Prashant Damle : लेखक पाया; कलाकार साज! प्रशांत दामले यांची नाटकांबाबत भावना

‘सकाळ’ पिंपरी-चिंचवडचा ३१ वा वर्धापन दिन २९ नोव्हेंबर रोजी आहे. त्यानिमित्त चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात २४ ते २६ नोव्हेंबर दरम्यान नाट्यमहोत्सवाचे आयोजन केले आहे.
Prashant Damle
Prashant Damlesakal

नाटकासाठी एखाद्या विषयाची मांडणी करणे, अवघड बाब आहे. त्यामुळे लेखक हा नाटकाचा पाया आहे. बाकीचे आम्ही सगळे आंतरिक काम पाहतो. लेखनाचा पाया ठिसूळ असेल तर कलाकार, दिग्दर्शक यांना अधिक कष्ट घ्यावे लागतात, असे मत निर्माते तथा ज्येष्ठ रंगकर्मी प्रशांत दामले यांनी व्यक्त केले. सरकार असो वा प्रशासनाला सांगणे आहे की, नाटककारांना पैसे देऊ नका, तर उत्तम सोयी सुविधा असणारे नाट्यगृह द्या, अशी मागणीही त्यांनी अधोरेखित केली.

‘सकाळ’ पिंपरी-चिंचवडचा ३१ वा वर्धापन दिन २९ नोव्हेंबर रोजी आहे. त्यानिमित्त चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात २४ ते २६ नोव्हेंबर दरम्यान नाट्यमहोत्सवाचे आयोजन केले आहे. त्यानिमित्त प्रशांत दामले यांनी बुधवारी (ता. २२) ‘सकाळ’च्या पिंपरी विभागीय कार्यालयाला भेट दिली. या वेळी त्यांनी नाटकांविषयी भरभरून गप्पा मारल्या. नाट्यक्षेत्रातील आधीचा काळ, सध्या झालेले बदल व नवख्या कलाकारांसाठी भविष्यात आखल्या जाणाऱ्या योजना यावरही त्यांनी भाष्य केले.

आधी अभ्यास... मग नाटक

कधी कोणाला कसा ब्रेक मिळेल हे सांगता येत नाही. एखाद्या सिरियलमध्ये ब्रेक मिळाल्यानंतर दोन वर्षे काळजी नसते, पण नंतर काय? हा प्रश्‍न दोन वर्षांनी उपस्थित राहतो. पण नाटकात तसे नसते. दहा ते पंधरा प्रयोगातच नाटक चालणार की नाही हे कळते. पण याची जाण वेळीच येणे गरजेचे असते. त्यानुसार निर्णय घ्यायला हवा.

विनोदी नाटक करणे अवघड

वैचारिक नाटकांपेक्षा विनोदी नाटक करणे अवघड आहे. विनोदी नाटक करताना सर्व वयोगटातील प्रेक्षकांना एकत्र बसून पाहता येईल, असे लिहिणे आवश्‍यक असते. त्यामध्ये कंबरेखालचे विनोद न करणे, विनोद करताना भान राखणे हे गरजेचे आहे. विनोदी नाटक करतानाही विविध सामाजिक व कौटुंबिक प्रश्‍नांवर भाष्य करता येते. असे विषय गंभीरपणे न मांडता हसत खेळत मांडले तर ते प्रेक्षकांना जास्त भावतात.

सरकार किंवा प्रशासनाकडून अपेक्षा

  • पैशांपेक्षा चांगल्या सुविधा असणारे नाट्यगृह द्या

  • नाट्यगृहात पायाभूत सुविधा उपलब्ध असाव्यात

  • नाट्यसंस्था व कलाकारांच्या वाहनांना टोल माफ करावा

  • दौऱ्यावर असताना निवासासाठी नाट्य कलाकारांना शासकीय विश्रामगृहे मिळावीत

  • सुविधा मिळाल्यास व्यावसायिक नाटकांचे खर्च कमी होऊन प्रयोग जास्त होतील

  • फक्त नवी नाट्यगृहे बांधून उपयोग नाही, तर जुन्या नाट्यगृहांची योग्य देखभाल दुरुस्ती करणेही आवश्‍यक

वैचारिकपेक्षा विनोदी नाटक अवघड

यशस्वितेसाठी वेळेचे नियोजन गरजेचे

नाटकात काम करताना तुम्ही जेवढे टाइम मॅनेजमेंट चांगले कराल, तेवढे यशस्वी व्हाल. एकवेळ अभिनयात कमी असाल तरी चालेल; मात्र वेळेचे नियोजन योग्य असेल तर त्याची छाप प्रेक्षकांवर पडते.

स्वतःचे चांगले-वाईट दुवे माहिती असावेत

आपल्या गरजा जेवढ्या मर्यादित ठेवू, तेवढा संयम वाढतो, तेवढे तुम्ही या क्षेत्रात टिकू शकता. कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी वेळ लागतो. काही वर्षांत अभिनेता झालो, असं होत नाही. नाटकाचा प्रत्येक प्रयोग हा चॅलेंज आहे. हे तुम्ही जितक्या जास्त वेळा कराल तेवढे तुम्ही पॉलिश होत जाल. कोणतीही व्यक्ती परिपूर्ण नसते. मात्र आपल्यातले चांगले-वाईट दुवे आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. आपल्याला काय येतं, याबरोबरच आपल्याला काय येत नाही, हेदेखील माहिती असायला हवं.

गॅझेट्जचे अडथळे दूर करा

नाटकात काम करायचे असेल तर तुम्हाला वाचता आले पाहिजे. आजच्या पिढीचे वाचन कमी आहे. सध्या मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे मुलांचे ऐकणे व बघणे जास्त आहे. एखादी गोष्ट साध्य करायची असेल, तर ते करताना येणारे अडथळे दूर करण्याची ताकद मुलांमध्ये हवी. त्यामुळे नवोदित कलाकारांना घडवताना सुरुवात ही वाचनाची सवय लावण्यापासून करावी लागत आहे.

सध्याचे प्रेक्षक स्पष्टवक्ते

एखादे नाटक आवडले नाही तर ‘हे नाटक वाईट आहे’ असे सांगणारा प्रेक्षक महाराष्ट्रात आहे. नाटक संपल्यावर ‘तुमचं नाटक खराब आहे’ हे सांगणारा किंवा ‘नाटक आवडलं नाही’ हे तिकिटावर लिहून देणारादेखील एक प्रेक्षकवर्ग आहे. व्यावसायिक नाटक करताना समाजमाध्यमांचा उपयोग केवळ प्रेक्षकांना नाट्यगृहापर्यंत आणण्यासाठी आहे. नाटक संपल्यानंतर ते कसे आहे, हे तुमच्या कामावर अवलंबून आहे. त्यामुळे चालणारे नाटक पकडून ठेवायचे असते. तो एक जॅकपॉट असतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com