
उत्साही वातावरणात वैद्यकीय कर्मचारी सेल्फी काढत होते. दुसरीकडे लाभार्थ्यांची धडधड वाढत होती. पहिली लस कोण घेणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून होती.
पिंपरी - दीर्घ प्रतीक्षेनंतर लसीकरण मोहिमेला अखेर मुहूर्त मिळाला. लसीकरण केंद्राची फुग्यांची आकर्षक सजावट केली होती. कोरोना लसीची रांगोळी काढत स्वागत करण्यात आले. उत्साही वातावरणात वैद्यकीय कर्मचारी सेल्फी काढत होते. दुसरीकडे लाभार्थ्यांची धडधड वाढत होती. पहिली लस कोण घेणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून होती. सकाळी अकरा वाजून 20 मिनिटांनी 56 वषीॅय महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांना लस टोचली आणि बहुप्रतीक्षित कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा आज (ता.16) शुभारंभ झाला.
पिंपरीतील नवीन जिजामाता रुग्णालय कोविड लसीकरण केंद्राचे महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आयुक्त श्रावण हर्डीकर, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, नगरसेवक संदीप वाघेरे, वैद्यकीय महिला अधिकारी डॉ. वर्षा डांगे, डॉ. लक्ष्मण गोफणे, डॉ.बाळासाहेब होडगर उपस्थित होते.
हे वाचा - कोरोना काळातील प्रामाणिक कष्टाचे फळ मिळाले
गेल्या दहा दिवसापूर्वी लसीकरणाचा "ड्रायरन' यशस्वी झाला होता. त्याच धर्तीवर शहरातील आठ रुग्णालयात लसीकरण केंद्र निश्चित केले आहेत. या केंद्रावर लसीकरणाच्या दृष्टीने सुसज्ज व्यवस्था करण्यात आली आहे. आज जिजामाता रुग्णालयात प्रत्यक्ष लसीकरणाला सुरवात झाली. पहिल्यांदा "कोविन ऍप'वर लसीकरण लाभार्थ्यांची नोंद झाली. त्यानंतर ऑक्सिजन पातळी, रक्तदाब याची तपासणी झाली. त्यानंतर प्रत्यक्ष लसीकरण झाले.
पहिल्या लसीकरणात लस टोचक सविता वेदपाठक यांनी डॉ. साळवे यांना पहिली लस दिली. त्यानंतर डॉ. साळवे यांना निरीक्षण कक्षात विश्रांतीस सांगितले. खुद्द आयुक्तांनी त्यांची विचारफूस केली. त्या पाठोपाठ रुग्णालयातील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी यांना हे लसीकरण सुरू झाले. पहिल्या टप्प्यात प्राधान्याने आरोग्य विभागात काम करणाऱ्या व्यक्तींना हे लसीकरण केले जात आहे. त्यासाठी 17 हजार जणांनी नोंदणी केली आहे. डॉ.राहुल राऊत आणि डॉ. अर्चना पाटील यांनी तांत्रिक सहकार्य केले.
हे वाचा - बारामतीत कोरोना लसीकरणास प्रारंभ ; पहिल्या दिवशी 107 जणांना लसीकरण
उद्घाटन साडेदहाऐवजी पाऊणतास उशिरा
कार्यक्रमपत्रिकेनुसार सकाळी साडेदहा वाजता उद्घाटन होणार होते. सकाळीच सगळा वैद्यकीय स्टाफ स्वागतासाठी हजर होता. मात्र उद्घाटकच तब्बल पाऊणतास उशिराने आले. स्थानिक नगरसेविकांनीदेखील उशिराच हजेरी लावली. खासदार बारणे मात्र साडेदहा वाजता उपस्थित होते. परंतु तिन्ही आमदार अनुपस्थित राहिले.
मी बरा आहे : साळवे
लसीकरणाबद्दल बरेच गैरसमज आहेत. त्यात मी लसीकरण केल्यामुळे माझी पत्नी डॉ. सरोजला टेन्शन आले होते. परंतु लसीकरणानंतर एका तासाच्या विश्रांतीनंतर मी बरा असल्याचा आनंदी निरोप त्यांनी फोन करून पत्नीला दिला.
पहिले तीन लाभार्थी प्रतिक्रिया
""लस अतिशय उपयुक्त आहे. हे पटवून देण्यासाठी मी स्वत: लसीकरण करण्याचा निर्णय घेतला. लस घेतल्यानंतर मला ठणठणीत बरे वाटत आहे.''
- डॉ. पवन साळवे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी
पुण्याच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा
"सर्व परीक्षणानंतरच लस बनवली आहे. डॉक्टरांची मेहनत वाया जाणार नाही, असा विश्वास आहे. सगळ्यांनाच ही लस उपयुक्त ठरेल.'
-डॉ. गणेश जोशी, जिजामाता रुग्णालय
""लसीकरणामुळे वेदना होत नाही. खात्रीशीर लस आहे. मी लस घेतली आहे, इतरांनीही त्याचा लाभ घ्यावा.''
-डॉ. प्रफुल्ल तपशाळकर
""माझी 20 वर्षाची सेवा झाली आहे. कदाचित मला सेवाज्येष्ठतेनुसार माझी निवड झाली आहे, ही माझ्यासाठी गौरवाची बाब आहे. माझ्या विभाग प्रमुखांना लस देण्याचे भाग्य मला लाभल्याचा आनंद आहे.''
-सविता वेदपाठक, लसटोचक परिचारिका
दृष्टीक्षेपात
- लसीकरण केंद्रे - 8
-दररोज एका केंद्रावर लस घेणारे नागरिक - 100
-कोरोना योद्ध्यांना आज मिळणार लस - 800
- आज लस घेतलेले लाभार्थी - 800
-लाभार्थी नोंदणी - 17 हजार