पिंपरी-चिंचवड शहरातील टपाल कार्यालयांमध्ये येतायेत 'या' अडचणी

आशा साळवी  
Tuesday, 22 September 2020

  • नऊ महिन्यांपासून नागरिकांचे हेलपाटे
  • उपलब्ध असणाऱ्या ठिकाणी आकारले जातेय शुल्क 

पिंपरी : टपाल कार्यालयातून धनादेश पुस्तके मोफत असताना काही ठिकाणी 24 रुपये, 48 रुपये आकारण्यात येत आहेत. त्याची रोख पावती किंवा खात्यातून रक्कम वजाही केली जात नाही, अशी तक्रार निगडी प्राधिकरणातील ज्येष्ठ नागरिक सतीश कुलकर्णी यांनी 'सकाळ'च्या कार्यालयात येऊन केली. कर्मचारी-अधिकारी या बाबत समाधानकारक उत्तरे देत नसल्याने दररोज खातेदारांची वाद होत आहेत, अशीही खंत त्यांनी व्यक्त केली. 

अशक्तपणा आला, वजन घटलं तरी घाबरू नका; कारण... 

'सकाळ' प्रतिनिधीने मंगळवारी सकाळी शहरातील काही टपाल कार्यालयांची पाहणी केली. त्यातील निरीक्षणे अशी : 

खराळवाडी : सकाळी 11.33 
सकाळपासून खातेदार, एजंटची चेकबुकसाठी गर्दी वर्दळ होती. धनादेश पुस्तक घेतल्यानंतर त्यांना रक्कम स्वीकारल्याची पावती दिली जात नाही, असे एक महिला एजंट म्हणाल्या. एका ज्येष्ठ नागरिकाने चेकबुकसाठी शुल्क आकारले जात नसल्याचे सांगितले. अर्ज केल्यावर चेकबुक घ्यायला 15 दिवसांनी या असे कर्मचारी सर्वांना सांगतात. 

चिंचवडगाव : दुपारी 12.10 
कार्यालयात प्रचंड गर्दी होती. येथे पुस्तकाविषयी विचारल्यावर 25 रुपये शुल्क असून, सध्या पुस्तके संपली आहेत. तुम्ही अर्ज करून ठेवा, असे सांगण्यात आले. 

आकुर्डी : दुपारी 12. 33 
सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून रांग दिसली. परंतु पुस्तकासाठी अगोदरच 50 जणांची प्रतीक्षा यादी आहे. तुम्ही अर्ज केल्यावर महिना-दीड महिन्याने पुस्तके मिळतील. पुस्तक दिल्यावर पावती दिली जात नाही, असे सांगितले. 

निगडी प्राधिकरण : दुपारी 1.10 
पुस्तकांसाठी गर्दी होती. पुस्तके संपली असून, वरिष्ठ कार्यालयाकडे त्यासाठी मागणी केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. खातेदारांची गर्दी पाहता लगेच पावती देणे शक्‍य होत नसल्याचेही अधिकारी म्हणाले. 

शुल्क आकारणीवरून वाद 
शहरात 32 टपाल कार्यालये व 50 हजार बचत खातेदार आहेत. सध्या सर्व कार्यालयात धनादेश पुस्तकाचा तुटवडा आहे. यापूर्वी ही पुस्तके मोफत मिळायची. आता मार्च 2020 पासून 10 धनादेशापर्यंत निःशुल्क आणि पुढील प्रत्येक धनादेशासाठी 18 टक्के जीएसटीसह दोन रुपये मोजावे लागतात. याविषयीची माहिती खातेदारांपर्यंत पोहोचलेली नाही. टपाल कार्यालयाच्या दर्शनी भागात किंवा फलकावर लावणे आवश्‍यक आहे. त्यामुळे खातेदारांचे वाद होत आहेत. खातेदारांना अर्धवट माहितीमुळे धनादेशासाठी 8 ते 15 दिवसांनी हेलपाटे मारावे लागत आहेत. यापूर्वी एका पुस्तकात 60 धनादेश असायचे. आता 20 धनादेश आहेत. 

धनादेश या कारणांसाठी 
बचत खाते असल्यास एफडी, एमआयएस स्कीम, ज्येष्ठ नागरिक बचत योजना (एससीएसएस), आरडी (रिकरिंग डिपॉझिट) काढण्यासाठी धनादेश लागतो. एजंटला विड्रॉवल पावती भरून दिल्यावर ते रांगेत थांबून काढून देत नाही. त्याऐवजी धनादेश दिल्यावर ते त्यांच्या सवडीने भरून एंट्री करतात. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सरकारकडूनच शुल्क आकारले जात आहे. पैसे भरल्यानंतर प्रत्येकाने पावती मागून घेणे आवश्‍यक आहे. कार्यालयाविरूद्ध किंवा कर्मचारी-अधिकाऱ्यांविषयी तक्रारी लेखी स्वरूपात आमच्याकडे करावी.
- के. एस. पारखी, जनसंपर्क अधिकारी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: citizens facing problems in post offices at pimpri chinchwad