
भोसरी : एक महिला तीन लहान मुलांसह भोसरी बीआरटीएस टर्मिनलमध्ये येते. तिथे बराच वेळ खिन्न चेहऱ्याने घुटमळते. ही घुसमट बीआरटीएसच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या लक्षात येते. विचारपूस केल्यावर असं कळालं, की ती महिला सोलापूरहून पतीच्या त्रासाला कंटाळून कामाच्या शोधात इथे आलीय. कर्मचाऱ्यांनी आपुलकीने त्यांना नाश्ता अन् जेवण दिलं. पुढील अनर्थ टाळण्यासाठी अधिकाऱ्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. सुदैवाने, महिलेचा मामा कोथरूडमध्ये असल्याचे कळाले. त्या महिलेला मामांकडे पाठवून बीआरटीएस कर्मचाऱ्यांनी माणुसकी दर्शन घडविले.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
बुधवारी (ता. 23) सकाळी आठ वाजता भोसरीतील बीआरटीएस टर्मिनलमध्ये राधा (बदललेले नाव) या तीन लहान मुलांसह आल्या. मात्र, टर्मिनलवर आल्यावर कोठे जायचे या संभ्रमात त्या तेथेच अश्रू ढाळत बसल्या. ही बाब बीआरटीएस टर्मिनल प्रमुख काळूराम लांडगे यांच्या निदर्शनास आली. लांडगे यांनी त्यांची विचारपूस केल्यावर कळालं, की त्या सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कुर्डू या गावावरून इथे आल्या. पती त्रास देत असल्याने भोसरी गाठलं. कोणतेही काम करून जगायचं, असं राधा यांनी सांगितलं. त्यांच्यासोबत तीन मुले असल्याचे कळल्यावर लांडगे यांच्यासह सुरेश वडेकर, अंतोबा कोठारे, बाळू नेहरे, सचिन जगताप आदी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नाश्त्याची व जेवणाची व्यवस्था केली.
पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
राधा यांचे या ठिकाणी नातेवाईक नसल्याने लांडगे यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिस घटनास्थळी आल्यावर त्यांनी महिलेच्या पतीशी संपर्क साधला. त्याचप्रमाणे त्यांचे मामा कोथरूड येथे राहत असल्याचे कळले. पोलिसांनी मामांशी संपर्क साधला. बीआरटीएसच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना बसभाडे देत मामांकडे पाठविले. मामांनी त्यांची समजूत काढून राधा यांना पुन्हा पतीकडे पाठवले, अशी माहिती कॉन्स्टेबल टेक बहादूर गुरुंग यांनी दिली. पोलिसांनीही त्यांच्या पतीशी संपर्क साधून त्रास न देण्याविषयी सज्जड दम दिला. दरम्यान, बीआरटीएस कर्मचाऱ्यांनी वेळीच लक्ष घातल्याने राधा आपल्या तीन मुलांसह मामांकडे पोहोचू शकल्या. याबद्दल बीआरटीएस कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे.
...म्हणून घर सोडले
राधा यांनी सांगितलं, की पती दारू पिऊन दररोज मारहाण करतो. नवरा बाहेरख्याली असल्यामुळे घर सोडण्याचा निर्णय घेतला. माझी आई भाजीपाला विकून पोट भरते. वडील दारू पितात. भाऊही लहान आहे. त्यामुळे माहेरी कसे जायचे हा प्रश्न होता. म्हणून पुण्याला येऊन काहीतरी कामधंदा करून जीवन जगण्याचा निर्णय घेतला आणि पुण्यात आले.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by Shivnandan Baviskar)