'मंदिरं बंद अन् उघडले बार, उद्धवा धुंद तुझे सरकार'; भाजपचं राज्य सरकारविरुद्ध आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 13 October 2020

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने दारू दुकाने, बार सुरू केले. मात्र, नागरिकांची श्रद्धास्थान असलेली मंदिरे अद्याप बंद ठेवली आहेत.

पिंपरी : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने दारू दुकाने, बार सुरू केले. मात्र, नागरिकांची श्रद्धास्थान असलेली मंदिरे अद्याप बंद ठेवली आहेत. 'मंदिरं बंद अन् उघडले बार, उद्धवा धुंद तुझे सरकार', अशी टीका भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात ठाकरे सरकारने बार सुरू आणि मंदिरं बंद ठेवली आहेत. या निर्णयाविरोधात आणि आमची श्रद्धास्थाने असलेली मंदिरं ताबडतोब उघडावीत. या मागणीकरिता महाराष्ट्रातील प्रमुख धर्माचार्य, साधु-संत, सर्व धार्मिक संस्था-संघटना एकत्र येत अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या नेतृत्वात मंगळवारी राज्यव्यापी लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

कुदळवाडी येथील श्री दुर्गामाता मंदिरात पिंपरी-चिंचवडमधील उपोषणाला सुरुवात करण्यात आली. महापौर उषा ढोरे, सामाजिक कार्यकर्ते दत्ता गायकवाड, माजी महापौर नितीन काळजे, नगरसेविका निर्मला गायकवाड, सुवर्णा बुर्डे, सचिन तापकीर, गीता महेंद्र, उदय गाकवाड, सुनील लांडे, प्रवीण काळजे, सरचिटणीस विजय फुगे, नगरसेविका प्रियांका बारसे, राजश्री जायभय, सरिता शर्मा आदी उपस्थित होते. चिंचवडगाव येथे श्रीमान मोरया गोसावी मंदिराच्या आवारासह पिंपरी-चिंचवडमधील सहा मंदिरांच्या आवारात दिवसभरात आंदोलन करण्यात आले. महिला शहराध्यक्ष उज्ज्वला गावडे, सरचिटणीस अमोल थोरात, विजय फुगे, नगरसेवक स्वीकृत नगरसेवक मोरेश्वर शेडगे आदी उपस्थित होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लांडगे म्हणाले, की संपूर्ण जगाला भक्तीचा आदर्श देणारा आपला पालखी सोहळा राज्य सरकारच्या सूचनेनुसार रद्द केला. प्रशासनाच्या आणि सरकारच्या निर्णयाचा प्रत्येक नागरिकाने आदर ठेवला. लॉकडाउन संपल्यानंतर पहिला निर्णय राज्य सरकारने घेतला, तो दारूची दुकाने चालू करण्याच्या. हॉटेल चालू झाले. बिअर बार चालू झाले. मात्र, मंदिरं उघडली, तर कोरोनाचा संसर्ग वाढेल, असा शोध राज्य सरकारने लावला आहे. त्याला भाजपचा विरोध आहे. नवरात्रोत्सवापूर्वी राज्यातील मंदिरं खुली करावी. या मागणीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत.

भाजपच्या रणरागिणी मंदिरांची कुलपं तोडतील : महापौर 
महाविकास आघाडी सरकारने नागरिकांची श्रद्धास्थान असलेली मंदिरं बंद ठेवली आहेत. आता नवरात्रोत्सव येत आहे. याकाळात महिला- भगिनींची व्रत असतात. पूजा करायची असते. मात्र, मंदिरंच बंद असल्यामुळे महिलांना नवरात्रोत्सव साजरा करता येणार नाही. हॉटेल, रेस्टॉरंट, बार सुरू करण्यात आले आहेत. मग, मंदिरं बंद का ठेवली जात आहेत? असा सवाल उपस्थित करीत महापौर उषा ढोरे यांनी सरकारवर टीका केली. तसेच, मंदिरं उघडली नाहीत, तर भाजपच्या रणरागिनी मंदिरांची कुलपं तोडून प्रवेश करतील, असा इशाराही त्यांनी दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp's agitation against the state government for opening temples at pimpri chinchwad