भटक्‍या कुत्र्याला धडक देऊन ठार केल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 December 2020

इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून फेकल्याने श्‍वानाचा मृत्यू झाल्याची पिंपळे गुरव येथील घटना ताजी असतानाच चिंचवड येथे आणखी एक प्रकार घडला. चिंचवड येथे रस्ता ओलांडणाऱ्या भटक्‍या श्वानाला धडक देऊन ठार केल्याप्रकरणी अज्ञात कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पिंपरी - इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून फेकल्याने श्‍वानाचा मृत्यू झाल्याची पिंपळे गुरव येथील घटना ताजी असतानाच चिंचवड येथे आणखी एक प्रकार घडला. चिंचवड येथे रस्ता ओलांडणाऱ्या भटक्‍या श्वानाला धडक देऊन ठार केल्याप्रकरणी अज्ञात कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी वंदना अशोक मिश्रा (वय 55, रा एम्पायर ईस्टेट, चिंचवड ) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड येथील संत मदर टेरेसा पुलाखालून गुरूवारी (ता.17) रात्री साडेआठच्या सुमारास तीन ते चार भटके श्वान रस्ता ओलांडत होते. त्यावेळी भरधाव आलेल्या एका सफेद रंगाच्या कारने त्यातील एका श्वानाला जोरात धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या श्वानाचा मृत्यू झाला. मिश्रा यांच्या तक्रारीनुसार अज्ञात वाहनचालकाविरोधात प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, मागील आठवड्यातच इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून फेकल्याने श्‍वानाचा मृत्यू झाल्याची घटना पिंपळे गुरव येथे घडली. पिंपळे गुरवमधील सुदर्शननगर, सृष्टी चौक येथे शनिवारी (ता.12) दुपारी बाराच्या सुमारास अज्ञात आरोपींनी एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून भटक्‍या श्‍वानाला खाली फेकले. या घटनेत पांढरा रंग त्यावर काळ्या व तपकीरी रंगाचे डाग असलेल्या अंदाजे सात महिने वयाचा हा श्‍वान गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी फरीनजहॉं शेख (रा. सुदर्शननगर, पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिल्यानंतर याबाबत सांगवी पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 

आसामहून पोटापाण्यासाठी पिंपरीत आलेल्या कामगाराचा खून; औद्योगिक नगरी हादरली

या प्रकरणाची माहिती प्राणीप्रेमी संघटनेच्या कार्यकर्त्यांना समजल्यानंतर त्यांनी फिर्यादी फरीनजहॉं शेख यांच्याशी संपर्क साधला. तसेच प्राणीप्रेमी व खासदार मनेका गांधी यांच्याशी ई-मेल द्वारे संपर्क केला. काही वेळातच मनेका गांधी यांनी दिल्लीहून फोन केला. घडलेल्या घटनेची माहिती घेण्यासह पोलिसांशी बोलणे करून देण्यास सांगितले. त्यानुसार कार्यकर्त्यांनी खासदार मनेका गांधी व सांगवीचे पोलिस निरीक्षक अजय भोसले यांचा संपर्क करून दिला. 
दरम्यान, खासदार मनेका गांधी यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती घेत तपास लवकरात लवकर करावा. तसेच यातील आरोपींवर कडक कारवाई करावी, अशी सूचना पोलिसांना दिली.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: case registered against driver hitting killing stray dog