पिंपरी-चिंचवडमध्ये 'या' विषयावरून भाजप-शिवसेनेत रंगतोय सामना

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 September 2020

ताथवडेतील नवीन रस्त्याच्या निर्मितीवरून महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात पत्रकयुद्ध सुरू आहे.

पिंपरी : ताथवडेतील नवीन रस्त्याच्या निर्मितीवरून महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात पत्रकयुद्ध सुरू आहे. सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांच्यावर टीका केली असून, कलाटे यांनी महापौर उषा ढोरे यांच्यावर पदाचा अवमान करीत असल्याचा आरोप केला आहे. 

पिंपरी-चिंचवड : दापोडीतील हॅरिस पूल आजपासून वाहतुकीसाठी खुला

रस्त्यासाठी जागा नाही : ढाके 

प्रभाग 25 मधील ताथवडे गावठाणापासून जीवनमार्ग ते पुनावळेकडे जाणारा 24 मीटरचा रस्ता विकसित करण्यासाठी वर्षापूर्वी 32 कोटी रुपयांचे काम मंजूर केले आहे. त्याची बहुतांश जागा ताब्यात नसल्याने ठेकेदाराला अवघे एक कोटी 63 लाखांचे काम करता आले आहे. आता पुढील कामांसाठी कोरोना काळात सुमारे शंभर कोटी रुपयांच्या कामाला प्रशासनाने मंजुरी दिली आहे. मात्र, त्यासाठीही जागा ताब्यात नाही, मग पुन्हा रस्त्यासाठी अट्टहास का? विनाकारण दुसऱ्या प्रभागांमध्ये तरतुदीची अडवणूक केली जात असल्याचे यावरून लक्षात येते, असा आरोप सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केला आहे. 

भामा आसखेडमधून पिंपरी-चिंचवडसाठी जलवाहिनी टाकण्याकरिता 162 कोटींचा निधी मंजूर

महापौरपदाचा अवमान : कलाटे 

प्रभाग 25 मध्ये वाकड, ताथवडे, पुनावळे या तीन गावांचा समावेश होतो. या भागातून सर्वाधिक महसूल महापालिकेला मिळतो, हे महापौर व सत्ताधाऱ्यांना माहिती नाही का? महापौर शहराच्या असताना त्या प्रभाग 25 मधील कामांना आकसबुद्धीने विरोध करीत आहेत, हा त्या पदाचा अवमान आहे. आता राज्य सरकारने भोसरी सफारी पार्कला मंजुरी दिली आहे. चऱ्होलीत शेकडो कोटींची कामे सुरू आहेत. सांगवी, पिंपळे गुरवसाठी शंभर कोटींपेक्षा अधिक रक्कम वर्गीकरण केली आहे, त्यांना आपण विरोध करणार का? असा प्रश्‍न शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी उपस्थित केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP-ShivSena clash on subject of tathawade road