'ओपन बार'ला महापालिकेची बाकडे; कमिशनरसमोर मांडली नागरिकाने वस्तुस्थिती

मंगेश पांडे
Friday, 6 November 2020

पिंपरी-चिंचवड शहरातील विविध प्रश्‍नांबाबत पोलिस आयुक्तालय व पिंपरी-चिंचवड को.ऑप. हाउसिंग सोसायटी फेडरेशनच्या वतीने आयोजित चर्चासत्रात शहरातील बाकड्यांचा कशाप्रकारे दुरूपयोग होतोय याकडे लक्ष वेधण्यात आले. 

पिंपरी : महापालिकेने नागरिकांसाठी बसविलेले बाकडे वाईन शॉपसमोर गेले. या बाकड्यांसमोर अचानक टेबलही आले अन्‌ सुरू झाला ओपन बार, ही वस्तुस्थिती एका सजग नागरिकाने चर्चासत्रात मांडल्याने अधिकारीही चक्रावले. पिंपरी-चिंचवड शहरातील विविध प्रश्‍नांबाबत पोलिस आयुक्तालय व पिंपरी-चिंचवड को.ऑप. हाउसिंग सोसायटी फेडरेशनच्या वतीने आयोजित चर्चासत्रात शहरातील बाकड्यांचा कशाप्रकारे दुरूपयोग होतोय याकडे लक्ष वेधण्यात आले. 

हे ही वाचा : पुण्यात आणखी एका ठिकाणी आग; 500 रहिवाशांना सुखरुप बाहेर काढलं

या चर्चासत्रात विविध विभागांचे अधिकारी व हाउसिंग सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते. नागरिकांच्या प्रश्‍नांना अधिकाऱ्यांनी उत्तरे दिली. यावेळी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश, पीएमआरडीचे पोलिस अधीक्षक नीलेश आष्टीकर, पीएमपीच्या सहव्यवस्थापकीय संचालिका चेतना कुरमुरे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण तुपे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे, जिल्हा उपनिबंधक शाहूराज हिरे, पोलिस उपायुक्त मिलिंद भोईटे, सहायक पोलिस आयुक्त श्रीकांत डेसले आदी उपस्थित होते. 

हे ही वाचा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार निकिता कदम यांनी शेवटच्या क्षणी माघार घेतली. त्यामुळे पिंपरी चिंचवडच्या उपमहापौरपदी सत्ताधारी भाजपचे केशव घोळवे यांची बिनविरोध निवड झाली.

संजीवन सांगळे म्हणाले, 'चिखलीत अनधिकृत भंगार दुकाने दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे प्रदूषण होत असून, या दुकानांना सर्व सुविधा मिळतात. मात्र, आम्ही कर भरूनही पुरेशा सुविधा मिळत नाहीत. 
सचिन लोंढे म्हणाले, 'शहराच्या सुरक्षिततेसाठी किमान महत्त्वाच्या ठिकाणी तरी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आवश्‍यक आहे.' 
नीलेश पिंगळे म्हणाले, 'अतिक्रमणांमुळे पदपथ चोरीला गेल्याचे दिसून येत आहे. तरी पदपथ चोरीबाबत गुन्हा दाखल व्हायला हवा. पाणी, ध्वनी व हवा प्रदूषण होणार नाही, यासाठी नियोजन करून खबरदारी घेणे महत्त्वाचे असल्याचा मुद्दा प्रशांत राऊत यांनी उपस्थित केला. 

या प्रश्‍नांना उत्तर देताना महापालिका आयुक्त म्हणाले, 'प्रत्येक भागातील समस्या वेगवेगळ्या आहेत. यासाठी या चर्चासत्राप्रमाणेच पुन्हा विभागनिहाय चर्चासत्र आयोजित करणे आवश्‍यक आहे. समाजातील सर्व घटकांनी सोबत घेऊन शहराचा विकास करू. काही कामे करताना झालेल्या चुका नंतर लक्षात आल्या. त्यामध्ये बदल करू.' 

पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले, 'कुठेही चुकीचे काम सुरू असेल तर त्याबाबतची तक्रार देण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, तरच कारवाई करणे शक्‍य होईल. कोणीतरी एकाने तक्रार देऊन उपयोग नाहीतर अधिकाधिक लोकांनी तक्रार दिल्यास संबंधित व्यक्तींवर मोका, एमपीडीए अंतर्गत कडक कारवाई करणे शक्‍य होईल. अनधिकृत भंगार दुकानांची यादी द्या, त्यावर निश्‍चित कारवाई केली जाईल. चिखलीतील कारवाई करताना हस्तक्षेप खपवून घेणार नाही. चुकीचे काम करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. मग तो कोणीही असो. पोलिस ठाण्याने दखल घेतली नाही तर माझ्याशी संपर्क साधा. 

फेडरेशनच्या अध्यक्षा तेजस्विनी ढोमसे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन सहसचिव सुधीर देशमुख यांनी केले तर आभार दत्तात्रेय देशमुख यांनी मानले. नियोजन अरुण देशमुख, सचिन लोंढे व आशिष माने यांनी केले. 

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Commissionerate of Police and Pimpri Chinchwad Co op regarding various issues in Pimpri Chinchwad city the seminar was organized on behalf of the Housing Society Federation