चंद्रकांत पाटील म्हणतायेत, 'पिंपरी-चिंचवडमधील कोरोना वाढीला भाजप जबाबदार नसल्याचं जाहीर करा'

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 13 September 2020

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी शहराला भेट दिली.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना संसर्ग वाढीला महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष जबाबदार नाही. कोरोनाची आमच्यावर काहीच जबाबदारी नाही. राज्य सरकारने मंजूर केलेल्या 1700 कोटी रुपयांच्या कामास मंजुरीस कोण जबाबदार आहे? हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहीर करावे, असे आव्हान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे आणि कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी दिले. 

पिंपरी-चिंचवडमध्ये रुग्णांची रेबीज लशीसाठी धावपळ 

आता पोस्टातून मिळणार शिष्यवृत्तीची रक्कम 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी शहराला भेट दिली. त्या वेळी त्यांनी पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. या बाबत वाघेरे व शितोळे यांनी पत्रक काढून महापालिकेतील सत्ताधारी भाजप व पाटील यांना आव्हान दिले. त्यांनी पत्रकात म्हटले आहे की, कोरोना संसर्ग रोखण्यास महापालिका प्रशासन अपुरे पडत असूनही पाटील यांनी राज्य सरकारला जबाबदार धरले. वास्तविकतः या काळात राज्य सरकारने महापालिकेला 33 टक्के खर्चाची मर्यादा दिली आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून एक हजार सातशे कोटींच्या विकास कामांना भाजपने मान्यता दिली आहे, याला जबाबदार कोण, हे सत्ताधारी भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी जाहीर करावे. कोरोनासही महापालिकेतील सत्ताधारी भाजपची काहीच जबाबदारी नाही, हेही जाहीर करावे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिकेने गेल्या सहा महिन्यांत तीस लाख नागरिकांच्या सुरक्षेसाठी केवळ 150 कोटी रुपये खर्च केले आहेत. भाजपने स्वार्थ साधला आहे. ठराविक सत्ताधाऱ्यांनीच शेकडो कोटी रुपयांची कामे लुटली. त्यामुळे पाटील यांनी महापालिकेतील केवळ विरोधी नव्हे तर, स्वपक्षातही डोकावून पहावे आणि विकासातील अडथळे शोधावेत, असे आव्हानही वाघेरे व शितोळे यांनी दिले आहे. भाजप सुडबुद्धीचे राजकारण करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस म्हणते... 
- महापालिका आयुक्तांनी पाच हजार बेडचे रुग्णालय करावे 
- शहरातील विविध कंपन्यांचे शेड रुग्णालय उभारणीसाठी वापरावेत 
- कोरोना आटोक्‍यात राहण्यासाठी आम्ही सहकार्य करीत आहोत 
- नागरिकांची तपासणी करून ऑक्‍सिजन व व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करावेत 
- भाजपने वैद्यकीय सुविधांवर भर द्यायला हवा होता 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp chandrakant patil says declare bjp is not responsible for the increase in corona in pimpri chinchwad