पेंटरांच्या कामाला कोरोनाचा बेरंग; कामासाठी जुनी सांगवीतील मजूर अड्ड्यावर होतेय गर्दी

रमेश मोरे
Monday, 27 July 2020

पेंटर, बांधकाम मजूर, कारागीर, बिगारी यांना कामे मिळत नसल्याने मेटाकुटीस आले आहेत.

जुनी सांगवी (पिंपरी-चिंचवड) : कोरोनामुळे झालेल्या लॉकडाउननंतर तग धरून असलेला पेंटर, बांधकाम मजूर, कारागीर, बिगारी यांना कामे मिळत नसल्याने मेटाकुटीस आले आहेत. दरवर्षी उन्हाळा व त्यानंतर नागपंचमीपासून गणेशोत्सव, दसरा व दिवाळीसाठी व्यस्त असलेला पेंटर कलाकारांची वाईट अवस्था झाली आहे. दररोड असे अनेक पेंटर कलाकार, बिगारी हे मजूर अड्ड्यावर कुणीतरी येईल काम देईल, या आशेवर गर्दी करून उभे असलेले पहावयास मिळतात. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

हे वाचा- पूर्वीची दर्पपुडीका, आताची दापोडी जपतेय शिवकालीनपूर्व मंदिर; वाचा हा इतिहास...

कोरोनामुळे समाजातील सर्वच स्तरातील आर्थिक गणिते बिघडली असल्याने घरगुती दुरुस्ती, रंगकाम व बांधकाम व्यावसायिकांच्या साईटची कामे ठप्प आहेत. काही अंशी ती सुरू असली, तरी अनेकांकडे स्वत:ची नेहमीची टीम असल्याने दुसऱ्या कामगारांना कामासाठी भटकंती करीत विचारणा करताना दिसत आहेत. बांधकाम मजूरांचीही तिच अवस्था आहे. जुनी सांगवी येथील मजूर नाक्यांवर महिला मजूरांची संख्या जास्त आहे. येथे कर्नाटकातून कामासाठी वास्तव्यास असलेला मोठा वर्ग आहे. रोजंदारीवर काम करणारा हा वर्ग सध्या काम मिळत नसल्याने सकाळपासून मजूर नाक्यावर घोळका करून काम मिळण्याची वाट पाहतात.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मंदिरांची रंगरंगोटीही थांबली

पेंटिंग व्यावसायिकांची नागपंचमीपासून मंदिर रंगरंगोटीची कामे जोरात सुरू असतात. यात प्रामुख्याने शंकराची मंदिरे रंगरंगोटीसाठी येतात. त्याचबरोबर अन्य देवतांच्या मंदिरांचीही आतील कामे या काळात सुरू असतात. मात्र, कोरोनामुळे मंदिरांचे कार्यक्रम बंद असल्याने ही कामे मंदिर समितीने काढलीच नाहीत. याचाही परिणाम पेंटर व्यावसायिकांवर झाला आहे. रंगाची दुकाने, हार्डवेअरच्या दुकानांबाहेर ग्राहक वस्तू खरेदीला आल्यावर तुमचं रंगकाम करायचं आहे का, अशी विचारणा करताना पेंटर पहायला मिळतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crowd for searching work at labor camp in juni sangvi