भोसरीकरांनी ठरवलंय, कोणतेच नियम पाळायचे नाहीत अन् लॉकडाउनही...

भोसरीकरांनी ठरवलंय, कोणतेच नियम पाळायचे नाहीत अन् लॉकडाउनही...

भोसरी : राज्य सरकारने १४ ते २३ जुलैपर्यंत लागू केलेल्या लॅाकडाउनमुळे भोसरीत नागरिकांनी किराणामालासह इतर वस्तू खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये केलेल्या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजले. पोलिसी खाक्यांशिवाय नियम पाळायचेच नाहीत, हे जणू भोसरीकरांनी ठरविल्यामुळे महापालिकेने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी घेतलेल्या कोणत्याही निर्णयाला भोसरीकरांनी केराची टोपली दाखविल्याचे आतापर्यंत वेळोवेळी सिद्ध झाले आहे. लॅाकडाउन काळात जर पोलिसांनी भोसरी परिसरात बंदोबस्त ठेवला नाही, तर भोसरीतील नागरिक हाही लॅाकडाउन उधळून लावतील, अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली.

महापालिकेने रविवारी आणि गुरुवारी जनता कर्फ्यूचा आवाहन केले असताना भोसरीकरांनी त्याचा फज्जा उडवत सर्व व्यवहार सुरू ठेवले. आता १४ ते २३ जुलैपर्यंत लॅाकडाउन घोषीत केला आहे. या दहा दिवसाच्या लॅाकडाउनमुळे भोसरीकरांनी किराणामालाच्या दुकानांसमोर खरेदीसाठी प्रचंड गर्दी करत सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडविला. त्यामुळे आळंदी रस्ता, दिघी रस्ता, पीएमटी चौक, पीसीएमटी चौक, गव्हाणे वस्ती, आदिनाथनगर, लांडेवाडी, इंद्रायणीनगर आदी परिसरातील किराणामालाच्या दुकानांवर नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे काही दुकानदारांद्वारे ग्राहकांसाठी सॅनिटायझरची सोय करण्यात न आल्याने संसर्ग वाढण्याचा धोका अधिक बळावला आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिकेने नागरिकांना जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. मात्र, या जनता कर्फ्यूचा भोसरी, इंद्रायणीनगरात बोजवारा उडाल्याचा दिसला. त्यामुळे आता लॅाकडाउनसाठी भोसरी परिसरात पोलिसांचा बंदोबस्त नसल्यास हा लॅाकडाउनचेही भोसरीतील नागरिक हसे करतील, अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी बोलून दाखविली. भोसरीतील पीएमटी चौक, दिघी रस्ता, पुणे-नाशिक महामार्गाचा सेवा रस्ता आदी भागांवर महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाद्वारे गेल्या आठवड्यापासून कारवाई होत आहे. मात्र, अतिक्रमणविरोधी पथकाचे वाहन आल्यावर तेवढ्यापुरते भाजीचे दुकान बंद करत असल्याचे दाखवत अतिक्रमण पथक पुढे गेल्यावर पुन्हा भाजी-फळे विक्रेते रस्त्यावर ठाण मांडून बसलेले दिसतात. त्याचप्रमाणे दुकाने ही सायंकाळी पाच वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. परंतु, पाचनंतरही दुकाने सुरूच असतात. दररोज पाचनंतर पोलिसांचे वाहन परिसरात आल्यावरच दुकानदार दुकाने बंद करतात. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भोसरी, इंद्रायणीनगर परिसरातील दारूच्या दुकानांसमोरही तळीरामांची गर्दी दिसली. सलग दहा दिवस दुकाने बंद ठेवण्यात येणार असल्याने काही तळीरामांद्वारे स्टॅाक करण्यासाठी दारूच्या बाटल्या खरेदी करण्यात येत होत्या. भोसरी, इंद्रायणीनगर परिसरातील लॅाकडाउन यशस्वी करण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांद्वारे करण्यात आली आहे.

Edited by : Shivnandan Baviskar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com