#CoronaVirus : हिंजवडीनंतर आता माणमध्येही कोरोना पॉझिटिव्ह...कसा आढळला रुग्ण...वाचा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 मे 2020

- हिंजवडीनंतर आता माणमध्येही कोरोनाबाधित रुग्ण

हिंजवडी : आयटी नगरी माण येथे मुंबईवरून मुलीकडे वास्तव्यास आलेल्या एका महिलेस कोरोनाची लागण झाली आहे. एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये ही महिला तिच्या मुलीकडे 14 मे रोजी राहायला आली होती. तिच्या संपर्कातील एकूण सहा जणांना क्वारंटाइन केले असून, सदर सोसायटी ही पूर्णतः सील केल्याची माहिती तहसीलदार अभय चव्हाण यांनी दिली. तर संबंधित महिलेचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ .बालाजी लकडे यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

 लॉकडाउन काही प्रमाणात शिथील करून सरकारने नागरिकांच्या स्थलांतरास मुभा दिली. पुणे व मुबंई सारख्या शहरात अडकलेले अनेक जण स्थलांतर करीत आहेत. त्यामुळे माण-हिंजवडी आयटी पार्कमध्येही आता कोरोनाचा शिरकाव झाला आहे. हिंजवडीनंतर आता माणच्या  हद्दीतील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये एका महिलेने तिच्या आईला मुंबई घाटकोपर येथून गुरुवारी (ता. 14) स्वतःकडे आणले होते. त्यानंतर आईला त्रास जाणवू लागल्याने 16 मे रोजी बाणेरमधील खासगी रुग्णालयात तपासणीसाठी नेले. तेथील डॉक्टरांनी कोविडची टेस्ट करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार तपासणी अहवालात त्या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. खबरदारी म्हणून रुग्णांच्या संपर्कात आलेल्या त्या फ्लॅटमधील चार, तर अन्य दोघांना क्वारंटाइन केले आहे.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा         

चार दिवसांपूर्वी हिंजवडीतदेखील पुण्यातून नातेवाइकांकडे आलेल्या ज्येष्ठ व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. या घटनेमुळे आयटी पार्क परिसरात कोरोनाची भीती व हिंजवडीकर नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती. त्याचीच पुनरावृत्ती आता माणच्या हद्दीत झाल्याने बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांमुळे जोखीम व धोका वाढत असून, स्थानिक पातळीवर कडक उपाययोजना करण्याची गरज आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

दरम्यान, या परिसरात पुणे, मुंबई अथवा इतरत्र प्रवास करून कोणी आल्याचे निदर्शनास आल्यास तत्काळ स्थानिक प्रशासनाला कळवावे, असे आवाहन गटविकास अधिकारी संदीप जठार यांनी केले आहे. ते म्हणाले, "आलेल्या पाहुण्यांबाबत प्रशासनाला माहिती न दिल्यास त्या व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्याचा प्रशासन विचार करत आहे. या बाबत तहसीलदार व पोलिस निरीक्षकाशी बोलणं झालं आहे. त्यामुळे आगामी काळात माहिती न देणाऱ्या विरोधात  प्रशासनाला कठोर भूमिका घ्यावी लागेल."


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona infected patient found in maan it park