शिरले. अशा या आयातीतून सत्ता मिळाली. मात्र, प्रदेश पातळीवर याचा आनंद राहिलेला नाही. कारण पक्षाचं सोवळंओवळं, विचारधारा इथे कधीच खुंटीला टांगली गेली आहे. त्यामुळं ती मंडळी इकडं कधी फिरकत नाहीत, कारभार कसा चालला आहे? याची विचारणा करत नाहीत.

राज्यात सत्ता होती, त्यावेळी वेळातवेळ काढून काहींना काही कार्यक्रमाच्या निमित्तानं देवेंद्र फडणवीसांपासून सगळेजण यायचे. आता सत्ता नाही. हातात वेळच वेळ आहे, तरीही कोणी फिरकत नाही. यामागे निश्चित काही कारणं असणार. कदाचित ती इथं चाललेल्या कारभारात दडलेली असावीत. किंवा सत्ता चालविणाऱ्यांना जाब विचारण्याचं धारिष्ट्य नसावं किंवा हतबलता आली असावी. यासाठीचं अगदी ताजं उदाहरण म्हणजे स्थायी समितीमधील लाच प्रकरण.

हेही वाचा: Pimpri : मोशी येथे महिलेचा खून केल्याची घटना

पक्षाची पार अब्रू निघाली, तरीही कोणी आलं नाही. पुण्यातून प्रभारी आमदार माधुरी मिसाळ आल्या. चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्याशी काही मिनिटे बोलल्या. भोसरीचे आमदार महेश लांडगे त्यांच्याकडे गेले नाहीत. पत्रकारांशी कोण बोललेच नाही, तरीही प्रवक्त्यांनी हातभर प्रेसनोट फोटोसह पाठविली. त्यात म्हटलं होतं, ‘‘लाच प्रकरणाबाबत मिसाळ यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

आपला सविस्तर अहवाल त्या प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना देतील.’’ यानंतर पुण्यातूनच प्रदेशाध्यक्षांची प्रतिक्रिया आली होती, ‘‘लाचखोरी प्रकरणातील दोषींवर कारवाई करणार. या प्रकरणातील सत्य लवकरच बाहेर येईल व या षडयंत्रामागील चेहरा समाजापुढं उघड होईल.’’

हेही वाचा: सांगली : पैशाच्या वादातून महिलेचा केला खून, नेर्लीतील घटना

सोवळ्याच्या बाता नकोत

लाच प्रकरणाला आता तीन आठवडे उलटून गेले आहेत. मिसाळ यांचा अहवाल तयार झाला की झालाच नाही? झाला असेल तर काय कार्यवाही केली? कोण बोलणार आहे की नाही? या प्रकरणातील सत्य कधी बाहेर येणार आहे? षडयंत्रामागील चेहरा समाजापुढे कधी उघड होणार आहे? ज्यांनी तुम्हाला भरभरून मते दिली, त्यांना तरी नको का सांगायला? नाहीतर लोक समजून जातील अहवाल, चौकशी वगैरे सगळी धूळफेक होती.

एकमात्र, नक्की झालं ‘सब घोडे बारा टक्के!’. कारण पक्षानं अजूनतरी कोणाचा राजीनामा घेतलेला नाही. कोणाला जाब विचारलेला नाही की, उत्तरदायित्व म्हणून मतदारांशी बोललेलं नाही. आता भाजपनं सोवळ्याच्या बाता हाणू नयेत. तो हक्क गमावला आहात.

राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसला मेंटॉरची गरज

गेली साडेचार वर्षे सगळ्या विरोधकांनी निद्रितावस्थेचं सोंग खूप छान वटवलं आहे. राष्ट्रवादी तर सोंग करण्याच्या प्रेमात इतकी पडली आहे की, महापालिका कारभारावर पहारा ठेवण्याचेच विसरली. चार महिन्यांवर निवडणूक आली आहे, तरी मतदारांचे मनोरंजन करण्यात कार्यकर्ते गुंग आहेत. त्यांनी दर बुधवारी महापालिकेजवळ तासभर रंगारंग कार्यक्रम सुरू केला आहे. हे सारे कशासाठी? तर अशा उपरोधिक आंदोलनातून आम्ही सत्ताधाऱ्यांचे वाभाडे काढतो म्हणे. सगळी गंमतच गंमत.

हेही वाचा: महिलेचा गळा आवळून खून, औरंगाबाद तालुक्यातील खळबळजनक घटना

शिवसेनेचीही धग हरवली आहे. मात्र, कधीतरी चार्ज होते. असे असले तरी शहर पातळीवर एकसंध नाही. काँग्रेसलाही हाच शाप आहे. एकही नगरसेवक नसताना गटतट आहेतच. राज्यात सत्ता असतानाही तिन्ही पक्ष कार्यकर्त्यांना दिशा नाही. साऱ्याच पक्षांना एका मेंटॉरची गरज आहे.

स्थायी बैठकीवर बहिष्कार कशासाठी?

भाजपच्या स्थानिक दोन्ही नेत्यांसमोर सगळ्या विरोधकांनी दुबळेपणा स्वीकारला आहे. म्हणूनच त्यांनी सावजाला टप्प्यात घेऊन शिकारीचा कधी प्रयत्नच केला नाही. वास्तविक लाचखोरीत स्थायी समिती अध्यक्ष सापडूनही करेक्ट कार्यक्रम करता आला नाही. खरं म्हणजे इथूनपुढच्या स्थायीच्या बैठकांमध्ये वरचष्मा गाजविण्याची संधी होती.

मात्र, बैठकीवर बहिष्कार टाकत भाजपला रान मोकळंच करून दिलं. मग नाकावर टिच्चून त्याच अध्यक्षाला खुर्चीवर बसवून कोट्यवधींच्या कामांना मंजुरी घेतली. बैठकीवर विरोधकांनी का बहिष्कार टाकला? असा प्रचंड संशय निर्माण करणारा प्रश्न उद्भवतो आहे. शिकार आयती समोर येऊन पडली होती, तरी त्याचा फडशा पाडला नाही. मग आता आंदोलनाचे नगारे आणि हाकारे कशासाठी?

loading image
go to top