esakal | कोविड रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठी एक लाख घेणाऱ्या तीन डॉक्टरांना अटक

बोलून बातमी शोधा

Crime

बेडसाठी एक लाख घेणाऱ्या त्या तीन डॉक्टरांना अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ऑटो क्‍लस्टर येथील कोविड रुग्णालयात रुग्णास दाखल करून घेऊन बेड मिळवून देण्यासाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाइकाकडून एक लाख रुपये घेतल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तीन डॉक्‍टरांना अटक केली आहे.

स्पर्श प्रा. लि.चे डॉ. प्रवीण जाधव, वाल्हेकरवाडी येथील पद्मजा हॉस्पिटलचे डॉ. शशांक राळे व डॉ. सचिन कसबे अशी अटक आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्‍त आयुक्‍त (३) उल्हास जगताप (रा. सुखवानी उद्यान, लिंक रोड, चिंचवड) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा: पिंपरी : मुलांचे अपहरण करून अश्लील कृत्य करणाऱ्यांवर गुन्हा

२३ एप्रिलला पहाटे पावणे चारच्या सुमारास सुरेखा अशोक वाबळे (रा. रामदासनगर, चिखलीगाव) यांना ऑटो क्‍लस्टर येथील कोविड रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणले होते. या रुग्णालयात दाखल करण्यासाठी कोणतेही शुल्क नसताना प्रवीण जाधव याने सुरेखा यांच्या नातेवाइकांकडून बेड मिळवून देण्याच्या उद्देशाने धमकावून व अ‍ॅडमीट करण्यासाठी पैसे लागतात, अशी फसवणूक करून डॉ. प्रवीण जाधव याने रुग्णाच्या नातेवाईकाकडून एक लाख रुपये घेतले. त्यातील कट प्रॅक्‍टीस म्हणून वीस हजार रुपये पद्मजा हॉस्पिटलच्या दोन्ही डॉक्‍टर राळे व कसबे यांनी घेतले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पिंपरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.