esakal | एक लाख घेणाऱ्या तीन डॉक्टरांना ६ मेपर्यंत पोलिस कोठडी

बोलून बातमी शोधा

Crime

एक लाख घेणाऱ्या तीन डॉक्टरांना ६ मेपर्यंत पोलिस कोठडी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (PCMC) कोविड रुग्णालयात (Covid Hospital) रुग्णास दाखल करून घेण्यासाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाइकाकडून एक लाख रुपये घेणाऱ्या तीन डॉक्टरांना (Doctor) ६ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. स्पर्श प्रा. लि.चे डॉ. प्रवीण शांतवन जाधव, वाल्हेकरवाडी येथील पद्मजा हॉस्पिटलचे डॉ. शशांक भरत राळे व डॉ. सचिन श्रीरंग कसबे अशी अटक आलेल्या आरोपींची नावे आहेत.

सुरेखा अशोक वाबळे (रा. रामदासनगर, चिखलीगाव) यांना १९ एप्रिलला कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांना वाल्हेकरवाडीतील ऑक्सिकेअर रुग्णालयात दाखले केले. तेथे अत्याधुनिक सुविधा नसल्याने व प्रकृती खालावल्याने दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी नातेवाईकांची शोधाशोध सुरु झाली. दरम्यान, नातेवाईकांच्या ओळखीचा व्यक्ती बालाजी मोरे याच्याशी संपर्क साधला असता त्यांनी डॉ. सचिन कसबे याच्याशी संपर्क केला. रुग्णाच्या नातेवाईकाच्या असहायतेचा फायदा घेऊन कसबे याने आयसीयू बेड उपलब्ध करण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी केली. नाईलाजास्तव नातेवाईक पैसे देण्यास तयार झाले असता कसबे याने वाल्हेकरवाडीतील पदमजा रुग्णालयातील सहकारी डॉ. शशांक भरत राळे याच्या मार्फतीने स्पर्श प्रा. ली. कन्सल्टन्ट डॉ. प्रवीण जाधव याच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या महापालिकेच्या ऑटो क्लस्टर कोविड सेन्टरमध्ये बेड उपलब्ध झाल्याचे नातेवाईकांना सांगितले.

हेही वाचा: बेडसाठी एक लाख घेणाऱ्या त्या तीन डॉक्टरांना अटक

दरम्यान, डॉ. सचिन कसबे याला त्याचा मध्यस्थी राहुल काळे या व्यक्तीद्वारे रुग्णाच्या नातेवाईकांकडून २३ एप्रिलला दुपारी एक लाख देण्यात आले. रुग्णाला त्याठिकाणी ऍडमिट केल्यानंतर सायंकाळी डॉ. प्रवीण जाधव याने डॉ. राळे यांच्याकडून ऐंशी हजार रुपये घेतले. तर उर्वरित वीस हजार डॉ. शशांक राळे व डॉ. सचिन कसबे यांनी ठेवून घेतले. याप्रकरणी तीनही डॉक्टरांवर खंडणी, फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. या आरोपीना न्यायालयात हजर केले असता त्यांना ६ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

रुग्णाचे दागिनेही गायब

सुरेखा वाबळे यांना ऑटो क्लस्टर कोविड सेंटरमध्ये ऍडमिट करताना त्यांच्या हातात सोन्याच्या दोन अंगठ्या होत्या. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्या अंगठ्या गायब झाल्याची माहिती रुग्णाच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिली आहे. पोलिसांचा त्यादृष्टीनेही तपास सुरु आहे.

नागरिकांनी तक्रार देण्यासाठी पुढे यावे-पोलिस आयुक्त

कोरोनाच्या अशा कठीण काळात रुग्णाच्या नातेवाईकांची आर्थिक लूट करणे चुकीचे आहे. अशाप्रकारे सरकारी दवाखान्यात पैसे उकळत असल्यास अथवा रुग्णाकडील दागिने, पैसे गायब होत असल्यास पोलिसांना माहिती द्यावी, नागरिकांनी तक्रार देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केले आहे. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांबाबत असे प्रकार घडल्यास खपवून घेतले जाणार नाही, कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रकाश यांनी दिला आहे.