#LockDown4.0 : तळेगावकरांनो लॉकडाउन कायम आहे...

#LockDown4.0 : तळेगावकरांनो लॉकडाउन कायम आहे...

तळेगाव स्टेशन : मावळ, मुळशीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या १३ मे रोजीच्या आदेशानुसार माळवाडी आणि स्टेशन परिसरातील केवळ काही भाग प्रतिबंधित क्षेत्र ठेऊन सकाळी सात ते रात्री सात या दरम्यान खरेदी विक्रीस मुभा देण्यात आली. त्यानंतर तळेगावात लॉकडाउनचे कसलेही गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. लॉकडाउन मागे घेतला, की काय असे चित्र दिवसभर येथे पहावयास मिळत आहे.

राज्यात लॉकडाउन पुन्हा 31 मेपर्यंत वाढविण्यात आला. मात्र, तळेगावातील नागरिकांना त्यांच्याशी काहीही देणंघेणं दिसत नाही. कारण लॉकडाउनपूर्वी जशी परिस्थिती होती, तशी पहावयास मिळत आहे. दरम्यान, पुणे व मुंबईसह बाहेरील परिसरातून लोकांची विनासायास ये-जा चालू झाली आहे. राजकीय चढाओढीने प्रेरीत आणि वारंवार बदलणाऱ्या नगरपरिषद, तहसील आणि उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशामुळे गोंधळलेले पोलिस प्रशासनही नाकेबंदीबाबत ढिले पडल्यासारखे दिसत आहेत. परिणामी गेले दोन महिने सलग गांभीर्याने ड्युटी करून वैतागलेले पोलिस सध्या नाकेबंदीच्या ठिकाणी केवळ मोबाईलमध्ये डोके घालून बसलेले दिसतात. वाहनांची रहदारी वाढल्यामुळे नाकेबंदी, तपासणी सोडून वाहतूक नियमन करण्याचे काम वाहतूक नियंत्रण पोलिसांना करावे लागत आहे. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या वाहनांची तपासणी होताना दिसत नाही. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्पष्ट आदेश असूनही नगरपरिषद प्रशासन भाजी विक्रेत्यांची कसलीही तपासणी करताना दिसत नाही. त्यामुळे विनापरवाना आणि बाहेरगावच्या भाजीविक्रेत्यांची संख्या आठवडाभरात खूप वाढली आहे. ठिकठिकाणी मनमानी पद्धतीने बसणाऱ्या भाजीविक्रेत्यांवर नगरपरिषदेचे कसलेही नियंत्रण राहिलेले नाही. बरेच नागरिक विनामास्क मुक्तपणे फिरत आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करण्याबाबत नागरिक, व्यावसायिक, व्यापारी आणि प्रशासन यापैकी कुणीच आग्रही दिसत नाही. या बेफिकीरी आणि मोकळीक दिल्यामुळे तळेगावात पुन्हा कोरोनाचे रुग्ण सापडण्याची शक्यता आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

संस्थात्मक विलगीकरणातील ३८ जणांना सोडले 

पणन महामंडळाच्या राष्ट्रीय सुगीपश्चात संशोधन केंद्रातील संस्थात्मक विलगीकरण कक्षातील ३८ संशयित नागरिकांना विलगीकरण कालावधी संपल्यामुळे शनिवारी (ता. १६) सायंकाळी घरी सोडण्यात आले. गेल्या ७ मे रोजी तळेगाव स्टेशन परिसरात आढळलेल्या पहिल्या कोरोना रुग्णाच्या इमारतीत राहणाऱ्या २४ जणांसह किराणा दुकानदार, मेडिकल चालक, अशा एकूण ३८ जणांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले होते. त्यांची तपासणी केली असता कोणत्याही प्रकारची कोविड-१९ लक्षणे दिसून आलेली नाहीत. त्यांचा विलगीकरण कालावधी संपल्याने त्यांना चार दिवस घरातच विलगीकरणाच्या अटीवर सोडण्यात आल्याची माहिती तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैदयकीय अधिकारी प्रवीण कानडे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com