PMP Bogus Pass : भोसरीत पीएमपीच्या बनावट पासचे रॅकेट उघड

भोसरीतील पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बीआरटीएस टर्मिनलवर बनावट पासचेच नुतनीकरण करण्यास आलेल्या तरुणामुळे बनावट पासचे रॅकेट उघड झाले.
PMP Bogus Pass
PMP Bogus Passsakal

भोसरी - भोसरीतील पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बीआरटीएस टर्मिनलवर बनावट पासचेच नुतनीकरण करण्यास आलेल्या तरुणामुळे बनावट पासचे रॅकेट उघड झाले. मात्र बनावट पास तयार करून देणारा वेगळाच इसम असल्याने आणि तो पुणे सोडून गेल्याने पोलिसांत तक्रार दाखल केली नसल्याची माहिती पीएमपीने दिली. मात्र या तरुणाकडून वीस हजार रुपयांचा दंड पीएमपीने वसूल केला.

या तरुणांसह आणखी आठजण एका ठेकेदाराकडे एसी दुरुस्तीचे काम करतात. या कामासाठी पिंपरी-चिंचवड शहर परिसरांसह पुणे शहर परिसरातील काम करण्यासाठी हे कामगार जातात. यासाठी ठेकेदाराने एका कामगाराला नऊ जणांचे पीएमपीचे पास काढण्यासाठी रक्कम दिली होती. या कामगाराने तीन महिन्यांपूर्वी सर्वांचे मूळ पास काढले.

मात्र त्यापुढील महिन्यांत या कामगाराने स्वतःचाच पास काढून त्या पासची झेराक्स काढून इतरांच्या पासला जोडून ठेकेदाराने इतर कामगारांच्या पाससाठी दिलेले पैसे स्वतःच लाटले. दहा दिवसांपूर्वी बनावट पास देणारा हा कामगार ठेकेदाराचे काम सोडून बिहारला गेला.

मात्र पास जुलै महिन्यांत संपणार असल्याने एक कामगार हा बनावट पास घेऊनच त्याचे नूतनीकरण करण्यासाठी भोसरीतील पीएमपीच्या बीआरटीएस टर्मिनलवर गेला. मात्र पास बनावट असल्याचे कृष्णकुमार खाडे व अनिल चौधरी या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी ही बाब बीआरटीएस स्थानक प्रमुख काळुराम लांडगे यांच्या निदर्शनास आणली.

ही माहिती मिळताच पिंपरी मुख्यालय क्रमांक दोनचे प्रमुख सुनील दिवाणजी घटनास्थळी दाखल झाले. या वेळी राजेंद्र भालके, प्रकाश गाढवे, अनिल आंब्रे या पास तपासकांनी एकूण नऊ जणांकडे असे पास असल्याची बाब उघड केली. यासाठी ठेकेदारांकडून वीस हजार रुपयांचा दंड वसूल केला.

वाहकांचे दुर्लक्ष...

बसमध्ये वाहकांद्वारे तिकीट काढत असताना प्रवाशाने पास आहे म्हटल्यावर वाहकांद्वारे बऱ्याच वेळा पास पाहण्यास टाळाटाळ केली जाते. यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून पुणे-पिंपरी-चिंचवड शहर परिसरात बनावट पासने या कामगारांनी प्रवास केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पीएमपीचे आर्थिक नुकसानही होत आहे.

पीएमपीच्या बसमध्ये प्रवाशांची संख्या जास्त आहे. त्यामुळे वाहकाला बसमधील सर्वांचेच पास तपासणे शक्य होत नाही. पीएमपीकडील काही तिकीट तपासणीस निवृत्त झाले आहेत. एक बस तपासण्यासाठी कमीत कमी चार तिकीट तपासणीसांची गरज असते. मात्र पीएमपीकडे तपासणीसांची संख्या कमी असल्याकारणाने बस तपासण्यासाठी दोन किंवा तीन तिकीट तपासणीस असतात. नुकसान टाळण्यासाठी पीएमपीने तिकीट तपासणीसांची संख्या वाढवणे गरजेचे आहे.

- सुनील दिवाणजी, प्रमुख, पीएमपी पिंपरी मुख्यालय क्रमांक दोन.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com