लघुउद्योगांसाठी महत्त्वाची बातमी; पुणे विभागात 'या' आठ क्लस्टर निर्मितीचे काम पूर्ण

सुधीर साबळे
Monday, 6 July 2020

उद्योगांसाठी निर्माण झालेली सध्याची स्थिती पूर्ववत होण्यासाठी आणखी काही कालावधी लागणार असला, तरी लहान उद्योगांनादेखील नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून दर्जेदार उत्पादन तयार करावे, म्हणून उद्योग विभागाकडून सुरू करण्यात आलेला क्‍लस्टर डेव्हलपमेंटचा (समूह विकास योजना) उपक्रम त्यांना भविष्यातील प्रगतीसाठी फायदेशीर ठरणार आहे.

पिंपरी : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे लावलेल्या लॉकडाउनमुळे लघुउद्योजकांना मनुष्यबळ, तंत्रज्ञान याची अडचण मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. उद्योगांसाठी निर्माण झालेली सध्याची स्थिती पूर्ववत होण्यासाठी आणखी काही कालावधी लागणार असला, तरी लहान उद्योगांनादेखील नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून दर्जेदार उत्पादन तयार करावे, म्हणून उद्योग विभागाकडून सुरू करण्यात आलेला क्‍लस्टर डेव्हलपमेंटचा (समूह विकास योजना) उपक्रम त्यांना भविष्यातील प्रगतीसाठी फायदेशीर ठरणार आहे. विविध उद्योगांशी संबधित असणारे 35 क्‍लस्टर्स उभारण्याचे नियोजन पुणे विभागात करण्यात आले असून, त्यापैकी आठ क्‍लस्टरच्या निर्मितीचे काम पूर्ण झाले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

छोट्या उद्योगांना चांगला फायदा...

क्‍लस्टरच्या योजनेचा विकास करताना त्याठिकाणी विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लघुउद्योजकांच्या सोईसाठी कॉमन फॅसिलिटी सेंटर उभारण्यात येणार आहे. त्याठिकाणी उत्पादन निर्मितीसाठी आवश्‍यक असणारे नवे तंत्रज्ञान, पॅकिंगपर्यंतच्या सुविधा तिथे उपलब्ध राहणार आहेत. बदलत्या स्पर्धेत लघुउद्योजकांना त्यांच्या उत्पादनाचा दर्जा उंचावण्यासाठी ही सुविधा उपयुक्‍त ठरणार आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्या कोरोनाचा संसर्ग आहे. अनेक ठिकाणी उद्योग सुरू झाले असले, तरी लघुउद्योजकांना उत्पादन तयार करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे उत्पादनात सुधारणा करण्यासाठी आवश्‍यक असणारी नवीन मशिनरी, तंत्रज्ञान घेता येणे कठीण आहे, अशा वेळी त्यांना क्‍लस्टरची योजना उपयुक्‍त ठरणारी आहे. आतापर्यंत पुण्यातील आंबेगाव परिसरात प्रिंटिंग उद्योगातील व्यावसायिकांसाठी प्रिटिंग क्‍लस्टर तयार करण्यात आले आहे. सोलापूरमध्ये टेरी टॉवेल, कोल्हापूरमध्ये गार्मेंट, कॉटन फॅब्रिक, सांगलीमध्ये तंतूवाद्य, टेक्‍सटाईल, हळद निर्मिती प्रक्रिया क्‍लस्टरचे काम पूर्ण झाले आहे. सांगलीजवळील मिरजमध्ये वाद्य तयार करण्याचा उद्योग असणाऱ्यांसाठी म्युझिक इन्स्ट्रुमेंटल क्‍लस्टर तयार करण्यात आले आहे. त्याठिकाणी वीणा, सितार, तंबोरा याची निर्मिती करण्यात येते. आता क्‍लस्टरच्या सुविधेमुळे त्याठिकाणी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून वाद्यांची निर्मिती करण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रस्तावित असणारी क्‍लस्टर्स...

  • पुणे

रेडिमेड गार्मेंट, आंबेगाव, राइस मिल, जुन्नर, पॉटरी क्‍लस्टर, भोर, फॅब्रिकेशन क्‍लस्टर, बारामती

  • सातारा

फॅब्रिकेशन क्‍लस्टर, गूळ निर्मिती प्रक्रिया, लेदर निर्मिती, प्रिंटिग आणि पॅकेजिंग

  • सांगली

ऍग्रो प्रोसेसिंग, हॅन्ड ग्लोव्हज निर्मिती, हळद निर्मिती प्रक्रिया, बेकरी उत्पादने, इंजिनिअरिंग, गार्मेंट प्रिंटिंग, रेझिन क्‍लस्टर

  • सोलापूर

सोलापूर चादर उत्पादन, इंजिनिअरिंग, रेझिन क्‍लस्टर, गार्मेंट उत्पादन, खवा निर्मिती, प्रिंटिग आणि पॅकेजिंग

  • कोल्हापूर

काजू प्रक्रिया, प्रिंटिग, पॉवरलूम क्‍लस्टर

 

विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लघुउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या उत्पादनाचा दर्जा सुधारण्यासाठी तयार केलेल्या क्‍लस्टर योजनेचा त्यांना चांगला उपयोग होऊ शकतो. सध्या अनेक भागांमध्ये क्‍लस्टरच्या उभारणीचे काम सुरू असून, पुढील दीड वर्षांमध्ये हे काम पूर्ण होईल.
- सदाशिव सुरवसे, सहसंचालक, उद्योग संचनालय, पुणे विभाग


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cluster development will be beneficial for industries