
- कान्हे ग्रामीण रुग्णालय, कार्ला, येळसे व आढले बुद्रूक येथे व्यवस्था
वडगाव मावळ (पिंपरी-चिंचवड) : कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात नागरिकांना लस देण्यास सोमवारपासून सुरुवात झाली असून, मावळ तालुक्यात कान्हे ग्रामीण रुग्णालय, कार्ला, येळसे व आढले बुद्रूक प्राथमिक आरोग्य केंद्र अशा चार ठिकाणी कोरोना लसीकरणाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे व तालुका आरोग्याधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी दिली.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
देशभरात कोरोना लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवक, पोलिस कर्मचारी आदी शासकीय कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. एक मार्चपासून लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला. या टप्प्यात ६० वर्षांवरील नागरिक व विविध आजार असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोना लस दिली जाणार आहे. मावळ तालुक्यातही नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली आहे. या मोहिमेची माहिती देताना तालुका आरोग्याधिकारी डॉ. लोहारे म्हणाले, ‘‘सिरमकडून कोविशिल्ड लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे महात्मा फुले जन आरोग्य योजनेत नोंदणी असलेल्या सोमाटणे येथील पवना हॉस्पिटल, पायोनिअर हॉस्पिटल, तळेगाव दाभाडे येथील मायनर मेडिकल कॉलेज, अथर्व ऍक्सिडेंटल हॉस्पिटल, लोणावळा येथील संजीवनी हॉस्पिटल या खासगी रुग्णालयांमध्ये सरकारने निश्चित केलेल्या दराप्रमाणे (२५० रुपये) लस उपलब्ध करून देण्याचे सरकारकडून आदेश आले आहेत. या मोहिमेत तालुक्यातील ६० वर्षांवरील नागरिक व विविध आजार असलेल्या ४५ वर्षांवरील व्यक्तींनी लसीकरण करून घ्यावे’’
नागरिकांनी काळजी घ्यावी
तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. वीसच्या आसपास आलेली सक्रिय रुग्णांच्या संखेने आता पुन्हा शंभरी ओलांडली आहे. आत्तापर्यंत तालुक्यातील रुग्णसंख्या ८ हजार ३२५ झाली असून त्यात शहरी भागातील ४ हजार ७५० तर ग्रामीण भागातील ३ हजार ५७५ जणांचा समावेश आहे. आत्तापर्यंत २२४ जणांचा मृत्यू झाला असून ७ हजार ९८० जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सक्रिय रुग्णांची संख्या शंभराच्या वर गेली आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेली रुग्णसंख्या ही प्रामुख्याने तळेगाव, लोणावळा व वडगाव या शहरी भागातील आहे. या शहरातील वाढती गर्दी, वाढलेली सार्वजनिक कार्यक्रमांची संख्या व नियम पाळण्याबाबत नागरिकांमध्ये वाढलेली बेफिकीरी यामुळे कोरोनाचा विळखा पुन्हा घट्ट होऊ लागला आहे. त्यामुळे संबंधित नगरपरिषदांनी अधिक दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव लक्षात घेऊन नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घेऊन काळजी घेणे गरजेचे आहे.
पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
‘‘तालुक्यात कान्हे येथील वडगाव मावळ ग्रामीण रुग्णालय तसेच कार्ला, येळसे व आढले बुद्रूक ही तीन प्राथमिक आरोग्य केंद्रे अशा चार ठिकाणी लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे नागरिकांना मोफत लसीकरण केले जाणार आहे. सिरमकडून कोविशिल्ड लस उपलब्ध करून देण्यात आली आहे.’’
- चंद्रकांत लोहारे, आरोग्याधिकारी, मावळ