पिंपरी महापालिकेत काल राडा झालाय अन् पेटलंय राजकारण; काय खरं, काय खोटं? वाचा सविस्तर...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 2 June 2020

- भाजपची वाट काटेरी

- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील चित्र

पिंपरी : कधी नव्हे, ती पिंपरी चिंचवड महापालिकेत फेब्रुवारी २०१७ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची सत्ता आली. सव्वा तीन वर्षांचा कार्यकाल संपला. आता आगामी फेब्रुवारी २०२२ च्या निवडणुकीची तयारी करायला हवी. पण, 'तीन तिघडा आणि काम बिघडा' अशी भाजपची अवस्था झाली आहे. ज्यांच्या जोरावर भाजपने महापालिका ताब्यात घेतली त्या आमदार द्वयींसह महापालिका सत्ताकारणात निष्ठावंत कार्यकर्त्यांचा एक गट सक्रीय आहे. काहीही झाले, तरी पक्षाला गालबोट लागता कामा नये, यासाठी धडपडणाऱ्या या कार्यकर्त्यांच्या आणि सध्या पक्षाची धुरा सांभाळणाऱ्या नेत्यांच्या अपेक्षेवर काल पाणी फिरले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी यांना स्थायी समितीच्याच दोन सदस्यांनी महापालिका भवनातच मारहाण केल्याचे वृत्त आहे. मात्र, ते दोन सदस्य कोण? याबाबत उघड बोलायला कोणीही तयार नाही. परंतु,  हे दोन्ही सदस्य राज्य सरकारमधील दोन घटक पक्षांचे प्रतिनिधी आहेत. त्यामुळे माहिती असूनही कोणीही बोलायला तयार नाही, अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे, मारहाण करणाऱ्यातील एका सदस्याचे शहर भाजपच्या बड्या नेत्याशी हाडवैर आहे. आणि ज्यांना मारहाण झाली ते संबंधित भाजप नेत्याच्या निकटवर्ती आहेत. इतकेच नव्हे तर, त्या नेत्याच्याच इशा-यानुसार संबंधिताने स्थायीवर असताना कारभार केल्याचे बोलले जात आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वादाचा विषय भूसंपादन की टक्केवारी

गेल्या वर्षापासून शहरातील भूसंपादनाचा विषय स्थायी समितीत प्रलंबित आहे. त्यात काही जमिनी भाजप पदाधिकाऱ्यांच्याही आहेत. तो प्रश्न सोडविण्यासाठी भाजपच्या एका नगरसेकानेच पाठपुरावा सुरू केलेला आहे. संबंधित विषय त्यांनीच स्थायीपुढे मांडला आहे. मात्र, भाजपचा तो बडा नेता व सदर नगरसेवक यांचा छत्तीसचा आकडा आहे. त्यांच्या सांगण्यावरूनच भूसंपादनाचा विषय गेल्या वर्षीपासून सतत तहकूब ठेवल्याचा आरोप आहे. खासगी वाटाघाटीने भूसंपादन करावे, अशी भूमिका विषय मांडणाऱ्या नगरसेकाची आहे. तर, भूसंपादनाऐवजी टीडीआर नुसार मोबदला देण्यात यावा, अशी भूमिका त्या स्थायी समिती अध्यक्षाची अर्थात त्यांच्या पाठिराखे नेत्याची आहे. मात्र, अनेक वर्षे भूसंपादन रखडले आणि मोबदलाही मिळालेला नाही, असे जमीन मालकांचे म्हणणे आहे. यावरूनच काल मारहाणीचे प्रकरण घडले, अशी चर्चा आहे. मात्र, हा वाद टक्केवारीवरून झाला असल्याचीही वंदता आहे. खरे कारण, नेमके कोणते? यावरही आता चर्वन सुरू झाले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

भाजपमधील गटतट उघड

सोमवारी महापालिका सर्वसाधारण सभा झाली. साधारणतः सहा तास सभा चालली. सभा संपल्यानंतर महापालिका भवनातील तिसऱ्या मजल्यावर अनेक पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्त जमले होते. या मजल्यावरच महापौर कक्ष, स्थायी समिती कक्ष व विरोधी पक्षनेता कक्ष आहे. पावणे सातच्या सुमारास स्थायी समिती कक्षातून आरडाओरडा ऐकू आला. सर्व जण तिकडे धावले. काय घडले, कोणालाच काही कळेना. संबंधित भाजप पदाधिकाऱ्याला रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर मारहाणीची कुजबुज ऐकू येऊ लागली. मात्र, महापालिका भवनात सायंकाळी घडलेल्या घटनेची फिर्याद द्यावी की नको, याविषयी रात्रभर चर्चा सुरू होती. मारहाण झालेल्या त्या भाजप पदाधिकाऱ्याच्या बाजूने बोलण्यास कोणीही तयार नाही. इतरवेळी पत्रकबाजी करणारे नेतेही गायब झाले आहेत. त्यामुळे ज्याचा हात मोडेल, त्याच्या गळ्यात पडेल, अशी भूमिका काही पदाधिकाऱ्यांनी घेतल्याचे चित्र निर्माण झाले असून भाजपमधील गटतट उघड झाले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp corporator attacked case in pimpri municipal corporation