लॉकडाउनमुळे पिंपरीतील ज्येष्ठ नागरिकांचा कट्टा पडला ओस

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 30 September 2020

लॉकडाउनमुळे ज्येष्ठ नागरिक गेल्या सात महिन्यापासून घरातच "लॉक' आहेत. मॉर्निंग वॉक, शतपावलीअभावी कट्टयाशी तुटलेला संपर्क, मित्र-मैत्रिणींसोबत प्रत्यक्ष तुटलेला संवाद. परिणामी ज्येष्ठांची मनःस्थिती "डाउन' झाली आहे.

पिंपरी : लॉकडाउनमुळे ज्येष्ठ नागरिक गेल्या सात महिन्यापासून घरातच "लॉक' आहेत. मॉर्निंग वॉक, शतपावलीअभावी कट्टयाशी तुटलेला संपर्क, मित्र-मैत्रिणींसोबत प्रत्यक्ष तुटलेला संवाद. परिणामी ज्येष्ठांची मनःस्थिती "डाउन' झाली आहे. घर एके घर असेच "डेली रूटिन' बनून गेल्याची खंत बिजलीनगरमधील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक जयवंत भोसले यांनी व्यक्त केली. जागतिक ज्येष्ठ दिना निमित्त जाणून घेऊयात ज्येष्ठ नागरिकांची दिनचर्या.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

ज्येष्ठ नागरिक म्हणतात...
बिजलीनगर ज्येष्ठ नागरिक संघ कार्याध्यक्ष जयवंत भोसले म्हणाले, ""शहरात हजारो ज्येष्ठ नागरिक एकटेच राहतात. त्यांना जीवनावश्‍यक वस्तू, औषधे मिळणे कठीण झाले आहे. आम्ही आता या ज्येष्ठ नागरिकांचा एकटेपणा घालविण्यासाठी दररोज व्हिडिओ कॉल किंवा फोन करून गप्पा मारत असतो.'' 

यमुनानगर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पी. टी. यरगट्टीकर म्हणाले, ""घरातच बसूनच वेळ कसा काढावयाचा याचे नियोजन करतो. आपल्या शालेय जीवनापासून ते नोकरी करत असलेल्या जुन्या आठवणींना उजाळा देतो. दररोज खास मित्रवर्गाला जुन्या आनंदी आठवणी शेअर करतो.'' 

चिंचवड ज्येष्ठ नागरिक संघाचे रमेश डोंगरे म्हणाले, ""मित्रांची भेट होत नाही, पण फोन करून चौकशी करत असतो. दररोज पेपर वाचन, आध्यात्मिक ग्रंथ वाचतो. त्यातून आपल्याला आनंद मिळतो. ''

 राजसाहेबांच्या भेटीने मनसैनिकांना दहा हत्तींचे बळ

प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाचे सूर्यकांत मुथीयान म्हणाले, "" दररोज एक तास व्यायाम व योगा करतो. आध्यात्मिक वाचन करतो. नव्या टेक्‍नॉलॉजीचा वापर करून "झूम मीटिंग'ला उपस्थित राहतो. नातवंडांबरोबर गप्पा मारणे, चिटचॅट करतो. '' 

बिजलीनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रकाश निसळ म्हणाले, ""60-69 वर्षाखालील ज्येष्ठांना नागरिकांना कोरोनामुळे घरीच थांबण्याची वेळी आली. त्यांना हिंडण्या-फिरण्याची भीती वाटते.

लॉकडाउनमध्ये कट्टा सुना 
शहरात ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक कट्टे आहेत. या कट्ट्यांवर हे ज्येष्ठ नागरिक सकाळी आणि सायंकाळी एकत्र येतात. याठिकाणी वाढदिवस साजरे होतात. दर महिन्याला बैठका, अनेक कार्यक्रम, कार्यशाळा घेतल्या जातात. आता गाठी भेटी बंद , बाहेर न फिरणे हेच औषध आहे. परिणामी लॉकडाउनमुळे हे कट्टे सुने पडले आहेत. 

सध्या ज्येष्ठ नागरिकांचे सर्वच कार्यक्रम बंद आहेत. पण प्रत्येकजण फोनच्या माध्यमातून जवळ आहेत. सगळ्यांची विचारपूस होत असल्याने प्रत्येक ख्यालीखुशाली कळते.  
-अरुण बागडे, अध्यक्ष पिंपरी चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघ 

शहरातील ज्येष्ठांची स्थिती 
-ज्येष्ठ नागरिक संघ - 130 
-ज्येष्ठ नागरिक संख्या - 20 हजार 
- विरंगुळा केंद्र - जागेनुसार उपलब्ध


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Big impact on senior citizens due to lockdown